🎓 कौशल्याधारित शिक्षण : बदलत्या काळाची गरज आणि नव्या भविष्याची चाहूल..!
लेख क्र. 53: आजचं शिक्षण.. उद्याचं भविष्यं.. ✍️
आज जग ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाने आपल्या शिक्षणव्यवस्थेनेही बदलणे ही केवळ अपेक्षा राहिलेली नाही तर ती काळाची अपरिहार्य गरज बनली आहे. मुंबई विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत कौशल्याधारित अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल हे म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे, स्वागतार्ह आणि दूरगामी परिणाम करणारे आहे. नव्या शैक्षणिक वर्षात विविध जिल्ह्यांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रमांसाठी नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्याचा प्रस्ताव म्हणजे शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाची स्पष्ट चाहूल आहे.
कारण एक प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे, आपण विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणार आहोत, की त्यांना जगण्याची, काम करण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता देणार आहोत?
आज आपल्या समाजात पदवीधरांची संख्या वाढत आहे; पण त्याच प्रमाणात रोजगारक्षम, प्रशिक्षित आणि प्रत्यक्ष कामाचे कौशल्य असलेल्या तरुणांची संख्या वाढते आहे का? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. हातात पदवी आहे, गुणपत्रिका आहे, अनेक प्रमाणपत्रे आहेत; पण उद्योग, व्यवसाय किंवा रोजगाराच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आवश्यक असणारे व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्य, संवादक्षमता, समस्या सोडविण्याची वृत्ती आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी अनेक विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसते.
ही विद्यार्थ्यांची कमजोरी कमी आणि आपल्या पारंपरिक शिक्षणव्यवस्थेतील मर्यादा अधिक आहेत.
वर्षानुवर्षे आपण विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाचायला शिकवले, प्रश्नांची उत्तरे पाठ करायला शिकवली, परीक्षेत गुण मिळवण्याची तंत्रे शिकवली; पण ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग कसा करायचा, स्वतःमधील कौशल्य कसे ओळखायचे, नवीन संधी कशा शोधायच्या आणि रोजगार मागणारा नव्हे तर रोजगार निर्माण करणारा युवक कसा व्हायचा हे शिकवण्यात आपण अनेकदा कमी पडलो.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स, डेटा सायन्स, डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थकेअर, मीडिया, डिझाइन, पर्यटन, कृषी-तंत्रज्ञान आणि अनेक नव्या क्षेत्रांनी रोजगाराचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. काल ज्या नोकऱ्यांना मोठी मागणी होती, त्यापैकी काही नोकऱ्यांचे स्वरूप आज बदलत आहे. आणि आज अस्तित्वात असलेली अनेक करिअर क्षेत्रे दहा-पंधरा वर्षांपूर्वी सामान्य विद्यार्थ्यांच्या कल्पनेतही नव्हती.
अशा परिस्थितीत जुना अभ्यासक्रम, जुनी शिकवण्याची पद्धत आणि केवळ परीक्षाकेंद्री मानसिकता घेऊन आपण नव्या शतकातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकत नाही.
काळ बदलला आहे. त्यामुळे शिक्षणाची व्याख्याही बदलली पाहिजे.
पूर्वी “किती शिकलात?” हा प्रश्न महत्त्वाचा होता. आज “काय करू शकता?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे. उद्याच्या काळात कदाचित “नवीन काय निर्माण करू शकता?”
हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घेणार आहे.
म्हणूनच ज्ञान + कौशल्य + तंत्रज्ञान + सर्जनशीलता + व्यक्तिमत्त्व विकास यांचा समन्वय असलेली शिक्षणपद्धती निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
पदवीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे होत आहे..!
याचा अर्थ पदवी निरर्थक आहे, असा अजिबात नाही. उच्च शिक्षणाचे महत्त्व आजही कायम आहे आणि पुढेही राहणार आहे. मात्र केवळ पदवी म्हणजे रोजगाराची हमी, हा भ्रम आता सोडावा लागेल.
एका विद्यार्थ्याने तीन किंवा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला, पण त्याला आपल्या विषयातील प्रत्यक्ष काम करता येत नसेल, डिजिटल साधने वापरता येत नसतील, प्रभावी संवाद साधता येत नसेल, टीमवर्क करता येत नसेल किंवा बदलत्या परिस्थितीत नवीन कौशल्य शिकण्याची तयारी नसेल, तर त्याची पदवी त्याच्या रोजगारक्षमतेची संपूर्ण हमी देऊ शकत नाही.
प्रमाणपत्र तुमचे शिक्षण सांगते; पण कौशल्य तुमची क्षमता सिद्ध करते.
आज उद्योगांना केवळ गुणपत्रिका दाखवणारे उमेदवार नको आहेत. त्यांना समस्या समजून घेणारे, उपाय शोधणारे, तंत्रज्ञान वापरणारे, जबाबदारी स्वीकारणारे आणि सतत शिकण्याची मानसिकता असणारे तरुण हवे आहेत.
म्हणून कौशल्याधारित महाविद्यालयांची संकल्पना ही केवळ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यापुरती मर्यादित राहता कामा नये. ती शिक्षणाच्या विचारपद्धतीतील मूलभूत परिवर्तनाची सुरुवात ठरली पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या हाताला काम आणि विचारांना दिशा हवी..!
आपल्या शिक्षणव्यवस्थेत एक विचित्र मानसिकता अनेक वर्षांपासून रुजलेली आहे. हाताने काम करणे म्हणजे कमीपणा आणि टेबल-खुर्चीची नोकरी म्हणजे प्रतिष्ठा हा अत्यंत चुकीचा सामाजिक समज आपण निर्माण केला...यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नैसर्गिक कौशल्यांकडे दुर्लक्ष केले. एखादा विद्यार्थी उत्तम तंत्रज्ञ होऊ शकतो, एखादा उत्कृष्ट डिझायनर, संशोधक, डिजिटल क्रिएटर, कृषी उद्योजक किंवा कुशल व्यावसायिक होऊ शकतो,पण समाजाच्या ठरावीक अपेक्षांच्या ओझ्याखाली त्याला केवळ पारंपरिक पदवीच्या रांगेत उभे केले जाते.
प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर किंवा अधिकारी होणार नाही; आणि तशी गरजही नाही. पण प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार कुशल, स्वावलंबी आणि सन्मानाने जगणारा नागरिक नक्कीच होऊ शकतो.
त्यासाठी शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य ओळखण्याची व्यवस्था आवश्यक आहे.
करिअर मार्गदर्शन हे बारावीचा निकाल लागल्यानंतर घाईघाईने करण्याचे काम नाही. करिअरची जाणीव शालेय जीवनातच निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थ्याला विविध क्षेत्रांचा परिचय मिळाला पाहिजे. प्रयोगशाळा, कार्यशाळा, उद्योगभेटी, इंटर्नशिप, प्रकल्पाधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांना शिक्षणाच्या केंद्रस्थानी आणलं पाहिजे.
कौशल्य शिक्षण म्हणजे केवळ छोटे कोर्स नव्हेत..!
इथे आणखी एक गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कौशल्य शिक्षण म्हटले की काही लोकांच्या डोळ्यांसमोर केवळ अल्पकालीन व्यावसायिक प्रशिक्षण येते. प्रत्यक्षात आधुनिक कौशल्याधारित शिक्षणाची व्याप्ती खूप मोठी आहे.
विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्याला प्रयोग करता आलं पाहिजे. वाणिज्य शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आर्थिक व्यवहार, डिजिटल अकाउंटिंग आणि बाजारव्यवस्था समजली पाहिजे. कला शाखेतील विद्यार्थ्याला संवाद, संशोधन, लेखन आणि सामाजिक विश्लेषण करता आले पाहिजे. संगणक शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केवळ व्याख्या पाठ न करता प्रत्यक्ष डिजिटल निर्मिती केली पाहिजे.
विषय कोणताही असो, शिक्षणाचा शेवट 'माहिती'वर न होता 'क्षमता' निर्माण करण्यात झाला पाहिजे.
हेच खऱ्या अर्थाने कौशल्याधारित शिक्षण आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिक्षण बदललेच पाहिजे..!
आज AI काही सेकंदांत माहिती शोधते, लेखन करते, भाषांतर करते, विश्लेषण करते आणि अनेक तांत्रिक कामांमध्ये माणसाला सहाय्य करते. अशा काळात विद्यार्थ्यांना केवळ माहिती पाठ करण्यास भाग पाडणारी शिक्षणपद्धती किती काळ टिकणार?
आता विद्यार्थ्यांना माहिती साठवणारे 'मानवी हार्ड डिस्क' बनविण्याची गरज नाही. त्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला, माहितीची सत्यता तपासायला, तंत्रज्ञानाचा नैतिक वापर करायला आणि नवीन कल्पना निर्माण करायला शिकवले पाहिजे.
AI विद्यार्थ्याची जागा घेईल का, हा प्रश्न विचारण्यापेक्षा AI वापरणारा कुशल विद्यार्थी, AI न वापरणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा किती पुढे जाईल? हा प्रश्न अधिक गंभीर आहे.
त्यामुळे कौशल्याधारित अभ्यासक्रमांमध्ये डिजिटल साक्षरता, AI literacy, critical thinking, communication skills, entrepreneurship आणि problem-solving यांचा समावेश काळाची गरज आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही संधी अधिक महत्त्वाची..!
कौशल्याधारित शिक्षणाची महाविद्यालये केवळ मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहता कामा नयेत. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि राज्यातील ग्रामीण व निमशहरी भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक कौशल्य शिक्षण पोहोचले पाहिजे.
कारण प्रतिभेला भूगोल नसतो..
गावातील विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता शहरातील विद्यार्थ्यापेक्षा कमी नसते; अनेकदा कमी असतात त्या फक्त संधी, साधने आणि योग्य मार्गदर्शन.
जर आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, उद्योगांशी जोडलेले अभ्यासक्रम आणि दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण जिल्हा व तालुका स्तरावर उपलब्ध झाले, तर ग्रामीण तरुणांना शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर काही प्रमाणात कमी होईल. स्थानिक उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य विकसित झाले, तर स्थानिक रोजगार आणि उद्योजकतेलाही चालना मिळू शकते.
