“जो युवक आज आव्हान स्वीकारतो,
तोच उद्या समाजाला दिशा देतो.”
युवक हा केवळ वयाचा टप्पा नसून तो राष्ट्राच्या चेतनेचा श्वास असतो. देशाच्या वर्तमानाला अर्थ देणारी आणि भविष्याला दिशा देणारी जी ऊर्जा आहे, ती युवकांच्या विचारांत, कृतीत आणि ध्येयवेड्या स्वप्नांत दडलेली असते. आजचा युवक विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेच्या केंद्रस्थानी उभा आहे. माहितीच्या महासागरात वावरताना त्याच्यासमोर अमर्याद संधींची दारे उघडी आहेत; पण त्याच वेळी भ्रम, गोंधळ आणि आव्हानांचे वादळही त्याला सतत घेरून राहिले आहे. या काळात युवकांनी केवळ परिस्थितीचा स्वीकार न करता, तिला समजून घेत प्रश्न विचारण्याची, दिशा ठरवण्याची आणि परिवर्तन घडवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
आजचा युवक माहिती-तंत्रज्ञानाने समृद्ध आहे, परंतु मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत चाललेला दिसतो. शिक्षण असूनही रोजगाराची हमी नाही, कष्ट असूनही यशाची खात्री नाही..ही अनिश्चितता युवकांच्या मनात नैराश्याची सावली निर्माण करते. अपेक्षांचे ओझे, अपयशाची भीती आणि भविष्याविषयीची असुरक्षितता यामुळे आत्मविश्वास डगमगतो. त्यातच मोबाईल, सोशल मिडिया आणि आभासी जगाचे आकर्षण युवकाला वास्तवापासून दूर नेत आहे. संवादाऐवजी स्क्रोलिंग, चिंतनाऐवजी तुलना आणि स्वप्नांऐवजी दिखावा वाढत चालला आहे. याचा परिणाम केवळ करिअरवर नव्हे, तर आरोग्य, नातेसंबंध आणि जीवनमूल्यांवरही होत आहे.
तथापि, या अंधारातही आशेचा दीप तेवढाच प्रखर आहे. युवकांमध्ये असलेली क्षमता, जिद्द आणि सर्जनशीलता आजही देशाचे सर्वात मोठे भांडवल आहे. गरज आहे ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची, अपयशाला शेवट नव्हे तर शिकवण मानण्याची. आव्हाने ही संकटे नसून ती स्वतःला घडवण्याची संधी आहेत, ही जाणीव युवकांनी मनाशी पक्की केली पाहिजे. सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण मेहनत, मूल्याधिष्ठित जीवन आणि सामाजिक भान यांचा समन्वय साधला तर कोणतेही आव्हान अपराजेय ठरत नाही.
आजच्या युवकाने केवळ नोकरी शोधणारा नव्हे, तर समाजाचा जबाबदार शिल्पकार बनले पाहिजे. स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या वेदनाही समजून घेणारा, प्रश्न विचारणारा पण उत्तरांसाठी कृती करणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्र उभे करू शकतो. युवकांनी जर भीतीवर मात करून, गोंधळातून मार्ग शोधून, आव्हानांना संधी मानून धैर्याने पुढे वाटचाल केली, तर केवळ त्यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे भविष्य उज्ज्वल होणे अटळ आहे. कारण जागृत, सजग आणि सशक्त युवक हीच कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद असते.
युवकांनी या काळात स्वतःला केवळ परिस्थितीचा बळी समजू नये, तर काळाचा शिल्पकार मानावे. इतिहास साक्षी आहे की प्रत्येक मोठे परिवर्तन तरुण मनातूनच जन्माला आले आहे. जेव्हा तरुण विचार जागृत होतात, तेव्हा अन्याय प्रश्नांकित होतो, जड परंपरा हलतात आणि नव्या मूल्यांची पायाभरणी होते.
म्हणूनच युवकांनी स्वतःच्या आयुष्यापुरते मर्यादित न राहता समाज, शिक्षण, पर्यावरण आणि लोकशाही यांविषयी सजग भूमिका घ्यावी. वैयक्तिक यशाला सामाजिक जबाबदारीची जोड मिळाली, तर युवकाचे आयुष्य केवळ यशस्वीच नव्हे तर अर्थपूर्ण बनते.
आजच्या युवकाला दिशा देणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचा विवेक. पैसा, प्रसिद्धी आणि स्पर्धेच्या धावपळीत माणूसपण हरवू न देता, मूल्यांची मशाल हातात घेऊन पुढे जाणे हेच खरे धैर्य आहे.
संकटाच्या काळात हार न मानता उभे राहणे, अपयशातून पुन्हा उभे राहण्याचे सामर्थ्य मिळवणे आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहणे..यातच खऱ्या युवकत्वाची ओळख आहे. जे युवक स्वतःला घडवतात, तेच पुढे देशाचे भाग्य घडवतात; आणि ज्यांच्या मनात प्रश्न असतात, त्यांच्याच हातून उत्तरांचा इतिहास लिहिला जातो.
“आव्हाने टाळणारा युवक काळाच्या ओघात हरवतो;
पण आव्हानांना सामोरा जाणारा युवकच इतिहास घडवतो, मित्रांनो.. "
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#उठवेड्यातोडबेड्या #युवकशक्ती #युवकआव्हान #युवकप्रेरणा #युवकविचार #युवकक्रांती #युवकचेतना #युवकदिशा #युवकस्वप्ने #युवकजबाबदारी
#आव्हानस्वीकारा #इतिहासघडवा #राष्ट्रघडवा #नवचेतना #सजगयुवक #सशक्तयुवक #जागृतविवेक #विवेकवादीविचार
#मानसिकसजगता #युवकमानसशास्त्र #नैराश्यावरमात #आत्मविश्वास #ध्येयवेड #सकारात्मकविचार
#शिक्षणआणिसमाज #मूल्याधिष्ठितजीवन #सामाजिकभान #लोकशाहीजागर #परिवर्तनाचीचळवळ
#युवकआणिभविष्य #FutureBuilders #YouthForChange #YouthPower #NationBuilders #ThinkQuestionTransform
#InspireEducateEmpower #ExcelInLife #HumanValues #RadicalHumanist #SpiritOfZindagi
Post a Comment