आपण आज विचारशून्य वेगाच्या नशेत बुडालेलं राष्ट्र बनत चाललो आहोत..?
विचारांची कसोटी न लावता कृती करण्याची घाई, आणि त्या कृतीतून चमत्कार घडेल अशी भाबडी अपेक्षा हीच आपली सर्वात मोठी शोकांतिका आहे.
आज मध्यपूर्वेत पेटलेली युद्धजन्य परिस्थिती ही केवळ सीमारेषांची लढाई नाही; तर ती विचारहीन निर्णयांची, अहंकाराच्या राजकारणाची आणि दूरदृष्टीच्या अभावाची जिवंत परिणती आहे. आणि या संघर्षाचा सर्वात मोठा फटका बसतो तो भारतासारख्या उर्जा निर्भर देशांना...कारण आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं इंधन मोठ्या प्रमाणावर आखाती देशातून आयात करतो..
तेलाचे दर वाढतात, आणि त्याची साखळी प्रतिक्रिया भारतातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचते..इंधन महाग होतं, वाहतूक खर्च वाढतो, अन्नधान्याच्या किमती वाढतात, उद्योगांवर ताण येतो, आणि शेवटी सामान्य नागरिकाच्या जगण्यावरच घाव बसतो.
मग प्रश्न उभा राहतो..आपण काय शिकलो?
आपण अजूनही प्रतिक्रियात्मक विचारांवर चालणार आहोत का, की दूरदृष्टीने स्वतःला सक्षम करणार आहोत..?
विचाराऐवजी उतावळेपणा, नियोजनाऐवजी दिखाऊ निर्णय, आणि स्वावलंबनाऐवजी परावलंबन हीच जर आपली वाटचाल राहिली, तर बाहेरच्या प्रत्येक संघर्षाचा फटका आपण पुन्हा पुन्हा सहन करत राहू.. हे केवळ जागतिक राजकारणाचं अपयश नाही; तर ही आपल्या अंतर्गत धोरणांचीही कसोटी आहे.
परिणामांचा विचार न करता केलेली कृती ही प्रगती नव्हे; ती विनाशाची प्रस्तावना असते. भावनांच्या भरात घेतलेले निर्णय राष्ट्रांना केवळ आर्थिक संकटात ढकलत नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील शक्यतांनाही मर्यादित करतात.
महागाई, बेरोजगारी, आर्थिक अस्थिरता ही त्या विचारशून्यतेची किंमत आहे, जी शेवटी सामान्य माणूसच चुकवतो.
भारतासाठी हा काळ केवळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.
ऊर्जा स्वावलंबन, पर्यायी ऊर्जास्रोत, दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि जागतिक घडामोडींविषयी सजग भूमिका ही केवळ धोरणे नाहीत, तर राष्ट्राच्या अस्तित्वाची गरज आहेत.
आज आपल्याला भावनिक घोषणांपेक्षा बौद्धिक प्रामाणिकतेची गरज आहे..क्षणिक लोकप्रियतेपेक्षा दीर्घकालीन शाश्वततेचा विचार करण्याची गरज आहे...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्याची सवय परत मिळवण्याची गरज आहे.
कारण इतिहासाने वारंवार दाखवून दिलं आहे, "जे राष्ट्र विचार करतं, ते टिकतं;आणि जे राष्ट्र फक्त प्रतिक्रिया देतं, ते परिस्थितीचं बळी ठरतं."
-एक संविधानप्रेमी
Post a Comment