William Shakespeare हे नाव उच्चारताच जागतिक साहित्यविश्वातील एक अजरामर पर्व आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. 23 एप्रिल हा दिवस ‘शेक्सपिअर डे’ म्हणून साजरा केला जातो; कारण याच दिवशी 1564 साली त्यांचा जन्म झाला आणि 1616 साली त्यांचं निधनही झालं. ही केवळ एक स्मरणपर परंपरा नाही, तर मानवी विचार विश्वाला दिशा देणाऱ्या शब्दशक्तीचा उत्सव आहे.
इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड मधील एव्हॉन या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास लंडनच्या रंगमंचावर फुलला आणि अखेरीस संपूर्ण जगाच्या सांस्कृतिक चेतनेत विलीन झाला. सामान्य परिस्थितीत वाढलेला हा तरुण आपल्या प्रतिभा, परिश्रम आणि संवेदनशील दृष्टिकोनाच्या जोरावर जगातील महान नाटककार, कवी आणि अभिनेता बनला. जीवनातील संघर्ष, वैयक्तिक दुःख, सामाजिक निरीक्षण आणि मानवी स्वभावाची सूक्ष्म जाण या सगळ्यांनी त्याच्या लेखणीला एक विलक्षण धार दिली.
शेक्सपिअरची साहित्यसृष्टी ही केवळ नाटकांची मालिका नाही; ती मानवी भावविश्वाची जिवंत प्रयोगशाळा आहे. Hamlet मधील नैतिक द्वंद्व, Macbeth मधील सत्तेची अंधळीत, किंवा Romeo and Juliet मधील प्रेमाची पराकाष्ठा.. प्रत्येक कृतीतून मानवी मनाच्या गूढ गुंतागुंतींचं प्रभावी चित्रण दिसतं. म्हणूनच शेक्सपिअर आजही जिवंत आहेत; कारण त्यांनी काळाच्या पलीकडे जाऊन माणसाला समजून घेतलं.
त्यांनी सुमारे 37 नाटके आणि 154 सॉनेट्स लिहिले, आणि प्रत्येक रचनामध्ये भाषेचं सौंदर्य, विचारांची खोली आणि संवादांची मार्मिकता दिसून येते. कवी Ben Jonson यांनी त्यांना “Soul of the Age” म्हटलं, ते उगाच नाही. त्यांच्या शब्दांमध्ये केवळ काव्य नाही, तर जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.
आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात, जिथं माहितीचा महासागर आपल्या हातात आहे, तिथं विचारांची खोली मात्र उथळ होत चालली आहे. अशा वेळी शेक्सपिअर आपल्याला सांगतात की, वाचन म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही; तर ते आत्मपरिवर्तनाची प्रक्रिया आहे. त्यांच्या साहित्याकडे पाहताना आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो.. सत्ता मिळवण्यासाठी आपण किती दूर जाऊ शकतो? प्रेम आणि तर्क यांच्यातील संघर्षात खरं जिंकतं कोण? नैतिकतेचा मार्ग कठीण असला तरी तोच का योग्य असतो?
हीच प्रश्नांची परंपरा माणसाला अधिक सजग, संवेदनशील आणि विचारशील बनवते.
आज वाचन संस्कृती हळूहळू मागे पडताना दिसते. मोबाईलच्या स्क्रीनवरच्या झटपट माहितीने आपण समाधानी होतो; पण त्या माहितीला विचारांची खोली नसते. शेक्सपिअर आपल्याला शिकवतात की, शब्द हे केवळ संवादाचं साधन नसून परिवर्तनाचं शक्तिशाली माध्यम आहे.
" वाचन म्हणजे स्वतःला घडवण्याची, समाजाला समजून घेण्याची आणि जगाला नव्या नजरेने पाहण्याची प्रक्रिया आहे."
" शेक्सपिअर डे" हा केवळ एका महान साहित्यिकाला अभिवादन करण्याचा दिवस नाही; तर तो आपल्या विचारविश्वाला नव्याने घडवण्याची संधी आहे.ल, असं मला वाटतं मित्रांनो..
त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना आपण एक संकल्प करूया, " वाचनाला केवळ सवय म्हणून नव्हे, तर जीवनमूल्य म्हणून स्वीकारूया."
कारण, शब्द बदलतात विचारांना, विचार घडवतात माणसाला,
आणि माणूस घडवतो समाजाला..
-एक पुस्तकप्रेमी.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment