व्यक्ती मूलतः मंद आहे. वेगाने बदलणाऱ्या विश्वातही तिची समज, संवेदना आणि करुणा फार हळू विकसित होत गेली आहे. पृथ्वीवरच्या सर्व व्यक्तींच्या गरजांचा समतोल विचार करायची जाणीव निर्माण होण्यासाठी मानवजातीला महाअब्जावधी वर्षांचा संघर्ष करावा लागला. तरीही आज, इतक्या प्रगतीनंतरही, आपण अजूनही “सर्वांसाठी मानवता” या टप्प्यावर पोहोचलो आहोत का, हा प्रश्न अस्वस्थ करतो.
व्यक्तीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक कालखंडात व्यक्तींचे काही ठराविक स्तर स्पष्टपणे दिसून येतात. कुणी सुपर लग्झुरियस जगणे साधलेले, कुणी लग्झुरियस, कुणी कंफर्टेबल, कुणी फक्त चांगले जगणारे, कुणी कसाबसा दिवस ढकलणारे, तर कुणी असेही की ज्यांच्यासाठी जगणे हीच एक वेदना ठरते.
ही केवळ आर्थिक विभागणी नाही,तर ही मानसिक, सामाजिक आणि भावनिक अंतरांची एक न दिसणारी भिंत आहे.
सुपर लग्झुरियस जगणारी व्यक्ती, आपल्या वैभवाच्या उंचीवरून खाली पाहताना, लग्झुरियस जगणाऱ्या व्यक्तीला केवळ एक मंद स्मित देते. कंफर्टेबल जगणारी व्यक्ती तिला फक्त एक दृश्य वाटते, चांगले जगणारी व्यक्ती चुकून नजरेस पडते, कसेबसे जगणारी व्यक्ती अस्तित्वातच नसते आणि जगणेच न साधणारी व्यक्ती तर तिच्या जगाच्या नकाशावरही नसते. ही नजर फक्त वरून खाली असते, आत शिरणारी नसते.
लग्झुरियस जगणारी व्यक्ती वर मान वाकवते आणि खाली दुर्लक्ष करते. तिला वरचा स्तर गाठायचा असतो, त्यामुळे खाली पाहण्याइतका वेळ किंवा संवेदना तिच्याकडे नसते. कंफर्टेबल जगणारी व्यक्ती आसुसलेली असते. तिची नजर वर स्वप्न पाहते, खाली चिडचिड करते. ती स्वतः सुरक्षित आहे, पण समाधानी नाही. त्यामुळे तिची अस्वस्थता इतरांवर उतरते.
चांगले जगणारी व्यक्ती तुलनेने अधिक मानवी असते. तिला वरचे अंतर जाणवते, खालील वेदना बोचतात. ती कसेबसे जगणाऱ्या व्यक्तीकडे हळहळून पाहते आणि जगणेच न साधणाऱ्या व्यक्तीकडे पाहताना मनात एक शांत, पण असहाय प्रश्न उभा राहतो – “हे जीवन इतके कठीण का झाले?”
कसेबसे जगणारी व्यक्ती मात्र सतत चिंतेत असते. उद्याचा दिवस, आजची गरज, अचानक आलेला खर्च, उसनवारीचा विचार – तिचे आयुष्य आकड्यांत मोजले जाते. तिच्या नजरेत ‘चांगले जगणारी’ व्यक्ती म्हणजे एक शक्यता असते – मदतीची, कर्जाची, थोड्या आधाराची.
आणि शेवटी, जगणेच न साधणारी व्यक्ती. तिच्यासाठी तत्त्वज्ञान, विकास, प्रगती हे शब्द अर्थहीन असतात. जिवंतपणा तिला त्रास देत असतो. ती केवळ जगते, पण जगण्यात सहभागी नसते. तिचे दुःख ओरडत नाही, पण ते सर्वांत खोल असते.
हा सगळा पट पाहिला की एक प्रश्न प्रकर्षाने समोर येतो.. आपण कोणत्या स्तरावर आहोत, यापेक्षा आपण खालच्या स्तरांकडे कसे पाहतो, हे अधिक महत्त्वाचे नाही का?
खरी प्रगती म्हणजे वर जाणे नव्हे, तर वर असूनही खालील वेदना समजून घेण्याची क्षमता विकसित होणे. खरी मानवता म्हणजे स्वतःच्या सुखाची उंची मोजणे नव्हे, तर इतरांच्या दुःखाची खोली ओळखणे.
व्यक्ती मंद आहे, हे खरे आहे. पण ती विचारशील होऊ शकते. इतिहासाने आपल्याला संपत्ती दिली, विज्ञान दिले, सुविधा दिल्या. आता काळ मागतो आहे तो संवेदनशीलतेचा, समतेचा आणि सहवेदनेचा.
कारण ज्या दिवशी सुपर लग्झुरियस जगणारी व्यक्ती, जगणेच न साधणाऱ्या व्यक्तीकडे केवळ टाळून न पाहता थांबून पाहील, त्या दिवशी मानवजातीचा खरा विकास सुरू होईल.
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
- विचार संकलन, लेखन आणि संपादन.. ✍️
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment