ज्यांनी विकली लाज,
तेच मिरवतात सत्तेचा ताज..
ज्यांनी तत्त्वांना दिला तिलांजली,
तेच आज सांगतात नीतीची वाणी!
ज्यांच्या शब्दांना नाही धार,
कृतीत मात्र स्वार्थाचा बाजार..
जनतेच्या जखमांवर भाषणांची फुंकर,
आणि सत्तेसाठी बदलतात रंग हजार!
कालचा शत्रू आजचा मित्र होतो,
स्वार्थासाठी विचारांचा सौदा होतो..
तत्त्वांची होते रोज बोली,
आणि विवेकाची निघते डोली!
खुर्ची मोठी की माणूस लहान?
सत्तेपुढे का हरतो स्वाभिमान?
प्रश्न विचारणाऱ्यांना मिळतो दोष,
आणि मौन धरणाऱ्यांना मिळतो जोश..!
जनतेच्या मतांची किंमत असते,
पण ती फक्त निवडणुकीपुरती नसते..
मतदान करून कर्तव्य संपत नाही,
लोकशाही जागी असेल तरच सत्ता मर्यादा ओलांडत नाही..!
चेहरे बदलतात, झेंडे बदलतात,
घोषणांचे सूरही रोज बदलतात..
पण जनतेच्या प्रश्नांची तीच कहाणी..
महागाई, बेरोजगारी आणि अस्वस्थ तरुणाई!
आरशाला दोष देऊन चेहरा बदलत नाही,
सत्य दडवल्याने वस्तुस्थिती बदलत नाही..
लोकशाहीला फक्त नेते नकोत,
तिला जागरूक नागरिकही हवेत..
ज्यांच्या विवेकाला स्वार्थ विकत घेऊ शकत नाही..!
कारण सत्ता येते… सत्ता जाते,
काळाच्या ओघात चेहरे विरून जातात..
पण इतिहासाच्या पानांवर शेवटी
पद नाही..कर्म बोलतं,
घोषणा नाही..आचरण बोलतं!
म्हणून प्रश्न राजकारणाचा नाही,
प्रश्न आपल्या विवेकाचा आहे,
कोण राज्य करतो यापेक्षा मोठा प्रश्न,
आपण कोणत्या मूल्यांसाठी उभे आहोत,
याचा आहे..!
जिथे स्वार्थाला मिळतो मान,
तिथे लोकशाही होते बेजान,
जिथे विवेक जागतो जनमानसात,
तिथे सत्तेलाही जपावी लागते संविधानाची शान..!
राजकारण बदलण्याआधी
नागरिकांचा विचार बदलला पाहिजे..
कारण लोकशाहीची खरी ताकद
सत्तेच्या सिंहासनात नसते,
ती जागृत जनतेच्या मनात असते!
— विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख.. ✍️
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment