आयुष्याच्या संघर्षाला दिशा देणाऱ्या केवळ संस्था नसतात, तर त्या विचारांच्या जाज्वल्य परंपरा असतात. मराठवाड्याच्या मातीत उभं असलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे असंच एक लोकविद्यापीठ आहे, जो मराठवाड्याचं #JNU आहे, जिथे केवळ पदवी मिळत नाही, तर व्यक्तिमत्त्व घडतं, विचार प्रगल्भ होतात आणि संघर्षाला अर्थ प्राप्त होतो.
मराठवाड्यातील कष्टकऱ्या बहुजनांच्या लेकरांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय आणि आर्थिक उन्नतीचा पाया इथे शांतपणे पण ठामपणे रचला जातो.
सन 2005-2007 या काळात याच विद्यापीठाच्या सान्निध्यात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना, केवळ पुस्तकांमधील ज्ञान नव्हे, तर जीवन समजून घेण्याची दृष्टी लाभली. डाव्या वैचारिक चळवळींच्या सहवासात विचारांची धार तीक्ष्ण झाली; आणि कार्ल मार्क्स ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक प्रवाहात स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले सरांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विद्यापीठ केवळ शिक्षणाचं केंद्र राहिलं नाही, तर सामाजिक जाणीवांचा प्रबोधनकेंद्र बनलं.
या प्रवासात गेले 25 वर्षं वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित आणि गरीब घटकांच्या लेकरांसाठी शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी वाहून घेतलेलं आयुष्य ही केवळ कारकीर्द नाही, तर एक वैचारिक बांधिलकी आहे. आज पुन्हा एकदा विद्यापीठाच्या प्रांगणात उभं राहिल्यावर जाणवतं की, ही केवळ इमारतींची जागा नाही; तर इथे प्रत्येक भिंत, प्रत्येक रस्ता, प्रत्येक झाड हे संघर्ष, स्वप्नं आणि परिवर्तनाच्या कथा सांगतं.
या विद्यापीठातील प्रज्ञावंत प्राध्यापक, अभ्यासू कॉम्रेड्स आणि संशोधक मित्रांनी योग्य वेळी दिलेली विवेकाची वैचारिक देणगी हीच खरी संपत्ती ठरली. त्यांनी शिकवलेलं केवळ विषयज्ञान नव्हतं, तर प्रश्न विचारण्याची हिंमत, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द आणि सत्याच्या शोधात सतत जागं राहण्याची वृत्ती होती. त्यामुळेच आज आयुष्याकडे पाहताना एक गाढ समाधान मनात दाटून येतं.
हे विद्यापीठ माझ्यासाठी केवळ शिक्षणसंस्था नाही; ते माझ्या विचारांचं उगमस्थान, माझ्या संघर्षाचं प्रेरणास्थान आणि माझ्या स्वाभिमानाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच मी त्याच्या कायम ऋणात आहे आणि याच ऋणातून उभा राहिलेला हा स्वाभिमान आजही माझ्या वाटचालीला प्रेरणादायी बळ देतो.
आज अनेक दिवसांनी विद्यापीठात फेरफटका मारताना जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला; पण त्या केवळ आठवणी नव्हत्या तर त्या पुन्हा नव्याने उभं राहण्याची, अधिक जबाबदारीने पुढे जाण्याची आणि समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची शांत पण ठाम हाक आहे, असं मला वाटतं.
अभिमान वाटतो की मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एक यशस्वी विद्यार्थी आहे, पण हा अभिमान केवळ पदवीचा नाही, तर त्या विचारांचा आहे ज्यांनी मला एक विवेकी माणूस म्हणून घडवलं. हे विद्यापीठ मला केवळ यशस्वी बनवून थांबलं नाही, तर समाजाशी नाळ जोडलेली, जबाबदारीची जाणीव असलेली आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देणारी व्यक्ती बनवलं.
प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनुयायी आणि अभ्यासक म्हणून आयुष्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, शिक्षण हे केवळ वैयक्तिक उन्नतीचं साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यांच्या “ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” या त्रिसूत्रीने केवळ दिशा दिली नाही, तर जीवनाला एक व्यापक उद्देश दिला.
आज सेवा भावनेने आयुष्य समर्पित करताना हे उमगतं की खरा यशस्वी विद्यार्थी तोच, जो स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या उन्नतीची जबाबदारी स्वीकारतो. कारण ज्ञानाचं अंतिम फलित हे केवळ करिअर नसतं, तर सजग नागरिकत्व आणि मानवी मूल्यांची जपणूक असते, असं मला वाटतं मित्रांनो.
म्हणूनच हा अभिमान केवळ ‘मी या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.’ इतक्यावर मर्यादित नाही; तर ‘मी त्या विचारांचा वाहक आहे, जे समाजात समता, न्याय आणि बंधुता निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करेल.
-एक माजी विद्यार्थी.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
The proud of Dr Babasaheb Ambedkar Marathwada University,Chh.Sambhajinagar, #BamuUniversity
Post a Comment