साधारण पन्नाशीनंतर शरीर हळूहळू थकायला लागते. शारीरिक ऱ्हासाची चाहूल लागते, आरोग्याच्या कुरबुरी वाढू लागतात. कामाची गती मंदावते, धावपळीची ताकद कमी होते. माणूस नकळत decline च्या रेषेवर उभा राहतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे—ती कुणालाही चुकलेली नाही, आणि कुणाला चुकणारही नाही.
मात्र याच जीवनप्रवासात एक सुवर्णकाळ असतो—तारुण्याचा काळ.
हा काळ म्हणजे शरीर ठणठणीत असण्याचा, बुद्धी तीक्ष्ण असण्याचा, स्वप्नांना पंख फुटण्याचा काळ. अपयश पचवण्याइतकी मानसिक लवचिकता असते, चुका सुधारण्याइतका वेळ हाताशी असतो. मेहनत करण्याची क्षमता असते, धावण्याची ताकद असते, रात्रंदिवस झोकून देण्याची ऊर्जा असते.
थोडक्यात, करिअर घडवण्यासाठी निसर्गाने दिलेली ही सर्वोत्तम संधी असते.
अशा या ऊर्जेने मुसमुसलेल्या वयात, जेव्हा तरुण स्वतःचा, कुटुंबाचा आणि भविष्याचा पाया मजबूत करण्याऐवजी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पालख्या वाहण्यात आपले आयुष्य खर्च करतात, तेव्हा मन अस्वस्थ होते… वाईट वाटते… आणि रागही येतो.
बॅनर लावणे, चौकाचौकात झेंडे रोवणे, बाईकवर बसून शहरभर मिरवणुका काढणे, दिवसभर सोशल मीडियावर राजकीय पोस्ट्स टाकत बसणे, परधर्मीय–परजातीय द्वेष पसरवणारे व्हिडिओ फॉरवर्ड करणे—
गणपती आला की महिनाभर ढोल वाजवण्याची practice,
दहीहंडी आली की महिनाभर त्याचीच practice,
घोळक्याने स्थानिक ‘साहेबां’ना भेटायला जाणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे,
छोटी-छोटी non-issues उचलून आंदोलनं करणे,
आणि वरून पोलीस केसेस अंगावर घेणे—
ही यादी संपत नाही.
पण प्रश्न एकच आहे : यातून तुमचं काय घडतंय?
जर कुणाला राजकारणातच करिअर करायचं असेल, तर या साऱ्या गोष्टींचा अर्थ लागू शकतो. पण घरी खायचे वांदे असताना, स्वतःची शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक दिशा ठरलेली नसताना, हे सगळे उद्योग करणे म्हणजे स्वतःच्याच आयुष्याशी खेळ करण्यासारखे आहे.
सात-आठ वर्षांत असा तरुण दिशाहीन होतो.
आणि एकदा दिशा हरवली की, पुढे ती सापडणे फार अवघड होऊन बसते.
आजूबाजूला नजर टाका—असे कितीतरी दिशाहीन चेहरे तुम्हाला दिसतील.
एक कटू सत्य समजून घ्यावे लागेल :
प्रस्थापित राजकीय पक्षांना व्यवस्थापरिवर्तन नको असते; त्यांना केवळ सत्ता हवी असते.
त्यांच्यासाठी विचार दुय्यम असतो, माणूस साधन असतो, आणि तरुणाई म्हणजे वापरायची raw material असते.
म्हणूनच प्रश्न तरुणांनी स्वतःला विचारला पाहिजे—
आपण किती राबायचं? कुणासाठी राबायचं? आणि बदल्यात काय मिळणार आहे?
जातीय-धार्मिक दंगली घडवणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या पक्षांसाठी किंवा संघटनांसाठी तरुणांनी मुळीच काम करू नये.
त्यांच्या कार्यक्रमांपासून, मोहिमांपासून जाणीवपूर्वक दूर राहावे.
कारण द्वेषाच्या राजकारणात शेवटी जळते ते फक्त तरुणांचे भविष्य.
आपण तरुण आहोत—
आपला वापर होऊ द्यायचा की नाही, हे ठरवण्याइतकी तरी अक्कल आपण ठेवली पाहिजे.
विशेषतः गोरगरीब घरातल्या तरुणांनी तर प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी वेळ घालवूच नये.
कारण गरीब तरुणांच्या चुकांना समाज माफ करत नाही.
त्यांच्याकडे ना surplus time असतो, ना वरकड पैसा, ना पाठीशी उभं राहणारं कुठलं गॉडफादर नेटवर्क.
ही सत्तावान मंडळी तरुणांना वापरतात—आणि काम संपलं की फेकून देतात.
मग केस अंगावर असलेला, करिअर हातातून गेलेला, जबाबदाऱ्या वाढलेल्या आयुष्याशी झुंज देत राहतो तो तरुण… एकटा.
त्यापेक्षा शहाणपण हेच आहे की—
आपल्या करिअरकडे लक्ष द्या,
आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावा,
आपल्या गणगोताला मदत करा,
मित्रांसाठी उभे रहा,
सजग नागरिक बना,
सांस्कृतिक व सामाजिक चळवळी समजून घ्या,
आणि आपले कामधंदे सांभाळून जिथे जमेल तिथे सकारात्मक योगदान द्या.
पण प्रस्थापित राजकीय पक्षांची धुणी धुणे थांबवा.
कारण तुमचा विकास तुमच्याइतका प्रामाणिकपणे, तुमच्याइतक्या ताकदीने, कोणीही करू शकत नाही.
तारुण्य ही भीक नाही—ती जबाबदारी आहे.
ती उधळायची नसते, घडवायची असते.
कारण एकदा गेलेलं तारुण्य…
पुन्हा कुणाच्या आयुष्यात परत येत नाही.
Post a Comment