🎓 हातात पदवी नाही, खिशात पैसा नाही, पण डोक्यात विचार, ओठांवर संविधान आणि काळजात सामान्य माणसाच्या वेदना आहेत...!
“ शिक्षणाची खरी ओळख भिंतीवर लटकलेल्या पदवीत नसते तर ती अन्यायासमोर प्रश्न विचारणाऱ्या विवेकात, स्वतःच्या हक्कांची जाणीव असलेल्या स्वाभिमानात आणि दुसऱ्याच्या वेदनेसाठी धडधडणाऱ्या संवेदनशील मनात असते.”
दिल्लीच्या जंतर-मंतरवर गर्दी होती...घोषणा होत्या. आंदोलन होतं. माध्यमांचे कॅमेरे होते. विद्यार्थी, कार्यकर्ते आणि असंख्य चेहरे होते...
पण त्या गर्दीतून अचानक एक साधा चेहरा देशाच्या नजरेत भरला.
ना तो मोठा नेता होता,
ना प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता,
ना विद्यापीठातील प्राध्यापक,
ना त्याच्या नावामागे पदव्यांची लांबलचक माळ होती...
तो होता दिल्लीच्या कष्टकरी वस्तीत राहणारा एक सामान्य फेरीवाला.. मोहम्मद इरफान..!🌹
आणि काही मिनिटांत त्याच्या शब्दांनी एक असामान्य प्रश्न देशासमोर उभा केला...“खरंच सुशिक्षित कोण...? ज्याच्याकडे पदवी आहे तो, की ज्याच्याकडे विवेक आहे तो?”
🎓 शाळेचा वर्ग सुटला..पण आयुष्याचा वर्ग कधीच सुटला नाही...!
मोहम्मद इरफान यांना औपचारिक शालेय शिक्षणाची संधी जवळजवळ मिळालीच नाही. आयुष्याने त्यांच्या हातात पुस्तकाऐवजी कष्ट दिले, पेनाऐवजी हातगाडी दिली आणि वर्गखोलीऐवजी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रस्त्यांचं विद्यापीठ दिलं.
दिल्लीतील Sawda JJ Colony परिसरात राहणारा हा सुमारे 35 वर्षांचा माणूस हातगाडी, फेरी आणि मजुरीच्या आधारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
पण परिस्थितीने त्याला शाळेपासून दूर ठेवलं म्हणून त्याने ज्ञानापासून स्वतःला दूर ठेवलं नाही.
वाचता-लिहिता येण्याच्या मर्यादा होत्या..पण जाणून घेण्याची भूक अमर्याद होती.
मग तंत्रज्ञान त्याचं पुस्तक बनलं..
मोबाईल त्याची ग्रंथालयाची खिडकी बनली..
Google Voice Search आणि YouTube त्याचे शिक्षक झाले.
तो प्रश्न विचारत गेला, ऐकत गेला, समजून घेत गेला. संविधान काय सांगतं, लोकशाही म्हणजे काय, कामगारांचे अधिकार काय, समानता म्हणजे काय, धर्म आणि राजकारण यांचं नातं काय, गरीब माणसाच्या श्रमाची किंमत काय..हे तो स्वतःच्या पद्धतीने शिकत राहिला.
आणि म्हणूनच मोहम्मद इरफानची कथा आपल्याला सांगते,
“शाळा चुकली म्हणून शिक्षण संपत नाही, पण प्रश्न विचारणं थांबलं, तर मात्र माणसाचं शिकणं नक्कीच संपतं.”
🔥 जंतर-मंतरवर एक सामान्य माणूस बोलला... आणि देश ऐकू लागला..!😱
जून 2026 मधील शेवटच्या आठवड्यात..दिल्लीच्या जंतर-मंतर आंदोलनात मोहम्मद इरफानचा चेहरा दिसू लागला..
The Lallantop चे पत्रकार रजत पांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कॅमेरा सुरू झाला...आणि समोरच्या माणसाने जे बोलायला सुरुवात केली, त्याने अनेकांच्या तथाकथित ‘सुशिक्षितपणा’ला आरसा दाखवला.
इरफान राजकीय शब्दांची कसरत करत नव्हता.. तर तो आपल्या जगण्याची भाषा बोलत होता.
गरीब माणसाची वेदना, कामगारांचा सन्मान, योग्य मजुरी, आरोग्यसेवा, विषमता, धर्म, लोकशाही, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि संविधान..एकामागून एक विषय त्याच्या बोलण्यात येत गेले...त्याच्या आवाजात एखाद्या प्रशिक्षित वक्त्याचा दिखावा नव्हता तर अनुभवातून आलेली धार होती...
त्याच्या शब्दांत पुस्तकातील पाठांतर नव्हतं तर जगलेल्या आयुष्याची राख आणि वास्तवाची धग दिसत होती..
आणि म्हणून त्याची मुलाखत सोशल मीडियावर तुफान पसरली.
दहा लाखांहून अधिक लोकांनी त्याचा संवाद पाहिला. राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनीही त्याच्या क्लिप्स शेअर केल्या..
एका फेरीवाल्याचा आवाज अचानक देशाच्या राजकीय-सामाजिक चर्चेचा विषय झाला...पण खरं पाहिलं तर इरफान एका दिवसात विद्वान झाला नव्हता; एका दिवसात फक्त देशाला त्याचा विवेक दिसला होता.
✊ “इरफान नाही... मोहम्मद इरफान!”
त्याच्या पुढील संवादातील एक छोटासा प्रसंग मात्र त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची उंची सांगून जातो.
पत्रकाराने त्याला ‘इरफान’ म्हटलं...त्याने शांतपणे दुरुस्ती केली,
“माझं नाव मोहम्मद इरफान आहे.”
ही केवळ नावाची दुरुस्ती नव्हती.तर त्याच्या मते, त्या पूर्ण नावासोबत जगण्याचा एक अनुभव होता; त्या ओळखीसोबत सत्य बोलण्याची एक किंमत होती.
स्वतःची ओळख लपवून स्वीकार मिळवण्यापेक्षा, स्वतःच्या नावासह सत्य बोलण्याचा त्याचा आग्रह अनेकांना भिडला.
कारण.... " स्वाभिमान म्हणजे दुसऱ्याचा अपमान नव्हे, तर कोणाच्याही दबावाखाली स्वतःची ओळख, अस्तित्व आणि मूल्ये नाकारण्यास ठाम नकार देणे होय.”
📜 हातात संविधानाची पदवी नाही; पण मनात संविधानाची जाणीव आहे...
इरफानच्या बोलण्यातली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्याची लोकशाहीबद्दलची प्रगल्भ समज...
त्याच्यासाठी लोकशाही म्हणजे पाच वर्षांतून एकदा मतदान करून शांत बसणे नाही.
लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार.
लोकशाही म्हणजे सत्तेशी संवाद करण्याचं स्वातंत्र्य.
लोकशाही म्हणजे मतभेद असतानाही माणसाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याची व्यवस्था.
आणि संविधान म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेसाठी पाठ करायचा विषय नाही,ते सामान्य नागरिकाच्या सन्मानाची हमी देणारं मूल्यविश्व आहे.
हीच बाब इरफानला वेगळं करते.
त्याच्याकडे संविधानशास्त्राची पदवी नाही..पण संविधानाने दिलेल्या नागरिकत्वाची जाणीव आहे.
आणि कधी कधी पुस्तकात संविधान वाचणाऱ्यांपेक्षा आयुष्यात संविधान शोधणारा माणूस त्याचा अर्थ अधिक तीव्रतेने सांगून जातो.
🌹 प्रसिद्धी आली... नेता घरी आला..पण भूमिका बदलली नाही...
इरफानच्या व्हायरल संवादांची चर्चा इतकी वाढली की लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या घरी भेटायला गेले.
पण इथेही इरफानच्या भूमिकेतील एक बाब महत्त्वाची ठरते.
त्याने स्वतःसाठी नोकरी, पैसा किंवा व्यक्तिगत फायदा मागण्याऐवजी कामगार आणि गरीबांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे.
त्याने आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा आंधळा समर्थक नसल्याची भूमिका मांडली.
“ हीच तर लोकशाहीची खरी सौंदर्यरेषा आहे..जिथे सत्तेपेक्षा सत्य मोठं असतं, व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ असतो आणि प्रत्येक नागरिकाचा निर्भय आवाज हा संविधानाचा जिवंत श्वास बनतो..!”
नेत्याच्या जवळ गेल्यावर प्रश्न विसरणं म्हणजे भक्ती..नेता आपल्या घरी आला तरी प्रश्न विचारण्याचं धैर्य टिकवणं म्हणजे नागरिकत्व..!
समर्थन व्यक्तीला नव्हे, मूल्यांना असलं पाहिजे, असं मला वाटतं मित्रांनो..
विरोधही व्यक्तीद्वेषातून नव्हे, तर धोरणांच्या चिकित्सेतून असला पाहिजे.
“ कारण लोकशाहीच्या मंदिरात नागरिकाने कोणत्याही नेत्याच्या भक्तीचा हार गळ्यात घालण्याची किंवा द्वेषाची तलवार हातात घेण्याची गरज नसते; त्याने फक्त विवेकाचा दिवा हाती घेऊन संविधानाच्या मूल्यांचा जागता पहारेकरी बनून उभं राहणं आवश्यक असतं..!”
💔 इरफानची कथा प्रेरणा देते... पण त्याआधी ती आपल्याला अस्वस्थही करते..!
आपण मोहम्मद इरफानकडे फक्त ‘व्हायरल हिरो’ म्हणून पाहिलं, तर त्याच्या कथेचा खरा अर्थ हरवून जाईल.
कारण ही कथा फक्त एका माणसाच्या बुद्धिमत्तेची नाही, तर ही कथा काही कठोर प्रश्न विचारते..
इतकी वैचारिक क्षमता असलेल्या माणसाला शाळा का मिळाली नाही..?
जगण्याची एवढी समज असलेल्या नागरिकाला हातगाडीवर आयुष्य का ढकलावं लागतं..?
प्रतिभा आणि संधी यांच्यात एवढी मोठी दरी का आहे..?
इरफानची कथा सांगून आपण व्यवस्थेचं अपयश झाकता कामा नये.
कारण प्रत्येक इरफानला Google Voice Search च्या आधारावर स्वतःचं विद्यापीठ उभं करावं लागू नये.
प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शाळा मिळाली पाहिजे.
प्रत्येक हाताला सन्मानाचं काम मिळालं पाहिजे.
प्रत्येक श्रमिकाला न्याय्य मोबदला मिळाला पाहिजे.
आणि प्रत्येक नागरिकाला आपला आवाज निर्भयपणे मांडता आला पाहिजे.
हीच खरी लोकशाही आणि हीच संविधानाशी प्रामाणिक निष्ठा..!
🎓 पदवी आणि शिक्षण यातला फरक समजून घ्यायला हवा...
इरफानची कथा औपचारिक शिक्षण निरुपयोगी आहे, असा संदेश अजिबात देत नाही.
उलट ती शिक्षणव्यवस्थेला अधिक मोठी जबाबदारी सांगते.
आपल्याला फक्त पदवीधर निर्माण करायचे आहेत का, की विवेकी नागरिक?
फक्त नोकरी शोधणारे युवक घडवायचे आहेत का, की स्वतःचे आणि समाजाचे प्रश्न समजणारे संवेदनशील युवक?
परीक्षेत संविधानाची प्रस्तावना लिहिणारे विद्यार्थी पुरेसे आहेत का, की आयुष्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जगणारी पिढी घडवायची आहे..?
कारण...
पदवी माणसाच्या नावामागे लिहिली जाते..पण शिक्षण त्याच्या विचारांतून दिसतं.
प्रमाणपत्र भिंतीवर टांगता येतं..पण विवेक कृतीतून सिद्ध करावा लागतो.
आणि शाळा आपल्याला अक्षरांची ओळख करून देते; जीवन त्या अक्षरांना अर्थ कसा द्यायचा हे शिकवतं..
🌿 म्हणून मोहम्मद इरफान महत्त्वाचा आहे...
तो प्रसिद्ध झाला म्हणून नव्हे.
त्याला मोठ्या नेत्याने भेट दिली म्हणूनही नव्हे.
त्याच्या व्हिडिओला लाखो views मिळाले म्हणून तर अजिबात नाही.
मोहम्मद इरफान महत्त्वाचा आहे कारण त्याने सिद्ध केलं,
" परिस्थिती तुमच्या हातातून शाळा हिरावून घेऊ शकते; पण शिकण्याची जिद्द हिरावून घेऊ शकत नाही."
गरिबी तुमच्या खिशाला रिकामं करू शकते; पण विचारांना गरीब ठेवायचं की नाही, हे काही प्रमाणात तुमच्यावरही अवलंबून असतं.
आणि सत्ता कितीही मोठी असली, तरी संविधानाने दिलेला नागरिकाचा प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याहून मोठा असतो...
आजच्या तरुणाईला अशाच जागरूकतेची गरज आहे, मित्रांनो..
अंध समर्थन नको, चिकित्सक विचार हवा.
अंधविरोध नको, विवेकपूर्ण प्रश्न हवेत.
धर्मद्वेष नको, माणुसकी हवी.
गुलामी नको, स्वाभिमान हवा..
आणि केवळ ‘मी’पुरता विचार नको; ‘आपण’ या शब्दाची सामाजिक जाणीव हवी.
✊ शेवटी एवढंच...✍️
मोहम्मद इरफानची कथा वाचताना त्याच्यावर केवळ कौतुकाची फुलं उधळू नका.
क्षणभर स्वतःलाही प्रश्न विचारा..
आपण शाळेत गेलो...
आपण महाविद्यालयात गेलो...
आपल्याकडे पदव्या आल्या...
आपल्या हातात इंटरनेट आलं...
पण आपल्या विचारांत विवेक आला का?
संविधान आपल्या पुस्तकातून आपल्या वर्तनात उतरलं का?
दुसऱ्याच्या अन्यायाने आपलं मन अस्वस्थ होतं का?
सत्तेला प्रश्न विचारताना आणि आपल्या आवडत्या नेत्याची चूक दाखवताना आपला न्यायाचा निकष समान राहतो का?
जर उत्तर ‘होय’ असेल, तर आपलं शिक्षण सार्थक आहे.
आणि नसेल तर...
शाळेची पायरी न चढलेला मोहम्मद इरफान कदाचित आपल्या पदव्यांपेक्षा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा करून गेला आहे.
🔥 सलाम मोहम्मद इरफानच्या जिद्दीला...
सलाम त्याच्या स्वाभिमानाला...आणि सर्वांत महत्त्वाचं.. सलाम त्याच्या प्रश्न विचारणाऱ्या विवेकाला..!
कारण लोकशाहीला मुक्या अनुयायांची नव्हे,तर जागरूक, संवेदनशील आणि प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांची गरज असते..!
🇮🇳 जय भीम..!जय भारत..! जय संविधान.. 🙏
टीप : वरील लेख विविध माहितीस्रोतांवरून संकलित केलेलं संपादन आहे.
-शब्दांकन.. ✍️
- एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#MohammadIrfan #मोहम्मदइरफान #IrfanViral #MohammadIrfanViral #VoiceOfCommonMan #आमआदमीकीआवाज #जनतेचाआवाज #VoiceOfDemocracy #लोकशाही #Democracy #IndianDemocracy #ConstitutionOfIndia #IndianConstitution #संविधान #जयसंविधान #संविधानप्रेमी #WeThePeople #WeThePeopleOfIndia #ConstitutionalValues #लोकशाहीचापहरेकरी #जागरूकनागरिक #ResponsibleCitizen #QuestionThePower #प्रश्नविचारा #विवेक #विवेकवादी #RationalThinking #CriticalThinking #स्वाभिमान #SelfRespect #FreedomOfSpeech #RightToQuestion #SocialJustice #सामाजिकन्याय #Equality #समानता #मानवता #HumanityFirst #WorkersRights #कामगारांचाआवाज #गरीबांचाआवाज #EducationBeyondDegree #RealEducation #शिक्षणम्हणजेविवेक #DegreeVsEducation #संघर्षातूनशिक्षण #LifeIsTheBestTeacher #NeverStopLearning #जिद्द #संघर्ष #प्रेरणादायी #वैचारिक #प्रबोधनात्मक #GenZ #GenZIndia #जंतरमंतर #JantarMantar #Delhi #ViralStory #ViralIndia #TrendingIndia #InspiringIndia #जयभीम #JaiBhim #JaiBharat #JaiSamvidhan #TheSpiritOfZindagi #विद्यार्थीमित्र #DrAPJAbdulKalamFoundation #parbhanicity
Post a Comment