पण केवळ कॉलेज उघडून प्रश्न सुटणार नाही..!
कौशल्याधारित महाविद्यालयांची घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे; मात्र केवळ नावात 'Skill' जोडल्याने शिक्षण कौशल्याधारित होत नाही.
दर्जेदार प्रयोगशाळा आहेत का? प्रशिक्षित शिक्षक आहेत का? उद्योगांशी प्रत्यक्ष भागीदारी आहे का? विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळते का? अभ्यासक्रम नियमितपणे अद्ययावत होतो का? प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्याची कौशल्य चाचणी होते का? रोजगार आणि उद्योजकतेशी अभ्यासक्रमाचा संबंध आहे का?
या प्रश्नांची उत्तरेही शोधावी लागतील.
अन्यथा पारंपरिक पदव्यांच्या बेरोजगार रांगेत उद्या 'कौशल्य प्रमाणपत्रधारक बेरोजगारांची' नवी रांग उभी राहण्याचा धोका नाकारता येणार नाही.
त्यामुळे शासन, विद्यापीठे, महाविद्यालये आणि उद्योगक्षेत्र यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम वर्गखोलीत बसून तयार करण्याऐवजी उद्योग, तंत्रज्ञान आणि समाजाच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडून तयार झाले पाहिजेत.
पालक आणि विद्यार्थ्यांनीही मानसिकता बदलावी..!
शिक्षणव्यवस्था बदलत असताना पालकांची मानसिकताही बदलणे आवश्यक आहे. “सगळे ज्या कोर्सला जातात, त्याच कोर्सला माझ्या मुलानेही जावे” ही गर्दीची मानसिकता विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक ठरू शकते.
प्रत्येक मुलाचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. आवड वेगळी आहे. बुद्धिमत्तेचा प्रकार वेगळा आहे. क्षमता आणि स्वप्नेही वेगळी आहेत.
म्हणून करिअर निवडताना प्रतिष्ठेपेक्षा क्षमता, गर्दीपेक्षा संधी आणि समाज काय म्हणेल यापेक्षा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला काय योग्य आहे, याचा विचार केला पाहिजे.
पालकांनी मुलांना केवळ गुण विचारू नयेत तर त्यांना विचारावे..
तुला काय शिकायला आवडते?
तू काय चांगले करू शकतोस?
तुला कोणती समस्या सोडवायला आवडेल?
तुला स्वतःमध्ये कोणते कौशल्य विकसित करायचे आहे?
कदाचित या प्रश्नांच्या उत्तरांतचं विद्यार्थ्याच्या भविष्याचा खरा नकाशा दडलेला असेल.
शेवटी एवढंच...✍️
मुंबई विद्यापीठाचा कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे वाढणारा कल हा बदलत्या शिक्षणविश्वाचा एक महत्त्वपूर्ण संकेत आहे. ही केवळ काही नवीन महाविद्यालयांची बातमी नाही; हा पारंपरिक शिक्षणव्यवस्थेला काळाने दिलेला स्पष्ट इशारा आहे.
आता केवळ पदव्या वाटून भविष्य घडणार नाही. विद्यार्थ्यांच्या हातात कौशल्य, डोक्यात आधुनिक ज्ञान, विचारांत विवेक, मनात आत्मविश्वास आणि नजरेसमोर बदलत्या जगाची जाणीव निर्माण करावी लागेल.
कारण येणारा काळ केवळ 'शिकलेल्या' माणसांचा नसेलतर तो सतत नवीन शिकणाऱ्या, कौशल्य आत्मसात करणाऱ्या आणि बदलाला सामोरे जाणाऱ्या माणसांचा असेल.
आज आपण विद्यार्थ्यांना कालच्या पद्धतीने शिकवून उद्याच्या जगात पाठवत आहोत. ही विसंगती आता संपवावी लागेल.
शिक्षणाला पुस्तकातून प्रयोगशाळेत, वर्गातून उद्योगात, गुणपत्रिकेतून कौशल्यात आणि नोकरीच्या अपेक्षेतून स्वावलंबनाच्या दिशेने घेऊन जाण्याची हीच योग्य वेळ आहे.
कारण कौशल्याधारित शिक्षण हा आता पर्याय नाही...ती बदलत्या काळाची गरज, विद्यार्थ्यांच्या भविष्याची आवश्यकता आणि समर्थ भारताच्या निर्मितीची अपरिहार्य पायाभरणी आहे..!
-एक शैक्षणिक समुपदेशक आणि सल्लागार
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
ह्या क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन आणि भविष्यातील संधी यावर मोफत मार्गदर्शन आणि संवादासाठी संपर्क :
wa.me/+919970717187
Dr.A.P.J.Abdul Kalam Vocational Training & Skill
Development Academy Parbhani (MS)
Online Brochure and Course List👇
https://heyzine.com/flip-book/14718f1b7e.html
Officail Website
https://dkvfresearchfoundation.in
Post a Comment