🔥 मी विक्रीसाठी नाही..! ✊
जग आरसा नाही मित्रा, हा स्वार्थाचा बाजार आहे,
चेहऱ्यावरती हास्य इथे, काळजात व्यापार आहे...
शब्दांमध्ये गोडवा भारी, हेतू मात्र गढूळ आहे,
माणुसकीच्या वस्त्राआडही, सौदागरांची चूळ आहे..!
इथे झुकल्या मानेवरती, किंमतीची पाटी चढते,
लाचारीच्या प्रत्येक घासात, गुलामीची चवही वाढते...
स्वतःलाच तू स्वस्त केलंस, बोली तुझ्यावर लागेल,
गरज संपता गर्दीमधला, प्रत्येक चेहरा पळेल..!
लक्षात ठेव... ✍️
तुझ्या घामाला मोल आहे, तुझ्या जखमांना इतिहास आहे,
तुझ्या मौनाच्या राखेखाली, धगधगणारा श्वास आहे...
तू माती नाहीस पायदळीची, तू वादळाची चाल आहेस,
अन्यायाच्या छाताडावरची, तू विद्रोहाची ढाल आहेस..!
कोणी पदाचा मुकुट मिरवो, कोणी पैशांचा माज करो,
कोणी सत्तेच्या सावलीतून, सत्यावरती वार करो...
तू विवेकाची धार बनून, खोटेपणाला चीर जरा,
स्वाभिमानाच्या मशालीने, अंधाराला जाळ जरा..!
भीक नको त्या प्रतिष्ठेची, जी लाचारी मागत आहे,
मान नको त्या गर्दीचा, जी स्वत्व तुझे विकत आहे...
सोन्याच्या त्या पिंजऱ्यापेक्षा, काट्यांचा रस्ता बरा,
गुलामीच्या सिंहासनापेक्षा, संघर्षाचा खस्ता बरा..!
ताठ कणा अन् स्वच्छ नजर.. हीच आपली शान असावी,
ओठांवरती सत्याची भाषा, छातीत क्रांतीची जाण असावी...
विकणाऱ्यांच्या या दुनियेत, विकत जाणे पाप आहे,
स्वतःच्या आत्म्याशी केलेला सौदा..सर्वांत मोठा शाप आहे..!
म्हणून.. ✍️
तुझी किंमत जग ठरवेल, इतका कधी लाचार नको,
चार टाळ्यांच्या मोहासाठी, स्वतःशीच गद्दार नको...
तुझ्या अस्तित्वाचा निर्णय, बाजाराला घेऊ देऊ नको,
स्वार्थाच्या त्या तराजूत, स्वाभिमान तोलू देऊ नको..!
कारण.. ✍️
माणसाच्या अपमानाची ठिणगी, क्रांतीची मशाल होते,
दाबलेल्या प्रत्येक हुंकारातून, नवी बंडाची चाल होते...
जखम जेव्हा शब्द बनते, लेखणी तलवार होते,
आणि स्वाभिमान जागा झाला..
तर गुलामीची प्रत्येक भिंत जमीनदोस्त होते..!
ठणकावून सांग या बाजाराला..
" मी वस्तू नाही... माझा लिलाव होणार नाही!
मी लाचार नाही... माझा सौदा होणार नाही!
माझ्या स्वाभिमानावर किंमत लावण्याआधी
लक्षात ठेवा...मी ती ठिणगी आहे...
जी पेटली, तर तुमच्या स्वार्थाचा बाजारही
राख झाल्याशिवाय राहणार नाही..!!" ✊🔥
— एक विद्रोही..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
एक साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment