ही केवळ एक आकडेवारी नाही, तर आधुनिक समाजाच्या मानसिक आणि भावनिक विघटनाची धोक्याची घंटा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, पैसा आणि सुविधांमध्ये प्रचंड प्रगती करणारा माणूस मानसिक शांतता, समाधान आणि आत्मिक स्थैर्य मात्र हरवत चालला आहे, हे या अहवालातून स्पष्ट दिसते.
आजची जीवनशैली वेगवान झाली, पण मन मात्र थकले. स्पर्धा, अपेक्षा, अपयशाची भीती, सोशल मीडियावरील कृत्रिम यशाचे प्रदर्शन, नात्यांतील दुरावा आणि सततची तुलना यामुळे तरुण पिढी मानसिक तणावाच्या भोवऱ्यात अडकत आहे. विशेषतः विद्यार्थी आणि युवकांमध्ये “मी कमी पडतोय..” ही भावना वाढताना दिसते.
गुण, करिअर, नोकरी आणि आर्थिक स्थैर्याच्या शर्यतीत माणूस स्वतःलाच हरवत चालला आहे, असं मला वाटतं मित्रांनो..
सर्वात गंभीर बाब म्हणजे, मानसिक आजार अजूनही समाजात लपवून ठेवण्याची गोष्ट मानली जाते. शरीराला ताप आला तर उपचार घेतले जातात, पण मन आजारी पडले तर लोक “लोक काय म्हणतील?” या भीतीने शांत राहतात. अनेक कुटुंबांमध्ये संवादाचा अभाव, भावनिक आधाराची कमतरता आणि मुलांच्या मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष हेही मोठे कारण ठरत आहे.
कोरोनानंतर जगण्याची पद्धत बदलली, पण त्यासोबत एकटेपणा, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती प्रचंड वाढली. मोबाईल आणि इंटरनेटने जग जवळ आणले, पण माणसामाणसांतील मनांचे अंतर वाढवले.
हजारो “फॉलोअर्स” असूनही अनेक तरुण आतून एकटे आणि तुटलेले आहेत, ही आधुनिक समाजाची दीर्घ शोकांतिका आहे.
यावर उपाय फक्त औषधांमध्ये नाही, तर समाजाच्या विचारांमध्ये बदल घडवण्यात आहे..
✔️ मुलांना फक्त मार्क्स नव्हे तर मानसिक आरोग्याचे शिक्षण द्यावे लागेल.
✔️ कुटुंबात संवाद, प्रेम आणि समजूतदारपणा वाढवावा लागेल.
✔️ अपयशाला कलंक नव्हे तर अनुभव म्हणून स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करावी लागेल.
✔️ प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात समुपदेशन व्यवस्था प्रभावी करावी लागेल.
मानसिक आरोग्य ही चैनीची गोष्ट नाही, तर जगण्यासाठीची मूलभूत गरज आहे. समाजाने आता “कमकुवत मन” म्हणून हेटाळणी करण्याऐवजी “समजून घेण्याची” संस्कृती विकसित केली पाहिजे. कारण तुटलेला माणूस फक्त स्वतःचेच नाही, तर संपूर्ण समाजाचे नुकसान करतो.
आज गरज आहे ती यशस्वी माणसे घडवण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या सक्षम, संवेदनशील आणि आनंदी माणसे घडवण्याची…!
✍️
-एक संवेदनशील मन.. आणि मानसशास्त्र अभ्यासक
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment