अस्वस्थ वर्तमानातून...✍️
‘समस्येपेक्षा इलाज भयंकर’ — उच्च शिक्षणावरील दूरदृष्टीपूर्ण इशारा..
आजच्या 'दैनिक सकाळ' मधील संपादकीय ह्या सदरात 'पीपल्स कॉलेज' नांदेड येथील प्राध्यापक, 'स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठा' च्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि उच्चशिक्षणाचे अभ्यासक असलेले डॉ.डी. एन. मोरे सरांचा ‘समस्येपेक्षा इलाज भयंकर’ हा लेख केवळ शैक्षणिक धोरणांवरील टीका नसून, भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याबाबतचा गंभीर बौद्धिक इशारा आहे.
डॉ.डी. एन. मोरे सरांनी ह्या लेखातून..विषयाकडे भावनिक नव्हे, तर संविधानिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक वास्तवाच्या चौकटीतून पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, हे या लेखाचे सर्वात मोठे बलस्थान आहे.
उच्च शिक्षणातील सुधारणा आवश्यक आहेत, याबाबत दुमत नाही. मात्र सुधारणांच्या नावाखाली केंद्रीकरण, स्वायत्ततेचा संकोच आणि विद्यापीठीय लोकशाहीचे क्षरण होत असेल, तर त्या सुधारणा उपचार न ठरता आजार वाढवणाऱ्या ठरतात..ही लेखातील भूमिका अत्यंत रास्त आहे.
विशेषतः UGC, AICTE यांसारख्या घटनात्मक संस्थांची भूमिका कमजोर करून, नव्या केंद्रीय यंत्रणांकडे सर्वाधिकार सोपवण्याचा प्रयत्न हा दीर्घकालीन दुष्परिणाम घडवू शकतो, हे सरांनी ठोस उदाहरणांसह अधोरेखित केले आहे.
ह्या लेखात मांडलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे..
“ एकसमान धोरण म्हणजे गुणवत्तेची हमी नसते.”
भारतासारख्या सामाजिक, भाषिक व प्रादेशिक विविधतेने नटलेल्या देशात एकच चौकट सर्वांसाठी लादणे हे शैक्षणिक न्यायाच्या तत्त्वालाच छेद देणारे आहे. विद्यापीठे ही केवळ पदवी वाटप करणारी केंद्रे नसून, स्थानिक गरजांशी जोडलेली ज्ञाननिर्मितीची केंद्रे असतात, हे सत्य हा लेख प्रभावीपणे मांडतो.
अनुदानाच्या अधिकारांबाबत उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. शिक्षणाचे हळूहळू बाजारीकरण आणि ‘कामगिरी’च्या नावाखाली सामाजिक दायित्व झाकोळले जाणे ही धोक्याची घंटा आहे.
" शिक्षण हे गुंतवणुकीचे साधन नव्हे, तर लोकशाहीचे आधारस्तंभ आहे. " हा मूलभूत विचार हा लेख सातत्याने अधोरेखित करतो.
हा अग्रलेख कोणत्याही राजकीय अभिनिवेशातून लिहिलेला नसून, शिक्षणव्यवस्थेवर प्रेम करणाऱ्या एका जबाबदार नागरिकाचा विवेकी आक्रोश आहे. तो नकार देत नाही, पण आंधळ्या स्वीकारालाही विरोध करतो.
म्हणूनच हा लेख ‘विरोधासाठी विरोध’ नसून, ‘संविधान, गुणवत्ता आणि समावेशकतेच्या बाजूने उभा असलेला विचारशील समर्थन’ ठरतो, असं मला वाटतं मित्रांनो..
आज जेव्हा शिक्षण धोरणांवर प्रश्न विचारणं म्हणजे विकास विरोधी ठरवलं जातं, त्या काळात हा लेख लोकशाही चर्चेचं महत्त्व पुनःस्थापित करतो..
म्हणूनच, ‘समस्येपेक्षा इलाज भयंकर’ हा लेख वाचला गेला पाहिजे, चर्चिला गेला पाहिजे आणि गांभीर्याने घेतला गेला पाहिजे.
कारण, " शिक्षणातील चूक ही केवळ एका पिढीची नसते, तर ती संपूर्ण समाजाच्या भविष्यावर कोरलेली असते."
-एक प्रगल्भ वाचक आणि शिक्षण प्रेमी.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
DR.KALAM GROUP OF EDUCATION AND RESEARCH FOUNDATION PARBHANI.
हा लेख ऑनलाईन वाचण्यासाठी :👇
https://epaper.esakal.com/smartepaper/UI/?edi=Chh_Sambhajinagar&dt=23/12/2025
Post a Comment