आपलं जीवन सुखी, समाधानी आणि समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत; पण त्या सर्वांमध्ये सर्वाधिक मौल्यवान गोष्ट म्हणजे नातेसंबंध. संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि यश यांची चमक काळानुसार कमी-जास्त होत राहते; परंतु माणसाच्या आयुष्याला खरी उब, सुरक्षितता आणि अर्थ देतात ती जपलेली नाती. काही नाती आपल्याला जन्मतः लाभतात, तर काही आपल्या स्वभाव, विचार, विश्वास आणि प्रेमातून निर्माण होतात. हीच नाती संकटात आधार देतात, यशात आनंद वाढवतात आणि अपयशात पुन्हा उभे राहण्याचे बळ देतात.
परंतु प्रत्येक नाते हे एका रोपट्यासारखे असते. त्याला विश्वासाचे पाणी, समजुतीचे खत, संयमाची माती आणि प्रेमाचा सूर्यप्रकाश मिळाला तरच ते विशाल वृक्ष बनते. अन्यथा संशय, अहंकार, स्वार्थ आणि अपेक्षांच्या वादळात ते कोमेजून जाते. नाती केवळ शब्दांनी टिकत नाहीत तर ती कृतीने, संवेदनशीलतेने आणि सातत्याने जपावी लागतात.
त्यासाठी काही मूल्ये अंगीकारावी लागतात. स्वतःच्या अहंकाराला आवर घालावा लागतो. दुसऱ्याच्या भावना, विचार, मतभेद, आवडी-निवडी आणि स्वातंत्र्याचा आदर करावा लागतो. संवादात सौजन्य, वर्तनात प्रामाणिकपणा आणि मनात विश्वास असेल, तर कोणतेही नाते अधिक दृढ बनते. पण जेथे हुकूमशाही, वर्चस्व, अपमान आणि एकतर्फी अपेक्षा वाढतात, तेथे नात्यांचा श्वास गुदमरू लागतो. प्रेमाच्या जागी भीती आणि विश्वासाच्या जागी दुरावा निर्माण झाला की, नाते जिवंत असूनही आतून मृत होत जाते.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात अनेकांनी माणसांपेक्षा साधनांना अधिक जवळ केले आहे. मोबाईलवरील संपर्क वाढले; पण मनांमधील संवाद कमी झाला. घरात माणसे एकत्र असली तरी मने दूर गेली. हीच खरी शोकांतिका आहे. नात्यांची उणीव पैसा भरून काढू शकत नाही आणि भावनिक दारिद्र्य कोणतीही संपत्ती दूर करू शकत नाही.
म्हणूनच प्रत्येकाने नात्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. तुटलेल्या नात्यांचे कारण दुसऱ्यात शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधले, तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. क्षमा करण्याची वृत्ती, समजून घेण्याची तयारी आणि संवादाची संस्कृती हीच नात्यांची खरी जीवनरेखा आहे,मित्रांनो..
लक्षात ठेवा, माणूस आपल्या संपत्तीमुळे मोठा होत नाही तर तो आपल्या नात्यांमुळे मोठा होतो. ज्या घरात प्रेम, आदर, विश्वास आणि माणुसकी नांदते, ते घरच खऱ्या अर्थाने समृद्ध असते. म्हणून नाती जपा, माणसे जोडा, अहंकारापेक्षा प्रेमाला आणि स्वार्थापेक्षा माणुसकीला प्राधान्य द्या. कारण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस बँकेतील शिल्लक मोजत नाही तर तो आपल्या आयुष्यात जपलेल्या माणसांची आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाचीच श्रीमंती अनुभवत असतो.
- एक संवेदनशील जीवनप्रवासी..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
#नाती #नातेसंबंध #माणुसकी #प्रेम #विश्वास #आदर #संवाद #समजूतदारपणा #संयम #क्षमा #आपुलकी #कुटुंब #मैत्री #जीवनमूल्ये #चारित्र्य #स्वभाव #सकारात्मकविचार #आत्मपरीक्षण #स्वतःलाबदला #अहंकारत्याग #स्वार्थमुक्तजीवन #भावनिकसमृद्धी #जीवनप्रेरणा #प्रेरणादायीविचार #वैचारिकलेख #प्रबोधन #विवेक #मानवतावाद #सामाजिकजाणीव #सुसंवाद #जीवनतत्त्वज्ञान #साहित्य #मराठीलेखन #मराठीविचार #लेखमाला #विद्यार्थीमित्र #रफीकशेख #TheRadicalHumanist #TheSpiritOfZindagi #Humanity #Relationships #LifeLessons #Inspirational #Motivation #PositiveThinking #EmotionalIntelligence #SelfReflection #LoveAndRespect #HumanValues #MarathiQuotes #MarathiThoughts
Post a Comment