निरव शांततेत शोध स्वतःचा.. ✍️
निरव शांततेत अभ्यास कशाचा?
तर शोध स्वतःचा...
ज्ञान कशासाठी? तर घडवण्यासाठी माणूसपणाचा;
आणि जीवन कशासाठी?
तर अर्थपूर्ण भविष्य घडवण्यासाठी स्वतःचा..!
निरव शांततेत अभ्यास करताना,
स्वतःचा शोध लागतो;
शब्दांच्या गर्दीत नव्हे,
शांततेतच विचारांचा दीप जागतो.
स्वःशोध कशाचा? तर सुखाचा,
स्वतःच्या अस्तित्वाच्या अर्थाचा;
शांततेत घडते क्रांती विचारांची,
जी अस्वस्थ मनाला देते दिशा विवेकाची.
निरव शांततेत अभ्यास कशाचा?
तर शोध स्वतःचा...
गर्दीत गुदमरलेल्या स्वतःच्या श्वासाचा,
शोध घेतो मी माझ्या अंतर्मनाचा;
दररोज कालपेक्षा नव्याने घडण्याचा,
अंधारातून ज्ञानाचा दीप पेटवण्याचा..
लादलेल्या आशा, आकांक्षा, अपेक्षांच्या पलीकडे,
स्वतःची स्वप्ने उभी करायची ध्येयांच्या वाटेवर;
इतरांच्या चौकटीत आयुष्य न जगता,
स्वतःची ओळख स्वतःच्या कर्तृत्वाने घडवायची.
निरव शांततेत अभ्यास कशाचा?
तर शोध स्वतःचा...
नशिबाच्या कुबड्या नकोत आयुष्याला,
प्रयत्नांची पंखे द्या स्वप्नांना;
अपयशाच्या दगडांवर पाय ठेवून,
यशाच्या शिखराकडे चालत राहा जिद्दीने.
प्रश्न विचार, कारण प्रश्नांतून विचार जन्मतो,
विचारांतून विवेक आणि विवेकातून परिवर्तन घडतो;
अंधानुकरणाच्या वाटेवर कधीही हरवू नकोस,
तर्काच्या प्रकाशात स्वतःची दिशा शोधत राहा.
निरव शांततेत अभ्यास कशाचा?
तर शोध स्वतःचा...
पुस्तक उघडताना केवळ धडे वाचू नको,
त्या शब्दांमधला जीवनार्थ शोध;
गुणांच्या आकड्यांपलीकडे माणूस घडव,
ज्ञानाला करुणेची आणि विवेकाची जोड.
शांतता म्हणजे माघार नव्हे,
ती वादळापूर्वीची तयारी असते;
एकाग्र मनाच्या खोल तळाशी,
उद्याच्या विजयाची बीजे रुजत असतात.
निरव शांततेत अभ्यास कशाचा?
तर शोध स्वतःचा...
स्वतःवर विश्वास ठेव, पण अहंकार नको,
स्वप्न मोठे ठेव, पण विचार लहान नको;
पडशील तरी पुन्हा उभा राहण्याची आस ठेव,
कारण प्रत्येक पडझडीत नव्या उंचीची वाट ठेव.
शोध घेतो मनाचा, शोधतोय स्वतःला,
ज्ञानाच्या प्रकाशात घडवतोय उद्याला;
गर्दीपासून दूर, विचारांच्या वाटेवर,
निरव शांततेत घडतोय मीच माझ्या हातावर.
निरव शांततेत अभ्यास कशाचा?
तर शोध स्वतःचा;
ज्ञान कशासाठी? तर घडवण्यासाठी माणूसपणाचा;
आणि जीवन कशासाठी?
तर अर्थपूर्ण भविष्य घडवण्यासाठी स्वतःचा!
निरव शांततेत शोध स्वतःचा...
विचारांत शोध विवेकाचा...
ज्ञानातून शोध माणूसपणाचा...
आणि त्या शोधातून घडव
भविष्य उज्ज्वल जगाचा..!
— विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख.. ✍️
— एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment