🌿 आयुष्याच्या एका वळणावर... ✍️
“ परिपक्वता म्हणजे आयुष्यात अधिकाधिक माणसं जोडत जाणं नव्हे; तर कोणत्या माणसांना, कोणत्या गोष्टींना आणि कोणत्या विचारांना आपल्या आयुष्यात किती जागा द्यायची, याचं भान येणं.”
आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर एक सत्य खूप तीव्रतेने जाणवू लागतं...आपला वेळ अमर्याद नाही आणि आपली ऊर्जा अक्षय नाही.
मग अचानक लक्षात येतं की प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते, प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपली नसते, प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आवश्यक नसतं आणि केवळ जुन्या आहेत म्हणून प्रत्येक ओळखीला व नात्याला आयुष्यभर खांद्यावर वाहून नेण्याचीही गरज नसते.
कारण आयुष्य म्हणजे प्रत्येकाला खूश ठेवण्याची स्पर्धा नाही; ते स्वतःला समजून घेत, योग्य माणसांना जपत आणि अर्थपूर्ण ध्येयांसाठी आपली मर्यादित ऊर्जा वापरत पुढे जाण्याचा प्रवास आहे.
कदाचित वयाच्या पस्तिशीच्या आसपास ही जाणीव मनाच्या दारावर पहिली टकटक करू लागते. पण ती स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करण्यासाठी आणखी काही काळ जावा लागतो. आणि हे सत्य स्वीकारल्यानंतरही कोणताही अपराधभाव न बाळगता, कोणाचीही अनावश्यक भीड-मुर्वत न ठेवता त्याप्रमाणे जगायला शिकण्यासाठी आणखी काही अनुभवांची किंमत मोजावी लागते.
ही जाणीव एका रात्रीत जन्माला येत नाही.
ती एखाद्या नदीसारखी मनाच्या दरीत हळूहळू आपला मार्ग कोरत जाते. समाजमाध्यमांवरील एखाद्या निरर्थक वादानंतर आलेला मानसिक थकवा, अर्धा तास विनाकारण स्क्रीन स्क्रोल केल्यानंतर जाणवणारं रिकामपण, एखाद्या जुजबी ओळखीच्या व्यक्तीशी बोलून झाल्यानंतर मनावर आलेला कंटाळा, ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आलेली चिडचिड आणि पुढच्याच क्षणी त्या चिडचिडीची जाणवलेली निरर्थकता..हे सगळे आयुष्य आपल्याला देत असलेले छोटे छोटे इशारे असतात.
पण आपण ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित करत राहतो.
कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं..नाती जपा, माणसं सांभाळा, कोणाला दुखावू नका, प्रत्येकाशी जुळवून घ्या. हे मूल्य चुकीचं नाही; पण या शिकवणीत अनेकदा एक महत्त्वाचं वाक्य सांगायचं राहून जातं..
“इतरांना जपताना स्वतःला हरवू नका.”
आणि मग एक दिवस शरीर आणि मन दोन्ही एकाच वेळी स्पष्टपणे सांगतात..“आता पुरे..!”
तो क्षण नाती तोडण्याचा नसतो,तर तो स्वतःशी नातं जोडण्याचा असतो. तो माणसांपासून दूर जाण्याचा नसतो; तर आपल्या आयुष्यात कोणाला किती जवळ ठेवायचं याचा विवेक जागा होण्याचा क्षण असतो.
🌱 ‘नाही’ म्हणण्याचं स्वातंत्र्य...
इथून पुढचा प्रवास सोपा नसतो; पण तो अधिक खरा असतो.
सुरुवातीला अपराधीपणाची सावली सतत मागे फिरत राहते. कोणाच्या अशक्य मागणीला स्पष्टपणे ‘नाही’ म्हटलं की मन स्वतःलाच प्रश्न विचारत राहतं. काही वाद निरर्थक आहेत हे माहीत असूनही जुन्या सवयीने आपण त्यात उतरतो. काही नाती केवळ ‘इतकी वर्षे झाली’ म्हणून मंद आचेवर जिवंत ठेवत राहतो.
पण हळूहळू एक गोष्ट समजू लागते..
‘नाही’ म्हणणं म्हणजे समोरच्याचा अपमान करणं नव्हे; अनेकदा ते स्वतःच्या वेळेचा, ऊर्जेचा आणि मानसिक शांततेचा सन्मान करणं असतं.
प्रत्येक ‘हो’ची एक किंमत असते. कारण एखाद्या अनावश्यक गोष्टीला दिलेला ‘हो’ म्हणजे आपल्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीला नकळत दिलेला ‘नाही’ असतो.
म्हणून स्पष्ट नकार देण्याची कला शिकावी.
“बघू...”, “जमलं तर...”, “नंतर सांगतो...” अशा संदिग्ध उत्तरांनी आपण अनेकदा समोरच्याच्या अपेक्षा वाढवतो आणि स्वतःवर अनावश्यक ओझं ठेवतो. त्यापेक्षा जे शक्य नाही, योग्य नाही किंवा मनापासून करावंसं वाटत नाही त्याला नम्रपणे पण स्पष्टपणे नकार देता आला पाहिजे.
मर्यादा आखणं म्हणजे भिंती बांधणं नाही; आपल्या मानसिक घराला योग्य दरवाजे देणं आहे.
⏳ वेळ आणि ऊर्जेचंही बजेट असतं...
आपण पैशाचा हिशेब ठेवतो. महिन्याचं बजेट आखतो. कुठे किती खर्च करायचा याचा विचार करतो.
मग वेळ आणि ऊर्जेचा हिशेब का ठेवू नये?
पैसा गमावला तर पुन्हा कमावता येतो; पण निघून गेलेला एक तास जगातील कोणत्याही संपत्तीने परत विकत घेता येत नाही.
म्हणून दिवसाचं, आठवड्याचं आणि आयुष्याचंही एक ‘भावनिक बजेट’ असायला हवं.
कोणत्या व्यक्तीशी बोलल्यानंतर मन प्रसन्न होतं? कोणत्या भेटीनंतर ऊर्जा वाढते? कोणासोबत असताना स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासत नाही? आणि उलट कोणत्या व्यक्तीसोबत काही वेळ घालवल्यानंतर मन थकून जातं?
हे समजू लागलं की आयुष्याच्या अनेक निवडी आपोआप स्पष्ट होतात.
🍂 प्रत्येक जुनं नातं आयुष्यभराचं असेलच असं नाही...
जुन्या नात्यांकडे कृतज्ञतेने पाहावं; पण केवळ ती जुनी आहेत म्हणून त्यांना टिकवण्याची सक्ती स्वतःवर करू नये.
एखादं नातं दहा वर्षांपूर्वी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होतं, याचा अर्थ आजही त्याच नात्याला तितकीच जागा द्यावी असा कोणताही नियम नाही.
काही माणसं आयुष्यात कायम राहण्यासाठी येतात; काही माणसं आपल्याला काही शिकवण्यासाठी येतात; तर काही माणसं आपल्याला स्वतःची किंमत समजावून देऊन निघून जातात.
प्रत्येक प्रवाशाला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत घेऊन जाणं आवश्यक नसतं.
काही नाती आपलं कार्य पूर्ण करून शांतपणे मागे पडतात. त्यांना द्वेषाने तोडण्याची गरज नसते; कृतज्ञतेने निरोप देता येतो. कारण एखाद्या नात्याचा शेवट म्हणजे त्या नात्यातील सुंदर आठवणींचा अपमान नसतो.
कधी कधी पुढे जाणं हीसुद्धा कृतज्ञतेचीच एक परिपक्व भाषा असते.
🤝 गर्दीपेक्षा माणसं कमवा...
समाजमाध्यमांवर पाच हजार मित्र असणं आणि आयुष्यात पाच खरे मित्र असणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
आपलं सामाजिक किंवा व्यावसायिक वर्तुळ कितीही मोठं असो, खऱ्या आयुष्यातील विश्वासाच्या माणसांचं वर्तुळ बहुधा लहानच असतं.
ज्यांच्याशी बोलल्यानंतर मन हलकं होतं, ज्यांच्यासमोर आपल्याला मुखवटा घालावा लागत नाही, ज्यांच्यासमोर आपलं यश सिद्ध करण्याची गरज नसते आणि अपयश लपवण्याचीही आवश्यकता नसते..अशी माणसं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असली तरी पुरेशी असतात.
भोवती हजारोंची गर्दी असणं हे यश नाही; आयुष्य अंधारात असताना एका हाकेवर दिवा घेऊन येणारी चार-पाच माणसं असणं ही खरी श्रीमंती आहे.
आणि अशी माणसं मिळाली तर त्यांना वेळ द्या, जपा, त्यांच्या सुख-दुःखात उभे राहा. कारण खरी नाती ‘ऑनलाइन’ दिसत नाहीत; ती कठीण काळात ‘ऑन टाइम’ पोहोचतात.
🌿 स्वतःसोबतही थोडं जगायला शिका...
दिवसातील थोडा वेळ केवळ स्वतःसाठी राखून ठेवावा.
पहाटेची शांत वेळ, एक कप चहा, काही पानांचं वाचन, थोडं चालणं, ध्यान, व्यायाम, संगीत, चित्रकला, लेखन किंवा फक्त शांत बसणं..काहीही असो...
पण त्या वेळेत शक्यतो मोबाईल नसावा, स्क्रीन नसावी, नोटिफिकेशनचा गोंगाट नसावा.
कारण एकांत आणि एकटेपणा यात फरक असतो.
स्वतःच्या सहवासातला एकांत आपल्याला आतून समृद्ध करतो; तर स्क्रीनसमोरचा अखंड एकटेपणा अनेकदा आपल्याला आतून रिकामा करत जातो.
जगाशी सतत ‘कनेक्टेड’ राहण्याच्या नादात आपण स्वतःशीच ‘डिस्कनेक्ट’ होत नाही ना, हा प्रश्न अधूनमधून स्वतःला विचारला पाहिजे.
🧘 शरीराचंही ऐका...
शरीर हा मनाचा मुकपणे बोलणारा मित्र आहे.
पुरेशी झोप झाली नाही की मनाची सहनशक्ती कमी होते. शरीर थकलं की छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतात. नकोसे विचार सहज मनावर स्वार होतात आणि क्षुल्लक प्रसंगांवर अनावश्यक प्रतिक्रिया उमटतात.
साधं-सकस अन्न, पुरेशी झोप, नियमित हालचाल किंवा व्यायाम आणि स्वतःसाठी राखलेला थोडासा शांत वेळ..या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी मानसिक आणि भावनिक स्पष्टतेचा मजबूत पाया असतात.
थकलेल्या शरीरात शांत मन टिकवणं कठीण असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी आयुष्य बदलण्याची गरज नसते; कधी कधी फक्त थोडी विश्रांती घेण्याची गरज असते.
🌸 परंपरा जपा; पण स्वतःलाही जपा...
सण, समारंभ, कौटुंबिक प्रसंग आणि सामाजिक जबाबदाऱ्या आयुष्याचा भाग आहेत. जिथे मनापासून जावंसं वाटतं तिथे जरूर जावं, भरभरून वेळ द्यावा, आनंद घ्यावा.
जिथे कर्तव्य म्हणून उपस्थित राहणं आवश्यक आहे तिथेही जावं; पण आपल्या भावनिक मर्यादा ओळखून आवश्यक अंतर राखावं.
कारण प्रत्येक वेळी स्वतःला थकवून इतरांना खूश करणं म्हणजे संस्कार नव्हेत.
परंपरेचा आदर करताना स्वतःच्या मर्यादांचाही आदर करता आला पाहिजे.
🌳 आणि शेवटी—स्वतःला दोष देणं बंद करा...
कदाचित सर्वांत महत्त्वाची गोष्ट हीच आहे.
स्वतःच्या वेळेला, ऊर्जेला आणि मानसिक शांततेला प्राधान्य देणं हा स्वार्थ नाही. स्वतःला जपणं म्हणजे इतरांना नाकारणं नाही.
उलट, अनावश्यक ओझी खाली ठेवल्यावरच आपले हात खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींसाठी मोकळे होतात...आपल्या कुटुंबासाठी, खऱ्या मित्रांसाठी, ध्येयांसाठी, आरोग्यासाठी, स्वप्नांसाठी आणि स्वतःच्या अंतर्मनासाठी.
झाडावरची प्रत्येक फांदी जपणं म्हणजे झाड जपणं नव्हे. काही वाळलेल्या फांद्या वेळेवर छाटाव्याच लागतात; कारण त्यानंतरच नव्या पालवीला सूर्यप्रकाश मिळतो.
आयुष्याचंही तसंच आहे.
काही निरर्थक वाद सोडावे लागतात.
काही अपेक्षांना निरोप द्यावा लागतो.
काही नात्यांचं अंतर स्वीकारावं लागतं.
काही लोकांच्या मतांकडे दुर्लक्ष करावं लागतं.
आणि काही ठिकाणी कोणालाही स्पष्टीकरण न देता स्वतःची शांतता निवडावी लागते.
हे पलायन नसतं... तर ही परिपक्वता असते, बरं का..!
कारण आयुष्याच्या एका टप्प्यावर माणसाला उमगतं की प्रत्येक युद्ध लढण्यासाठी नसतं, प्रत्येक माणूस आपला नसतो, प्रत्येक मताला उत्तर द्यायचं नसतं आणि प्रत्येक अपेक्षेचं ओझं वाहायचं नसतं.
जगण्याची खरी कला अधिकाधिक गोष्टी गोळा करण्यात नाही; तर काय धरून ठेवायचं आणि काय शांतपणे सोडून द्यायचं, याचा विवेक विकसित करण्यात आहे.
आणि ज्या दिवशी हे उमगतं, त्या दिवशी आयुष्य बदलत नाही...आयुष्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
मनावरची गर्दी विरळ होते.
विचारांचा गोंगाट शांत होतो.
नात्यांची संख्या कमी झाली तरी त्यांची खोली वाढते.
आणि स्वतःसोबतचं नातं अधिक प्रामाणिक होतं.
मग पुढचा रस्ता कदाचित पूर्वीसारखाच असतो;
फक्त खांद्यावरची अनावश्यक ओझी नसतात.
आणि म्हणूनच तो रस्ता अधिक हलका, अधिक उजळ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे..अधिक ‘आपला’ वाटू लागतो...!
-एक संवेदनशील जीवनप्रवाशी...✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment