डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयशैलीविरुद्ध उभं राहिलेलं ‘नो किंग्स’ आंदोलन हे केवळ एका नेत्याच्या विरोधातील असंतोष नाही; तर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांच्या रक्षणासाठी उभं राहिलेलं सामूहिक जनभान आहे. #DonaldTrump यांच्या काही निर्णयांमध्ये दिसणारी एककल्ली प्रवृत्ती, आंतरराष्ट्रीय धोरणांतील आक्रमकता आणि संस्थात्मक संतुलनाला दिलं जाणारं आव्हान..या सगळ्यांनी सामान्य नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे.
म्हणूनच अमेरिका ते युरोपपर्यंत लाखो लोक रस्त्यावर उतरले, कारण लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती सतत जागृत ठेवावी लागणारी जीवनपद्धती आहे.
इतिहास आपल्याला वारंवार सांगतो की, सत्तेचा अतिरेक आणि विवेकाचा अभाव यांची संगत धोकादायक ठरते. हिटलर याच उदाहरण म्हणून घेतलं जातं, पण प्रत्येक काळात परिस्थिती वेगळी असते आणि तुलना करताना सजग विवेकाची गरज असते.
तरीही एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जेव्हा सत्ता प्रश्न विचारणाऱ्यांना नकोशी वाटू लागते, तेव्हा लोकशाहीची मुळे कमकुवत होऊ लागतात. ‘नो किंग्स’ ही घोषणा केवळ एका व्यक्तीविरोधात नाही;तर ती कोणत्याही प्रकारच्या सत्तेच्या अहंकाराविरुद्धचा स्पष्ट संदेश आहे, “या युगात राजा नसतो, नागरिकच सर्वोच्च असतात.”
अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला अधिक व्यापक संदर्भ मिळतो. युद्धाच्या ज्वाला केवळ सीमारेषांवर पेटत नाहीत;तर त्या अर्थव्यवस्था, मानवी मूल्यं आणि जागतिक शांततेलाही झळ पोहोचवतात. अशा वेळी निर्णय घेणाऱ्यांकडून अपेक्षित असते ती दूरदृष्टी, संयम आणि मानवतेची जाणीव. परंतु जर निर्णयांमध्ये उतावळेपणा आणि आक्रमकतेचा अतिरेक दिसला, तर नागरिकांचा आवाज उठणं अपरिहार्य ठरतं.
या संपूर्ण घटनाक्रमातून आपल्याला एक महत्त्वाचा बोध घ्यावा लागतो, लोकशाही ही केवळ सत्ताधाऱ्यांची नसते, ती जागरूक नागरिकांची असते. नागरिक जर प्रश्न विचारणं थांबवतात, तर लोकशाही हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेने झुकते.
म्हणूनच आंदोलनं, चर्चा, मतभेद हे लोकशाहीचे श्वास आहेत; त्यांना दडपणं म्हणजे समाजाच्या विचारक्षमतेला गुदमरवणं होय.
आजच्या वेगवान आणि अस्थिर जगात आपणही या घटनांकडे केवळ प्रेक्षक म्हणून पाहू नये, असं मला वाटतं मित्रांनो..
आपल्या देशात, आपल्या समाजात, आपल्या परिसरात आपण लोकशाही मूल्यं किती जपतो, प्रश्न विचारण्याचं धैर्य ठेवतो का, आणि विवेकाने निर्णय घेतो का..? हा आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. कारण खरी प्रगती ही केवळ आर्थिक किंवा तांत्रिक नसते; ती विचारांच्या स्वातंत्र्यात आणि जबाबदारीतून घडते.
शेवटी, ‘नो किंग्स’ हा केवळ एक नारा नाही; ती एक जाणीव आहे, की सत्ता ही लोकांसाठी असते, लोक सत्तेसाठी नाहीत. जेव्हा नागरिक ही जाणीव जपतात, तेव्हाच लोकशाही जिवंत राहते आणि मानवतेचा मार्ग प्रकाशमान होतो.
-एक संविधानप्रेमी भारतीय.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख, परभणी..
Post a Comment