आजच्या लोकमत मधील 'Must Read ' ह्या सदरातील हा लेख आजच्या काळातील एक अत्यंत गंभीर आणि वास्तवदर्शी प्रश्न आपल्या समोर उभा करतो..
डिजिटल जगात अडकत चाललेली आजची किशोरवयीन पिढी... तंत्रज्ञानाने आपल्याला ज्ञान, संवाद आणि संधींचे विशाल दार उघडून दिले असले, तरी त्याच तंत्रज्ञानाने मुलांच्या मनावर एक अदृश्य ताणही निर्माण केला आहे, हे नाकारता येणार नाही.
आज “लाईक्स” आणि “कमेंट्स” हे केवळ सोशल मीडियावरील आकडे राहिलेले नाहीत, तर ते मुलांच्या आत्ममूल्याचा मापदंड बनत चालले आहेत.
बाह्य प्रतिसादावर अवलंबून असलेली ही मानसिकता त्यांच्या आत्मविश्वासाला खिळ घालते. कौतुक मिळालं तर आनंदाची उंच भरारी, आणि दुर्लक्ष झालं तर नैराश्याची खोल दरी ही भावनिक अस्थिरता चिंताजनक आहे.
विशेषतः ज्या वयात विवेक, संयम आणि आत्मनियंत्रण पूर्ण विकसित झालेले नसतात, त्या वयात ही डिजिटल स्पर्धा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते.
या पार्श्वभूमीवर, केवळ मुलांवर दोष टाकून चालणार नाही. पालक, शिक्षक आणि समाज म्हणून आपली जबाबदारी अधिक मोठी आणि व्यापक आहे, असं मला वाटतं, मित्रांनो..
मुलांना डिजिटल साधनांपासून दूर ठेवणं हा उपाय नाही, तर त्यांचा सुजाण आणि मर्यादित वापर शिकवणं गरजेचं आहे. “लाईक्स”पेक्षा “लर्निंग” महत्त्वाचं आहे, “कमेंट्स”पेक्षा “कॅरेक्टर” घडवणं महत्त्वाचं आहे, ही जाणीव त्यांच्यात रुजवावी लागेल.
तंत्रज्ञान हे साधन आहे..उद्दिष्ट नाही. जर आपण मुलांना डिजिटल जगाचा स्वामी बनवण्याऐवजी त्याचा गुलाम बनू दिलं, तर ही प्रगती नव्हे, तर अधोगती ठरेल.
म्हणूनच आज गरज आहे , ती सजग पालकत्वाची, संवेदनशील शिक्षणाची आणि मूल्याधिष्ठित समाजाची जिथे मुलांचं यश “लाईक्स”मध्ये नाही, तर त्यांच्या विचारांमध्ये, संस्कारांमध्ये आणि व्यक्तिमत्त्वात मोजलं जाईल.
-एक शिक्षणप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार

Post a Comment