🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग : क्रांतीची मशाल आजही तेवती आहे!
“क्रांतीची तलवार विचारांच्या धारेवर तेज होते.” — भगतसिंग
आज शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना केवळ त्यांच्या शौर्याची आठवण करून चालणार नाही.. तर त्यांच्या विचारांची चिकित्सा, त्यांचा वैचारिक वारसा आणि आजच्या समाजासाठी त्यांची प्रासंगिकता समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
भगतसिंग म्हणजे केवळ हातात बॉम्ब घेऊन साम्राज्यशाहीला आव्हान देणारा तरुण नव्हता. तो वाचन करणारा, प्रश्न विचारणारा, तर्कशुद्ध विचार करणारा, सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणारा आणि स्वातंत्र्याचा अर्थ व्यापक सामाजिक न्यायाशी जोडणारा विचारवंत होता.
🔥 स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्ता बदल नव्हे..!
भगतसिंगांच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय राजवट संपवणे इतकाच मर्यादित नव्हता. माणसामाणसातील शोषण, अन्याय, विषमता आणि गुलामी संपवणे हेदेखील स्वातंत्र्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
त्यांनी समाजातील आर्थिक विषमता आणि शोषणाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले. त्यामुळे त्यांचा संघर्ष केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध नव्हता. तो अन्यायाच्या प्रत्येक व्यवस्थेविरुद्ध उभे राहण्याच्या विचारांचा होता.
📚 बंदुकीपेक्षा विचारांची ताकद मोठी..!
भगतसिंगांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वैचारिक भूक..त्यांनी विविध विषयांचा अभ्यास केला, पुस्तके वाचली, राजकीय-सामाजिक विचार समजून घेतले आणि आपल्या भूमिकेवर चिकित्सकपणे विचार केला. त्यांच्या लेखनातून तर्क, विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसते.
आज माहितीचा महास्फोट झाला आहे..पण माहिती वाढली म्हणून विचारशक्ती वाढतेच असे नाही..सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक व्हायरल संदेशावर विश्वास ठेवण्याऐवजी प्रश्न विचारणे, पुरावा तपासणे आणि विवेकाने मत बनवणे हीच भगतसिंगांना खरी आदरांजली ठरू शकते.
🕯️ त्यांचे बलिदान : इतिहासातील अमिट अध्याय..
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. 23 मार्च 1931 रोजी त्यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली..त्यांचे वय अत्यंत कमी होते..पण त्यांच्या विचारांची व्याप्ती विलक्षण मोठी होती.
फासाचा दोर समोर असतानाही मृत्यूला न घाबरणारा हा तरुण भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील धैर्य, त्याग आणि निर्भयतेचे प्रतीक बनला.
त्यांच्या बलिदानाने एका पिढीला हादरवले, जागे केले आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाला नवी ऊर्जा दिली.
⚡ आज भगतसिंगांची गरज का आहे?
आज आपल्यासमोर ब्रिटिश साम्राज्य नाही..पण अज्ञान, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता, बेरोजगारी, शैक्षणिक असमानता, द्वेषाचे राजकारण, जातीय भेदभाव आणि खोट्या माहितीचे आव्हान आहे.
अशा परिस्थितीत भगतसिंगांचा वारसा आपल्याला काही मूलभूत प्रश्न विचारतो..
आपण प्रश्न विचारतो का?
आपण सत्य तपासतो का?
अन्याय दिसला तर आवाज उठवतो का?
आपल्या विचारांशी प्रामाणिक राहतो का?
समाजातील शेवटच्या माणसाच्या हक्कांचा विचार करतो का?
या प्रश्नांची उत्तरेचं आजच्या भारतातील आपल्या नागरिकत्वाची खरी परीक्षा आहेत.
#तरुणांनी भगतसिंगांकडून काय शिकावे..?
भगतसिंगांच्या जीवनाकडे केवळ “देशासाठी प्राण देणारा क्रांतिकारक” म्हणून पाहणे अपुरे आहे.
भगतसिंगांकडून आजच्या तरुणांनी केवळ शौर्य आणि बलिदानाची प्रेरणा घेऊ नये, तर विचारांची मशाल हातात घ्यावी. वाचनाची सवय जोपासावी, प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक नजरेने पाहत प्रश्न विचारण्याचे धैर्य विकसित करावे आणि अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य द्यावे. अन्याय दिसला की मौन धारण न करता संवेदनशील मनाने त्याविरुद्ध उभे राहावे.गर्दीच्या विचारांमध्ये वाहून न जाता स्वतःचा स्वतंत्र विचार घडवावा. भावनांना विवेकाची आणि उत्साहाला तर्काची जोड द्यावी. कारण खरे देशप्रेम केवळ घोषणांच्या गजरात नसते.. ते संविधान, समता, न्याय, बंधुता आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा सन्मान करणाऱ्या जबाबदार नागरिकत्वात असते. हाच भगतसिंगांच्या विचारांचा खरा वारसा आणि त्यांच्या स्मृतीला वाहिलेली खरी आदरांजली आहे.
कारण देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा देणे नाही.देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान, न्याय आणि समान संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे ही.देखील देशभक्तीच आहे.
भगतसिंगांना हार घालणे सोपे आहे..पण त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात स्थान देणे कठीण आहे.त्यांचा फोटो लावणे सोपे आहे..पण अन्यायाविरुद्ध उभे राहणे कठीण आहे.
त्यांचे नाव घेणे सोपे आहे..पण स्वतःच्या पूर्वग्रहांवर प्रश्न उपस्थित करणे कठीण आहे...म्हणूनच भगतसिंगांची जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस न राहता आत्मपरीक्षणाचा दिवस झाली पाहिजे.
आज त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होताना आपण एवढेच ठरवूया,
“ विचारांना कुलूप लावणार नाही,
प्रश्नांना गप्प बसवणार नाही,
अन्यायासमोर मान झुकवणार नाही..
आणि शिक्षण, विवेक, समता व न्याय
यांची मशाल पुढे नेत राहू!”
शहीद भगतसिंगांचे शरीर काळाच्या पडद्याआड गेले..पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत..कारण माणसे मरतात, सत्ता बदलतात, काळ पुढे जातो..पण समाजाला प्रश्न विचारायला शिकवणारे विचार कधी मरत नाहीत.
🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏
इन्कलाब जिंदाबाद! विचार जिंदाबाद! मानवता जिंदाबाद!
-त्यांचा एक वैचारिक चाहता.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment