12 नवीन महिने आणि 365 नव्या संधी..!
दररोज काहीतरी नवीन शोधा...🥰
कारण प्रत्येक दिवस स्वतःला नव्याने घडवण्याची संधी घेऊन येतो.
आरशात स्वतःकडे पाहा आणि स्वतःलाच विचारा..
“आयुष्यात उरलेल्या प्रत्येक दिवशी मला काय करायचं आहे?”
मग त्या प्रश्नाचं उत्तर केवळ विचारात न ठेवता, कृतीत उतरवा.
आयुष्याचा प्रत्येक नवा प्रवास नवी स्वप्नं, नवी दिशा आणि नवी आशा घेऊन येतो...म्हणून चालत राहा, शिकत राहा आणि प्रत्येक क्षणाला अर्थ देत आनंदाने जगत राहा, मित्रांनो…
🔰नव्या वेळेची हाक : 365 संधी आणि आपली जबाबदारी..
काळ थांबत नाही, पण तो प्रत्येकाला थांबून स्वतःकडे पाहण्याची संधी नक्की देतो. नव्या वर्षाचे बारा महिने आणि तीनशे पासष्ट दिवस म्हणजे केवळ कॅलेंडरची उलथापालथ नव्हे; ते म्हणजे आयुष्याने आपल्याला दिलेली आत्मपरीक्षणाची हाक, नव्या संकल्पांची दिशा आणि परिवर्तनाची सुवर्णसंधी होय. प्रश्न एवढाच आहे, " आपण या संधींचं स्वागत करतो की त्यांना केवळ तारखांच्या ओघात वाहून जाऊ देतो..? "
आजचा काळ वेगवान आहे, पण दिशाहीन वेग माणसाला थकवतो. अशा वेळी प्रत्येक दिवस हा आरशासारखा समोर उभा राहतो आणि विचारतो, “उरलेल्या आयुष्यात तू काय घडवणार आहेस?” या प्रश्नाचं उत्तर शब्दांत नसून कृतीत असायला हवं. कारण आयुष्याची किंमत संकल्पांनी नाही, तर त्या संकल्पांना दिलेल्या सातत्याने ठरते.
नवा प्रवास म्हणजे भूतकाळ पुसून टाकणं नव्हे, तर त्यातून शिकून अधिक सजग होणं होय. अपयश ही लाजिरवाणी खूण नसून आत्मपरीक्षणाची संधी असते. प्रत्येक चूक अनुभव बनते, प्रत्येक अनुभव विवेक वाढवतो आणि विवेकातूनच शहाणपण जन्माला येतं. शिकणं म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही; तर प्रश्न विचारण्याचं धाडस, विचारांना धार आणि मूल्यांना दिशा देणं होय.
समाज आज अनेक संकटांच्या वळणावर उभा आहे.. असमानता, असहिष्णुता, अंधश्रद्धा आणि आत्मकेंद्रीपणा यांचं सावट अधिक गडद होत चाललं आहे. अशा वेळी वैयक्तिक प्रगतीबरोबरच सामाजिक भान जपणं ही काळाची गरज आहे. कारण प्रगतीचा खरा मापदंड उंची नसून, आपल्या उंचीवरून इतरांसाठी किती प्रकाश आणि सावली देता येते, यावर तो ठरतो.
परिस्थिती कधीच परिपूर्ण नसते; परिपूर्ण बनते ती आपली भूमिका. संकटांच्या गर्दीत संधींची बीजं दडलेली असतात, पण ती ओळखण्यासाठी जागृत दृष्टी लागते. जे आव्हानांना सामोरे जातात, तेच बदलाचे शिल्पकार ठरतात. दररोजचा छोटासा प्रयत्न, आज किरकोळ वाटणारा संघर्ष, हाच उद्याच्या व्यापक परिवर्तनाचा पाया असतो.
या नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभं राहून एक गोष्ट ठामपणे सांगावी लागेल, " स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करणं." मेहनत ही अशी भाषा आहे, जी नशिबालाही ऐकायला भाग पाडते. आणि या संपूर्ण प्रवासात माणुसकी, विवेक आणि संवेदनशीलता हरवू नयेत, हीच खरी जबाबदारी आहे.
म्हणूनच, हे नवे बारा महिने आणि तीनशे पासष्ट दिवस केवळ जगण्यासाठी नव्हेत, तर अर्थपूर्णपणे घडवण्यासाठी आहेत. काळ आपल्याला संधी देतो आहे; आता इतिहास घडवायचा की केवळ तारखांत हरवायचं, हा निर्णय आपलाच आहे.
कारण .. " जे चालत राहतात, शिकत राहतात आणि समाजभान जपत जगतात तेच काळावर स्वाक्षरी करतात."
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र.. ✍️
-शब्दांकन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन..
Post a Comment