माणसाचं आयुष्य कधीच ठराविक चौकटीत बसत नाही. कितीही नियोजन केलं, कितीही स्वप्नं रेखाटली, तरी आयुष्य नेहमी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळं वागतं. कारण आयुष्य हे फक्त आपल्या निर्णयांचं फलित नसतं; ते काळ, परिस्थिती, माणसं, निसर्ग, संधी आणि अपघात यांच्या अदृश्य संगतीत घडत असतं. म्हणूनच आयुष्य unpredictable असतं.
आपण प्रयत्न करतो, मेहनत करतो, योग्य वाटेल तो मार्ग निवडतो. तरीही कधी अचानक सगळं विस्कटतं. कधी योग्य असूनही अपयश पदरी पडतं, तर कधी चुकून उचललेलं पाऊल नव्या वाटेचं दार उघडतं. तेव्हाच उमगतं की आयुष्याला ठरलेली स्क्रिप्ट नसते. ते रोज नव्यानं लिहिलं जातं, अनुभवांच्या शाईनं आणि संघर्षांच्या अक्षरांनी.
माणूस स्वतःही कायम एकसारखा राहत नाही. आज ज्या स्वप्नांसाठी जीव ओततो, तीच स्वप्नं उद्या अपुरी वाटू शकतात. आजची ध्येयदिशा उद्या बदलते. विचार, नाती, प्राधान्यक्रम सतत रूप बदलत असतात. बदलणारा माणूस आणि बदलणारी परिस्थिती, यांच्या संयोगातूनच आयुष्याची अनिश्चितता जन्माला येते.
पण हीच अनिश्चितता आयुष्याची कमजोरी नाही, तर त्याची खरी ताकद आहे. जर सगळं आधीच ठरलेलं असतं, तर धैर्याला अर्थ उरला नसता. संयमाची परीक्षा झाली नसती. संघर्ष निरर्थक ठरला असता. आणि माणूस फक्त एक यंत्र बनून राहिला असता. अनिश्चिततेमुळेच माणूस शहाणा होतो. कारण सगळं माहीत असतं, तर तो फक्त हुशार झाला असता; पण न कळणाऱ्या वाटांमुळेच तो अंतर्मुख होतो, शिकतो, घडतो.
भविष्य धूसर असतं म्हणूनच वर्तमान जबाबदारीचं होतं. पुढे काय होईल यावर आपलं नियंत्रण नसतं, पण आज आपण काय करतो, कसं वागतो, हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. जिथं नियंत्रण संपतं, तिथूनच धैर्याची खरी परीक्षा सुरू होते. तेव्हा पळून जाणं सोपं असतं, पण उभं राहणं माणूस घडवतं.
आयुष्य वळणं घेतं ते आपल्याला हरवण्यासाठी नाही, तर आपल्यातली ताकद दाखवण्यासाठी. योजना मोडतात, स्वप्नं बदलतात; पण जिद्द टिकली तर वाट सापडतेच. कारण प्रत्येक अडचण ही शेवट नसते, ती पुढच्या पायरीची सूचना असते.
खरी प्रगल्भता म्हणजे जे आपल्या हातात नाही त्याची सतत चिंता न करता, जे आपल्या हातात आहे त्याचं मोल जाणणं. अनिश्चितता ही भीती नसून, ती नव्या शक्यतांची दारं उघडणारी चावी आहे. आयुष्य आपल्याला धडे देतं, आणि प्रत्येक धडा आपल्याला थोडं अधिक माणूस बनवत जातो.
शेवटी एकच सत्य उरतं. सगळं बदलत असतानाही जो स्वतःशी प्रामाणिक राहतो, तोच खरं तर आयुष्य जिंकतो. कारण आयुष्य ठरवून मिळत नाही; ते स्वीकारून, समजून आणि जिद्दीनं घडवावं लागतं. आणि जे हे शिकतात, त्यांच्यासाठी अनिश्चितताही आशिर्वाद ठरते.
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment