आजच्या चकाकत्या, स्पर्धेने व्यापलेल्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या जगात माणूस सतत काहीतरी मिळवण्याच्या धावपळीत स्वतःलाच हरवत चालला आहे. अपूर्ण स्वप्नांची सल, इतरांच्या यशाशी होणारी तुलना आणि भविष्याची अनामिक भीती यामुळे मन अस्वस्थ होतं, विचार विस्कळीत होतात आणि आयुष्याचा खरा अर्थ कुठेतरी धूसर होऊन जातो.
अशा वेळी “जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते सोडा आणि जे हवं आहे त्यासाठी शांतपणे काम करा.” हा विचार एखाद्या दीपस्तंभासारखा मार्ग दाखवतो. कारण स्वीकार ही हार नसते तर ती वास्तवाला धैर्याने सामोरं जाण्याची ताकद असते. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, प्रत्येक नातं टिकत नाही आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही. पण जे बदलता येत नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा त्यातून स्वतःला नव्याने घडवणं, हाच खरा शहाणपणाचा मार्ग असतो, मित्रांनो.
माणसाच्या दुःखामागे अनेकदा “जे नाही” त्याचीच हाव दडलेली असते. हरवलेल्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवताना हातातलं वर्तमानही निसटून जातं.
म्हणूनच काही आठवणी, काही माणसं, काही वेदना आणि काही अपूर्ण इच्छा वेळेच्या प्रवाहात शांतपणे सोडून द्याव्या लागतात. झाडाला नव्या पालवीसाठी जुनी पानं गाळावी लागतात, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खडकांना चुकवत पुढे वाहावं लागतं, आणि माणसालाही स्वतःच्या मनात साचलेलं दुःख झटकून नव्या आशेने उभं राहावं लागतं. सोडून देणं म्हणजे कमकुवतपणा नव्हे; तर स्वतःच्या अंतर्मनाला मुक्त करण्याची एक सुंदर प्रक्रिया असते.
आजच्या काळात प्रत्येकाला यश हवं आहे, पण संयम नको आहे; प्रसिद्धी हवी आहे, पण संघर्ष नको आहे. लोक आवाज करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, पण निसर्ग आपल्याला शिकवतो की खऱ्या ताकदीला गोंगाटाची गरज नसते.
सूर्य दररोज शांतपणे उगवतो आणि संपूर्ण जग उजळवतो. बीज मातीच्या गर्भात निःशब्दपणे रुजतं आणि पुढे विशाल वृक्ष बनून सावली देतं. त्याचप्रमाणे आयुष्यातील महान यशही शांत, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांतूनच जन्माला येतं. आपल्या ध्येयासाठी न बोलता, न थकता आणि न डगमगता केलेला संघर्षच एका दिवसात व्यक्तिमत्त्वाला तेजस्वी बनवतो.
आयुष्याचं खरं सौंदर्य सर्व काही मिळवण्यात नसतं; तर जे आहे त्यात समाधान शोधतं , जे हवं आहे त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत जगण्यात असतं. कारण वेळ प्रत्येक जखमेवर मलम लावते, संघर्ष प्रत्येक माणसाला परिपक्व बनवतो आणि शांतपणे केलेली मेहनतच शेवटी यशाच्या शिखरावर नेऊन उभी करते.
म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा ,मित्रांनो..परिस्थितीचा स्वीकार करा, मनावरचं अनावश्यक ओझं हलकं करा आणि आपल्या स्वप्नांसाठी शांतपणे, सातत्याने चालत राहा. कारण आकाशाला भिडणारे पर्वतही एका दिवसात उभे राहत नाहीत; त्यामागे असतात हजारो वर्षांची निःशब्द तपश्चर्या आणि संयम..
-एक संवेदनशील जीवन प्रवाशी..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment