अंधःकाराने वेढलेल्या मध्ययुगीन काळात, परंपरांच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला नवा प्रकाश देणारे महात्मा बसवेश्वर हे केवळ संत नव्हते, तर ते काळाच्या पुढे चालणारे एक प्रखर विचारवंत, समाज संरचनाकार आणि परिवर्तनाचे ध्रुवतारा होते.
त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना, श्रमाला दिलेली प्रतिष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्भीड जाणीव आणि लेखन स्वातंत्र्याची उंची आजच्या विकसित होत असलेल्या भारतालाच नव्हे, तर दिशाहीन होत चाललेल्या ‘जेन झी’ पिढीलाही आत्मशोधाचा मार्ग दाखवणारी आहे.
वीरशैव-लिंगायत परंपरेचा वारसा लाभलेले बसवेश्वर स्थितप्रज्ञ योगी, आत्मानुभूतीने उजळलेले संत, संवेदनशील कवी आणि भारतीय संत परंपरेतील प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून उभे राहतात.
मानवी कल्याणाला अधिष्ठान मानून त्यांनी समाज परिवर्तनाचा जो वसा घेतला, तो केवळ धार्मिक नव्हता, तर तो मूलत: मानवतावादी आणि तत्त्वनिष्ठ होता. परंपरेचे अंधानुकरण न करता तिचे चिकित्सक मंथन करीत त्यांनी जनमानसात रुजलेल्या श्रद्धा-प्रतीकांना नवा आशय दिला.
समविचारी शिव शरणांच्या सहकार्याने त्यांनी तत्कालीन समाजाला नव्या विचारांचे वळण दिले. म्हणूनच त्यांचे कार्य कोणत्याही एका संप्रदायापुरते किंवा भौगोलिक सीमांपुरते मर्यादित राहत नाही; तर ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक ठरते.
बसवेश्वरांचे व्यक्तिमत्त्व हे कार्यकर्तेपण, तत्त्वचिंतन आणि समाज शिक्षण यांचा विलक्षण संगम होते. त्यांनी सामान्य माणसाच्या भाषेत संवाद साधत धर्मातील मध्यस्थीपणाला धक्का दिला. देव आणि भक्त यांच्यातील कृत्रिम भिंती पाडून त्यांनी थेट आध्यात्मिकतेचा मार्ग खुला केला.
पारंपरिक कर्मकांडांच्या जंजाळातून मुक्त करताना त्यांनी ‘इष्टलिंगधारणा’चा साधा, सुलभ आणि आत्मानुभवावर आधारित मार्ग सुचवला, जो समताधिष्ठित समाजनिर्मितीचा पाया ठरला.
'अनुभवमंटप' ही संकल्पना त्यांच्या विचारक्रांतीची केंद्रबिंदू ठरली. येथे विचारांचे मुक्त आदानप्रदान होत असे, जिथे लिंग, जात, भाषा, प्रदेश किंवा व्यवसाय यांचे बंधन नव्हते. या प्रयोगातून समरस, मानवतावादी समाजाची बीजे रोवली गेली. ‘कायकवे कैलास’ या त्यांच्या घोषणेतून त्यांनी श्रमाला केवळ आर्थिक नव्हे, तर आध्यात्मिक उंची दिली.
कार्ल मार्क्स यांच्या आधीच त्यांनी श्रमाच्या प्रतिष्ठेचा जागर करून समाजव्यवस्थेला नवा विचार दिला.
जात आणि व्यवसाय यांची कृत्रिम सांगड त्यांनी ठामपणे नाकारली. समाजाचा विकास हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अवलंबून असतो, हे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडण्याचा अधिकार असावा, आणि कोणताही व्यवसाय कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नसतो, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रासंगिक आहे.
“ माझ्याहून नीच नाही कुणीही; शिवभक्ताहून श्रेष्ठ नाही कुणीही.” हा त्यांचा समतावादी दृष्टिकोन मानवी आत्म सन्मानाची पराकाष्ठा दर्शवतो.
‘कायक आणि दासोह’ या तत्त्वांद्वारे त्यांनी कर्मयोगाला सामाजिक जबाबदारीची जोड दिली. स्वतःच्या श्रमावर जगणे आणि आपल्या श्रमाचे फळ समाजासाठी अर्पण करणे, ही त्यांची भूमिका केवळ नैतिक नव्हे, तर आर्थिक दृष्ट्याही क्रांतिकारी होती. श्रमाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका सामाजिक न्यायाची पायाभरणी करणारी ठरते.
वास्तववादाचा स्वीकार करत त्यांनी स्वर्ग-नरकाच्या संकल्पना पृथ्वीतलावरच अनुभवल्या जातात, असे सांगितले. त्यांच्या या विचारांमुळे समाजातील अनेकांनी आपल्या अहंकाराचा त्याग करून समतेच्या मार्गाचा स्वीकार केला.
प्रतिलोम विवाह, जातिभेदाला दिलेले आव्हान आणि आत्मसामर्थ्याची जाणीव या सर्व बाबींमुळे समाजात परिवर्तनाची नवी लाट निर्माण झाली.
तथापि, हा परिवर्तनवाद तत्कालीन कर्मठ व्यवस्थेला रुचला नाही. परिणामी ‘कल्याण क्रांती’सारखी विध्वंसक घटना घडली. पण या विरोधानेही बसवेश्वरांचा निर्धार डळमळीत झाला नाही. त्यांनी संघर्षाला सामोरे जात आपला मार्ग अखंडपणे चालू ठेवला. त्यांच्या या धैर्यशील वृत्तीमुळे ते केवळ संतच नाही, तर सामाजिक क्रांतीचे अद्वितीय योद्धे ठरतात.
आजच्या काळात, जेव्हा समाज पुन्हा एकदा असमानता, अंधश्रद्धा आणि मूल्यांच्या गोंधळात अडकताना दिसतो, तेव्हा बसवेश्वरांचे विचार नव्याने वाचणे आणि जगणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यांनी दिलेला संदेश केवळ इतिहासाचा भाग नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारा दीपस्तंभ आहे.
मानवतेच्या उन्नतीसाठी, समतेच्या स्थापनेसाठी आणि विवेकाच्या जागृतीसाठी बसवेश्वरांचे कार्य हे अनंत काळापर्यंत प्रेरणादायी आहे.
“अंधःकाराला शाप देण्यापेक्षा, एक विचाराचा दिवा पेटवणं..हीच महात्मा बसवेश्वर यांची खरी क्रांती होती.”
आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन.. 🌹🙏
लेख संकलित माहितीवर संपादीत..✍️
महात्मा बसवेश्वर यांचा वैचारिक चाहता आणि अभ्यासक.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#महात्मा_बसवेश्वर #Basavanna #BasaveshwarJayanti #समता #EqualityForAll #कायकवे_कैलास #DignityOfLabour #श्रमाची_प्रतिष्ठा #स्वातंत्र्य #FreedomOfExpression #विचारक्रांती #SocialReform #Humanism #मानवतावाद #प्रबोधन #Enlightenment #विवेकवाद #RationalThinking #AnubhavaMantapa #समाजपरिवर्तन #SocialChange #जातिव्यवस्था_निर्मूलन #CasteEquality #YouthInspiration #GenZAwakening #आत्मशोध #SelfRealization #InspirationalThoughts #भारतीय_विचार #IndianPhilosophy #SaintsOfIndia #BasavannaThoughts #EducateEmpower #InspireToChange
Post a Comment