अस्वस्थ वर्तमानातून.. ✍️
अस्वस्थतेचा अर्थ अंधार नाही, तर आरंभ आहे..
तुम्ही अस्वस्थ आहात का?
हा प्रश्न आज प्रत्येक संवेदनशील मनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण लक्षात ठेवा..अस्वस्थता ही कमजोरी नाही;तर ती जागृत विवेकाची पहिली खूण असते. ज्या मनाला अन्याय, अपूर्णता, विसंगती किंवा ठप्पपणा खुपतो, तेच मन बदलाचा ध्यास घेतं.
इतिहास साक्षी आहे, क्रांती कधीच समाधानातून जन्माला आली नाही. ती नेहमी अस्वस्थतेच्या गर्भातूनच आकार घेत गेली. मात्र ही अस्वस्थता आक्रोशात विरघळवायची की ती संकल्पात रूपांतरित करायची, हा निर्णय आपला असतो. दिशाहीन अस्वस्थता माणसाला आतून पोखरते; पण दिशायुक्त अस्वस्थता समाजाला नवा मार्ग दाखवते.
अस्वस्थता ही दुधारी तलवार आहे. तीच तलवार जर हातपाय गाळून, निराशेच्या अंधारात वापरली, तर भविष्यातील प्रकाश विझतो. पण तीच अस्वस्थता जर विचारांनी धारदार केली, मूल्यांनी बांधली आणि कृतीच्या मुठीत घट्ट धरली, तर इतिहास घडतो नावासह, जबाबदारीसह..
ही अस्वस्थता वैयक्तिक असू शकते, स्वतःच्या आयुष्याबद्दलची; किंवा सामाजिक परिसरातील अन्याय, असमानता, गुदमरलेल्या स्वप्नांविषयीची. कारण काहीही असो, उत्तर एकच आहे: पळ काढू नका, वाट तयार करा. तक्रार करू नका, परिवर्तनाची तयारी करा.
अस्वस्थतेला संकट समजू नका. ती तुमच्यातील सुप्त शक्ती जागी करणारी हाक आहे. ती हाक ऐकलीत, तिला विधायक दिशेची कास धरलीत, तर एक दिवस तुम्हालाच दिसेल..इतिहास तुमची वाट पाहत उभा आहे… आणि तो लिहिण्याची लेखणी तुमच्याच हातात आहे.
अस्वस्थतेचा खरा कस तेव्हा लागतो, जेव्हा ती तुम्हाला प्रश्न विचारायला भाग पाडते... मी जे जगतो आहे, तेच खरे जगणे आहे का? समाज, व्यवस्था, शिक्षण, राजकारण किंवा नातेसंबंध… जिथे जिथे प्रश्न विचारण्याची हिंमत निर्माण होते, तिथेच अस्वस्थतेचे बीज रोवलेले असते..आणि प्रश्न विचारणारा माणूस कधीच धोकादायक नसतो; तर तो असतो परिवर्तनाचा पहिला शिल्पकार.
पण लक्षात ठेवा, अस्वस्थतेला केवळ भावनेपुरते मर्यादित ठेवलंत, तर ती तुम्हाला जाळून टाकते. तिचे रूपांतर विचारात केले, तर ती दिशा देते; आणि विचारांना कृतीची जोड दिली, तर ती चळवळ बनते. म्हणूनच अस्वस्थ माणसाने आधी स्वतःला घडवले पाहिजे...वाचनातून, चिंतनातून, संवादातून. कारण प्रगल्भ अस्वस्थता हीच समाजासाठी दीपस्तंभ ठरते.
आजचा काळ शांत दिसतो, पण आतून अस्वस्थ आहे. वरवर स्थैर्य, आत मात्र असंतोष. अशा काळात मौन राखणं सोपं असतं; पण मौन राखणं हीच अनेकदा अन्यायाची साथ ठरते. म्हणूनच तुमची अस्वस्थता जर तुम्हाला बोलायला, लिहायला, उभं राहायला भाग पाडत असेल, तर ती दडपून टाकू नका. ती तुमचं ओझं नाही तर ती तुमची जबाबदारी आहे.
अखेर एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा, मित्रांनो..
जग बदलणारे लोक “सुखी” नव्हते, ते जागृत होते. त्यांना चैन नव्हती, म्हणूनच त्यांना चैन देणारा समाज घडवायचा होता. जर तुम्ही आज अस्वस्थ असाल, तर समजा की तुम्ही अजून जिवंत आहात, संवेदनशील आहात आणि परिवर्तनासाठी योग्य ठिकाणी उभे आहात. आता फक्त एकच प्रश्न उरतो..तुम्ही या अस्वस्थतेला पळवून लावणार आहात, की तिच्या साहाय्याने उद्याचा इतिहास घडवणार आहात?
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#अस्वस्थवर्तमानातून #अस्वस्थतेचा_अर्थ #जागृतविवेक #परिवर्तनाची_हाक #वैचारिकलेखन #प्रबोधनात्मकविचार #प्रेरणादायीशब्द #सकारात्मकअस्वस्थता #विचारांचीचळवळ #बदलाचीबीज #इतिहासघडवणारे #समाजपरिवर्तन #नवचिंतन #मौननव्हेभूमिका #प्रश्नविचारण्याचीहिंमत #जबाबदारीचीअस्वस्थता #दिशायुक्तविचार #मूल्याधिष्ठितकृती #विवेकवादी #मानवतावाद #रॅडिकलह्युमनिझम #युवाशक्ती #विद्यार्थीचळवळ #सामाजिकभान #शब्दांतूनक्रांती #वाचनचिंतनसंवाद #प्रबुद्धभारत #नव्या_इतिहासाची_लेखणी
Post a Comment