कागदावर लोकशाही,
आणि रस्त्यावर दडपशाही...!
प्रश्न विचारणारा नागरिक,
आज ठरतो क्षणातच "देशद्रोही"...!
हा कोणता न्याय?
हा कोणता विकास?
मतभेदांना बेड्या घालणं,
हाच का लोकशाहीचा श्वास?
ज्यांच्या हाती संविधान,
त्यांच्याच हातून त्याचा अपमान,
शब्दांना लावले जातात कुलूप,
आणि खोट्याला मिळतो सिंहासन.
लाठीने विचार मरत नाहीत,
गोळ्यांनी सत्य झुकत नाही,
इतिहास साक्षी आहे,
हुकूमशाही कधीच टिकत नाही.
सत्याचा आवाज दाबणारे,
सत्तेच्या मादात हरवून जातात,
पण विवेकाची एक ठिणगी,
साम्राज्यांची राख करून जाते.
लोकशाही म्हणजे जयजयकार नाही,
लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचं धैर्य,
सत्तेला आरसा दाखवणं म्हणजे
देशद्रोह नव्हे..तेच नागरिकाचं कर्तव्य.
जो सत्तेपुढे नतमस्तक होतो,
तो गुलाम म्हणून ओळखला जातो,
जो अन्यायासमोर ताठ उभा राहतो,
तोच खरा देशभक्त ठरतो.
लक्षात ठेवा...
संविधान जिवंत असेल, तर प्रश्न जिवंत राहतील,
आणि प्रश्न जिवंत असतील,
तरच लोकशाही जिवंत राहील..
कारण...
देश सत्तेने महान होत नाही;
देश महान होतो जागृत,
निर्भय आणि विवेकी नागरिकांनी..!
-एक विद्रोही..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख.. ✍️
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment