मंदिरात साधे लग्न आणि शिक्षणासाठी 10 लाखांची देणगी - समाजाला दिशा देणारा आदर्श विवाह.. ज्याची प्रेरणा सर्वं समाजाने घ्यावी..
“ खर्चाने नाही, तर विचाराने मोठा ठरलेला हा आदर्श विवाह..!”
आज ज्या काळात विवाह म्हणजे दिखावा, खर्चाची स्पर्धा आणि अनावश्यक झगमग असा समज रूढ होत चालला आहे, त्या काळात परभणी जिल्ह्यात घडलेला हा विवाह समाजासाठी दिशादर्शक, प्रेरणादायी आणि प्रबोधनात्मक आदर्श ठरतो आहे, मित्रांनो..
मंदिरात अगदी साधेपणाने विवाह करून, वाचलेल्या खर्चातून गावच्या जिल्हा परिषद शाळेसाठी तब्बल 10 लाख रुपयांची देणगी देण्याचा संकल्प करणाऱ्या या नवदांपत्याचे सर्वत्र मनापासून कौतुक आणि अभिनंदन होत आहे, हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, मित्रांनो..
परभणी येथील रहिवासी इंजि. शेखर उत्तरा माधव शेजुळ (B.Tech, MBA) यांनी कोणताही बडेजाव न करता, लातूर जिल्ह्यातील खरोळा (ता. रेणापूर) येथील दत्त मंदिरात आपल्या विवाहाचा आनंदोत्सव पार पाडला..
साधेपणा, विवेक आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम या विवाहात प्रत्ययास आला.
इंजि. शेखर शेजुळ हे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. माधव देसाई शेजुळ यांचे एकुलते एक सुपुत्र. प्रा. डॉ. शेजुळ हे परभणी येथील ज्ञानोपासक वरिष्ठ महाविद्यालयातून शारीरिक शिक्षण विभागप्रमुख म्हणून 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा हे संस्कार शेखर शेजुळ यांच्या जडणघडणीत खोलवर रुजलेले दिसून येतात. पुणे येथे गेली तीन वर्षे नोकरी करत असतानाही त्यांनी नोकरीचा पहिला पगार आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी दान केला, हे विशेष उल्लेखनीय आहे.
आबेगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी प्रा. डॉ. माधव देसाई शेजुळ यांनी 2019 ते 2025 या काळात स्वतःच्या उत्पन्नातून सुमारे 15 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
जमीन खरेदी, कंपाउंड वॉल उभारणी यासाठी केलेले हे योगदान “ शिक्षण हीच खरी संपत्ती.” या विचारांचे जिवंत उदाहरण आहे, मित्रांनो..
या शुभविवाहाचे दुसरे तेजस्वी रूप म्हणजे वधू चि. सौ. का. ऋतुजा (MBA). त्या बावी (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील माजी मुख्याध्यापक अक्रुरराव कृष्णाजी शिंदे यांची नात आणि सौ. रेखा व संतोष अक्रुरराव शिंदे यांची सुकन्या आहे.फक्त 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत, हिंदू धर्मातील रूढी-परंपरेनुसार, कोणताही आडंबर न करता हा विवाह हर्षोल्लासात पार पडला.
या विवाहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे...🌹
कोणताही हुंडा नाही, सोने-चांदी नाही, आहेर, भेटवस्तू नाहीत,आतषबाजी, DJ, वाजंत्री नाही, प्री-वेडिंग शूट, डेकोरेशन आणि बॅनरबाजी नाही..
या सर्व खर्चिक बाबी जाणीवपूर्वक टाळून वाचलेली रक्कम शिक्षणासाठी अर्पण करण्याचा शेजुळ आणि शिंदे कुटुंबांनी एकमताने घेतलेला निर्णय, दिखाव्याऐवजी विचार, खर्चाऐवजी सामाजिक जबाबदारी आणि समारंभाऐवजी संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे. लग्नाचा अनाठायी खर्च वाचवून शिक्षणासाठी पुढाकार घेणे, हीच खरी सामाजिकता, परिपक्व विवेक आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी असून, समाजाने आत्मसात करावा असा हा प्रेरणादायी आदर्श ठरतो.
दोन्ही कुटुंबांनी प्रत्येकी 5-5 लाख रुपये, एकूण 10 लाख रुपये इंजि. शेखर शेजुळ यांच्या मूळगावी असलेल्या आबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दान करण्याचा संकल्प केला.
या निधीतून विद्यार्थ्यांसाठी अद्यवयत संगणक कक्ष (Computer Hall) उभारण्याचा निर्धार नवदांपत्याने केला आहे..जो ग्रामीण शिक्षणाच्या डिजिटल भविष्याला नवी दिशा देणारा ठरेल,मित्रांनो..
या संकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत मुलीचे मामा प्रा. प्रभाकर रामराव माने आणि लहान चुलते इंजि. अतुल अक्रुरराव शिंदे यांची सकारात्मक व निर्णायक भूमिका मोलाची ठरली. त्यांच्या सहकार्यामुळेच चार वर्षांपूर्वी ठरवलेला हा नाविन्यपूर्ण विवाह सोहळा आनंदी वातावरणात पार पडू शकला.
हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नाही, तर विवेक, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा मंगलसंवाद आहे, मित्रांनो..
आजच्या समाजाने, विशेषतः तरुण पिढीने, या विवाहाकडे आदर्श म्हणून पाहावे, हीच अपेक्षा.
नवदांपत्य शेखर–ऋतुजा शेजुळ यांचे आणि दोन्ही कुटुंबांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा..!🌹
अशा प्रेरणादायी उपक्रमांतूनच समाजाचा खरा विकास घडतो, मित्रांनो..
आज समाजासमोर उभ्या असलेल्या दिखावेखोर विवाहसंस्कृतीला हा विवाह सजग विवेकाचा, सामाजिक भानाचा आणि मूल्याधिष्ठित विचारांचा आरसा दाखवतो.
लग्न म्हणजे केवळ खर्चाचे प्रदर्शन नसून, समाजासाठी काहीतरी देण्याची संधीही असू शकते हे या नवदांपत्याने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे समाजाने, विशेषतः पालकांनी व तरुण पिढीने, अशा विवाहांकडे केवळ कौतुकाने पाहून थांबू नये, तर साधेपणा, हुंडामुक्त विचार, शिक्षणाला प्राधान्य आणि सामाजिक बांधिलकी हे मूल्य आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, हीच काळाची गरज आहे, मित्रांनो..
नवदांपत्य शेखर–ऋतुजा शेजुळ यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतांना, त्यांचा हा आदर्श उपक्रम अनेक तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. अशाच विवेकशील निर्णयांतून मजबूत समाज, सक्षम पिढी आणि उज्ज्वल भविष्य घडत असते. दिखाव्याऐवजी विचार, खर्चाऐवजी संवेदना आणि स्वार्थाऐवजी समाजहित हा मंत्र जर समाजाने आत्मसात केला, तर खऱ्या अर्थाने परिवर्तनाची पहाट उगवेल, यात शंका नाही.. 🌹
सलाम आणि अभिनंदन Madhav Shejul सरांचं आणि शिंदे परिवाराचं.. आपला आदर्श प्रत्येक समाजानं घ्यावा..🥰
-शब्दांकन आणि संपादन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन..
Post a Comment