मागची बारा वर्षे भारतीय राजकारणासाठी केवळ सत्तांतराची किंवा एका पक्षाच्या विजयाची कहाणी नाही. हा काळ देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रवासातील अनेक मोठ्या बदलांचा साक्षीदार आहे. सत्ताधारी पक्ष या काळातील विकास, पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवस्था, कल्याणकारी योजना आणि शेतीसंबंधी उपाययोजनांची उपलब्धी मांडतो.. तर विरोधक रोजगार, महागाई, शेतकरी प्रश्न, सामाजिक अस्वस्थता आणि संस्थात्मक स्वायत्ततेसारखे प्रश्न उपस्थित करतात.
म्हणूनच आज प्रश्न फक्त “काँग्रेसचे काय झाले?” हा नसावा.
खरा प्रश्न आहे, " या बारा वर्षांत सामान्य भारतीयाच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला? "
शेतकऱ्याला उत्पादनाबरोबर योग्य भाव आणि स्थिर उत्पन्नाची हमी किती मिळाली?
कामगाराला कामाबरोबर सन्मान, सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षण किती मिळाले?
तरुणाला पदवी बरोबर स्थिर आणि गुणवत्तापूर्ण रोजगाराच्या संधी किती मिळाल्या?
मध्यमवर्गाला विकासाच्या घोषणां बरोबर महागाई, शिक्षण, आरोग्य आणि घरखर्चाचा वाढता भार किती हलका झाला?
व्यावसायिकाला धोरणांबरोबर स्थिरता आणि विश्वासाचे वातावरण किती मिळाले?
हे प्रश्न कोणत्याही एका पक्षाविरोधातील घोषणाबाजी म्हणून नव्हे, तर लोकशाहीतील नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नांप्रमाणे विचारले गेले पाहिजेत.
कारण सरकारे येतात-जातात..पक्षांची चिन्हे बदलतात..घोषणांचे सूर बदलतात..राजकीय भाष्याची भाषा बदलते…पण सामान्य माणसाच्या घरातील चूल, मुलाच्या हातातील पदवी, शेतकऱ्याच्या शेतातील पीक आणि तरुणाच्या डोळ्यातील भविष्य हीच खरी राष्ट्राची कसोटी आहे.
आज सरकारी आकडेवारीत शेती उत्पादन, कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि विविध योजनांची प्रगती अधोरेखित केली जाते. दुसरीकडे, रोजगाराच्या बाबतीत राष्ट्रीय आकडेवारीत बेरोजगारीचे प्रमाण वेगवेगळ्या वयोगटांमध्ये व राज्यांमध्ये वेगवेगळे असल्याचे दिसते.. त्यामुळे केवळ एकच आकडा घेऊन संपूर्ण देशाच्या अनुभवाचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
म्हणूनच प्रचारापेक्षा प्रश्न महत्त्वाचे, घोषणेपेक्षा परिणाम महत्त्वाचा आणि पक्षापेक्षा जनता महत्त्वाची...काँग्रेसकडे प्रश्न होते, आहेत आणि राहतील. भाजपकडेही आपल्या कामगिरीचे दावे आहेत. प्रत्येक सरकारचा हिशेब मागणे ही लोकशाहीविरोधी भूमिका नसून लोकशाहीची खरी ताकद आहे...आपण कोणत्याही पक्षाचे अंधसमर्थक न होता जागरूक नागरिक झालो पाहिजे.
कारण मत देताना फक्त एवढेचं पाहणे पुरेसे नाही की “कोण जिंकले?”आपण हेही विचारले पाहिजे, “जनतेच्या आयुष्यात काय जिंकले?”
शेवटी सत्ता ही राजकीय पक्षांची मालमत्ता नसते..सत्ता ही जनतेने दिलेली जबाबदारी असते...आणि म्हणूनच प्रश्न काँग्रेसचा असो, भाजपचा असो किंवा कोणत्याही पक्षाचा..जनतेच्या प्रश्नांवर प्रश्न विचारणे म्हणजे पक्षविरोध नव्हे..प्रश्न विचारणे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणे!
भावनेच्या लाटेत वाहून जाण्यापेक्षा तथ्यांच्या प्रकाशात विचार करूया.
नारे ऐकूया, पण हिशेबही मागूया..पक्ष पाहूया, पण धोरणेही तपासूया.
नेते पाहूया, पण आपल्या पुढच्या पिढीचे भविष्यही पाहूया.
कारण शेवटी “लोकशाहीत मत हे केवळ बटन दाबण्याचे साधन नसते,
ते सत्तेला प्रश्न विचारण्याचे आणि भविष्याची दिशा ठरवण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र असते.”
विचार करा… प्रश्न विचारा… तथ्य तपासा… आणि मगच निर्णय घ्या..!
-संविधानप्रेमी भारतीय.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment