आजच्या गोंगाटी, आक्रमक आणि स्पर्धेने ग्रासलेल्या जगात पुरुषार्थ हा शब्द मोठ्या गैरसमजाचा बळी ठरलेला आहे. बहुतेक वेळा पुरुषार्थ म्हणजे आक्रमकता, दडपशाही, वर्चस्व, शारीरिक ताकद किंवा दुसऱ्यावर आपली इच्छा लादण्याची क्षमता असा अर्थ समाजात रुजवला गेला आहे. पण हा अर्थ पुरुषार्थाचा अपमान करणारा आहे; कारण खरा पुरुषार्थ हा बाह्य बळात नसून, आत्मिक उंचीत असतो, मित्रांनो..
खरं सांगायचं तर, या जगात पुरुषार्थाचा खरा अर्थ समजलेले पुरुष फारच मोजके आहेत. कारण पुरुषार्थ म्हणजे तलवारीची धार नव्हे, तर विचारांची धार. तो मुठ आवळण्यात नाही, तर मन उघडण्यात असतो. तो आवाज चढवण्यात नाही, तर विवेकाने ऐकण्यात प्रकटतो.
पुरुषार्थ म्हणजे रसिकता..मनाची कोमलता, भावनांची समज, आणि विचारांची प्रगल्भता. ही रसिकता अशक्तपणाची खूण नाही, तर ती मानसिक ताकदीची सर्वोच्च अवस्था आहे. ज्याला दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होते, ज्याला ‘नाही’चा अर्थ कळतो, ज्याला सन्मानाने मागे हटता येते..तोच खरा पुरुषार्थी.
आज पुरुषत्वाची जी प्रतिमा रंगवली जाते, ती बहुतेक वेळा असुरक्षिततेतून जन्मलेली असते. आपली कमजोरी लपवण्यासाठी माणूस आक्रमक बनतो; पण ज्याला स्वतःच्या मनाचा आधार आहे, त्याला कुणावरही जबरदस्ती करण्याची गरज भासत नाही. जबरदस्ती ही शक्तीची नव्हे, तर अपुरेपणाची निशाणी असते.
खरा पुरुषार्थी पुरुष हा कणखर असूनही कोमल असतो. त्याची कोमलता ही त्याची मर्यादा नसून त्याची ओळख असते. तो स्त्रीला जिंकायची वस्तू मानत नाही, तर समतेची सहप्रवासी मानतो. तो नात्यांत अधिकार शोधत नाही, तर विश्वास निर्माण करतो. तो प्रेमात मालकी गाजवत नाही, तर स्वातंत्र्य जपतो.
पुरुषार्थ म्हणजे संयम..उत्तेजनेच्या क्षणी थांबण्याची क्षमता.
पुरुषार्थ म्हणजे शहाणपण..शक्ती असूनही तिचा वापर न करण्याचं धैर्य..पुरुषार्थ म्हणजे संस्कार..समोर दुर्बल असताना अधिक जबाबदार होणं.
ज्या समाजात पुरुषार्थाची व्याख्या बदलते, त्या समाजात स्त्रिया सुरक्षित होतात, नाती सुसंस्कृत होतात आणि माणूसपण जिवंत राहतं. कारण खरा पुरुषार्थ हा कुणाला दाबण्यात नाही, तर कुणाला दुखावू नं देण्यात असतो.
आज गरज आहे ती पुरुषार्थ नव्याने समजून घेण्याची..
तो मर्दानगीचा मुखवटा फाडून टाकण्याची, तो हिंसेला वीरता समजण्याच्या भ्रमातून बाहेर पडण्याची,आणि पुरुषार्थाला विवेक, करुणा व संवेदनशीलतेच्या प्रकाशात पुन्हा प्रतिष्ठित करण्याची.
कारण शेवटी एकच सत्य उरतं, " जो पुरुष दुसऱ्याच्या माणूसपणाचा आदर करतो,तोच खऱ्या अर्थाने पुरुषार्थी असतो."
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment