" फातिमा शेख जयंती "
सावित्रीमाईच्या जोडीने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फातिमा शेख यांची आज जयंती... विनम्र अभिवादन.. 🌹🙏🏻
फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका, ज्यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या बरोबर 175 वर्षापूर्वी मुलींच्या मध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली.
प्रतिकूल परस्थितीमध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन शिक्षणाचे महान कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांना साथ देणाऱ्या एक वीर मानवतावादी शिक्षिका फातिमा शेख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..🙏🏻
फातिमा शेख : शिक्षणक्रांतीतील विस्मरणात गेलेला दीपस्तंभ
विद्यार्थी मित्र–मैत्रिणींनो…
जय भारत! 🙏
तुम्ही कधी फातिमा शेख हे नाव ऐकलं आहे का..?
त्या कोण होत्या, हे कुणी सांगू शकेल का..?
होय… अगदी बरोबर..!
फातिमा शेख या भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या.
दरवर्षी 9 जानेवारी हा दिवस आपण फातिमा शेख यांची जयंती म्हणून साजरा करतो. मात्र, केवळ जयंती साजरी करणं पुरेसं नाही; त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि योगदानाची मशाल आपल्या मनात पेटवणं अधिक गरजेचं आहे.
फातिमा शेख या कुठल्याही अर्थाने साध्यासुध्या नव्हत्या. त्या होत्या सावित्रीबाई फुले यांच्या सख्ख्या मैत्रीण, सहकारी आणि शिक्षणक्रांतीतील धैर्यवान सोबती...सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि माणूसपणासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींसाठी आणि गोरगरीब मुलांसाठी शाळा सुरू केल्या, तेव्हा समाजातील रूढी, अंधश्रद्धा आणि जातीय-धार्मिक द्वेषाने त्यांच्यावर प्रचंड विरोध केला. इतका विरोध झाला की जोतिबांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं.
अशा अंधाराच्या काळात माणुसकीचा प्रकाश घेऊन पुढे आले कोण?
पुण्यातील गंज पेठ येथे राहणारे उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख...यांनी फुले दांपत्याला आपल्या घरी आसरा दिला. हे केवळ घर देणं नव्हतं; ते होते विचारांना आश्रय देणं, क्रांतीला संरक्षण देणं आणि शिक्षणाच्या भविष्याला वाचवणं.
याच फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंसोबत खांद्याला खांदा लावून मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्या काळात शिक्षिका होणं म्हणजे समाजाच्या रोषाला आव्हान देणं होतं. तरीही सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी औपचारिक शिक्षण-प्रशिक्षण घेतलं आणि मगच अध्यापनाचा व्रत स्वीकारलं. हा केवळ व्यवसाय नव्हता, तर तो होता समाजपरिवर्तनाचा यज्ञ.
सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुलेंना लिहिलेल्या एका पत्रातून फातिमा शेख यांचे कार्य आणि त्याग अधिक ठळकपणे समोर येतो.
10 ऑक्टोबर 1856 रोजी लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई म्हणतात,
“ माझी काळजी करू नका. तब्येत बरी झाली की मी पुण्याला परत येईन. फातिमाला सध्या त्रास होत असेल, पण ती कुरकुर करणार नाही.”
ही एक ओळ फातिमा शेख यांच्या सहनशीलतेचा, कर्तव्यभावनेचा आणि निःस्वार्थी वृत्तीचा जिवंत पुरावा आहे.
फातिमा शेख घरोघरी जाऊन मुलींच्या आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगायच्या.त्या केवळ शिकवत नव्हत्या, तर मनं घडवत होत्या, भीती दूर करत होत्या आणि भविष्याची दारं उघडत होत्या.अनेकदा मुलींना आपल्या घरी बोलावून त्या त्यांना शिकवत असत.
सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांना अपमान, बहिष्कार, उपेक्षा आणि त्रास यांचा सामना करावा लागला; पण त्यांनी कधीही आपली वाट बदलली नाही.
आज देशभरातील मुली शिक्षण घेत आहेत, स्वप्नं पाहत आहेत आणि स्वाभिमानाने जगत आहेत..यामागे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या संघर्षाची खोल मुळे दडलेली आहेत.
आजच्या या पवित्र दिवशी आपण केवळ त्यांना वंदन करू नये, तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा.
शिक्षण, समानता आणि माणुसकी यासाठी उभं राहणं हाच त्यांना खरा अभिवादनाचा मार्ग आहे.
🌺 फातिमा शेख यांना मनापासून विनम्र अभिवादन! 🙏
संदर्भ व माहिती :
सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांचा उपलब्ध असलेला जुना छायाचित्र आणि सावित्रीबाई फुले यांचे ऐतिहासिक पत्र.
Post a Comment