🔰 #प्रश्नांचा दीपस्तंभ : सोक्रेटीस आणि विवेकाच्या जागरणाची अखंड ज्योत..
इतिहासाच्या प्रवाहात काही व्यक्तिमत्त्वे अशी जन्माला येतात, जी उत्तरे देऊन माणसाला शांत करत नाहीत; उलट प्रश्न विचारून त्याला अस्वस्थ करतात. कारण ही अस्वस्थता म्हणजेच विचारांची पहिली ठिणगी असते. प्राचीन ग्रीसच्या अथेन्समध्ये उभा राहिलेला सोक्रेटीस हा असाच एक विवेकाचा प्रहरी होता. त्याने शस्त्र उचलले नाहीत, क्रांतीच्या घोषणा दिल्या नाहीत; त्याने केवळ प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांनीच परंपरेच्या भिंती हादरल्या, अज्ञानाचे कवच तुटले आणि माणसाला स्वतःकडे पाहण्याची सवय लागली.
सोक्रेटीसचा ठाम विश्वास होता..
“An unexamined life is not worth living.”
म्हणजेच, " विचार न करता जगलेले जीवन हे जगण्या लायकचं नाही."
#सोक्रेटीस कोण होता..?
सोक्रेटीस हा प्राचीन ग्रीसचा महान तत्त्वज्ञ होता...तो इ.स.पू. 469 ते इ.स.पू. 399 या कालावधीत अथेन्स येथे कार्यरत होता...तर्क, संवाद आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रचलित श्रद्धा व समजुतींना आव्हान देणे हे त्याच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य वैशिष्ट्य होते.
#सोक्रेटीस - प्रश्नांच्या माध्यमातून माणसाला माणूस करणारा विवेकवादी..
सोक्रेटीसचे तत्त्वज्ञान म्हणजे ग्रंथांचे ओझे नव्हे, तर संवादाची जिवंत प्रक्रिया होती. “न्याय म्हणजे काय?”, “सद्गुण म्हणजे काय?”, “ज्ञान म्हणजे काय?” हे प्रश्न केवळ बौद्धिक कुतूहलासाठी नव्हते; तर ते मानवी जीवनाला दिशा देणारे होते. त्याची प्रश्नोत्तरांची पद्धत आरशासारखी होती; समोरचा माणूस त्या आरशात पाहून स्वतःचे अज्ञान ओळखत असे.
“I know that I know nothing.”
हे विधान दुर्बलतेचे नव्हे, तर बौद्धिक प्रामाणिकतेचे सर्वोच्च शिखर होते. कारण अज्ञानाची जाणीव झाली कीच ज्ञानाचा खरा प्रवास सुरू होतो.
#सोक्रेटीसने समाजाला ठामपणे शिकवले की सद्गुण हा जन्मजात नसतो; तो विवेकातून घडतो. जो खऱ्या अर्थाने जाणतो, तो चुकीचे वागणार नाही,कारण अज्ञानातूनच अन्याय, क्रौर्य आणि अधर्म जन्माला येतो. म्हणूनच त्याचे प्रश्न सत्तेला बोचरे वाटले, बहुमताच्या सुरक्षित चौकटीला अस्वस्थ करणारे ठरले. अखेर त्याच्यावर आरोप झाले; पण त्याने प्रश्न विचारणे थांबवले नाही. मृत्यू समोर उभा असतानाही त्याने विवेकाचा हात सोडला नाही. विषाचा प्याला स्वीकारताना त्याचा संदेश स्पष्ट होता..
“They can kill my body, but they cannot silence my thought.” शरीर मारता येते; विचार नाही..
#आजच्या गोंधळलेल्या, अफवांनी, अंधश्रद्धांनी आणि भावनिक उन्मादाने व्यापलेल्या काळात सोक्रेटीस अधिकच समकालीन वाटतो. तो आपल्याला सतत आठवण करून देतो की विचार न करता जगणे हेच खरे संकट आहे. प्रश्न विचारणे म्हणजे बंड नव्हे; ती समाजाप्रतीची नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच सोक्रेटीस हा केवळ ग्रीसचा तत्त्वज्ञ नाही; तर तो मानवी विवेकाचा सार्वकालिक दीपस्तंभ आहे..जो आजही आपल्याला स्वतःकडे पाहायला, सत्य शोधायला आणि विचार करण्याचे धाडस करायला शिकवतो.
#सोक्रेटीसची सर्वात मोठी क्रांती ही शांत होती; पण तिचा परिणाम दूरगामी होता. त्याने सत्याला मंदिरात, ग्रंथात किंवा सत्तेच्या सिंहासनावर शोधले नाही; तर सामान्य माणसाच्या मनात शोधले. बाजारात, चौकात, तरुणांच्या प्रश्नांत आणि वृद्धांच्या अनुभवांत त्याने तत्त्वज्ञान रुजवले. त्यामुळे विचार हे काही मोजक्यांचे विशेषाधिकार राहिले नाहीत; ते जनसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. हीच सोक्रेटीसची खरी लोकशाही होती..जिथे प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला होता.
आजची #शिक्षणव्यवस्था माहिती देण्यात गर्क आहे; पण विवेक घडवण्यात अपुरी पडते. अशा काळात सोक्रेटीस आपल्याला शिकवतो की खरे शिक्षण म्हणजे उत्तरांची पोती डोक्यावर लादणे नव्हे, तर प्रश्नांची मशाल हातात देणे होय. शिक्षक हा आदेश देणारा अधिकारी नसून, विचारांची दारे उघडणारा मार्गदर्शक असावा...हीच सोक्रेटिक शिक्षणाची मूलभूत संकल्पना आहे. प्रश्न विचारण्याची सवय लागली की माणूस अंधानुकरणातून मुक्त होतो आणि स्व:निर्णयक्षम बनतो.
#सोक्रेटीसने बहुमताच्या दबावाला शरण न जाता नेहमी विवेकाची बाजू घेतली. त्याला माहीत होते की सत्य नेहमीच लोकप्रिय असेल असे नाही. तरीही त्याने सोयीचे मौन स्वीकारले नाही. हा धडा आजच्या लोकशाही समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जिथे ‘बहुमत’ अनेकदा ‘सत्य’ समजले जाते. सोक्रेटीस आपल्याला स्पष्टपणे बजावतो,
" संख्या नव्हे, तर तर्क सत्य ठरवतो."
#विवेकाशिवाय लोकशाहीही केवळ रिकामे चौकट ठरते.
अखेरीस, #सोक्रेटीसचे जीवन आणि मृत्यू हे एकच सत्य सांगतात विचार करण्याचे धैर्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याने प्रश्न विचारणे थांबवले, त्याने माणूस असणेच थांबवले.
म्हणूनच आजही प्रत्येक सजग नागरिकाच्या अंतःकरणात सोक्रेटीसचा आवाज घुमत असतो..
“तू जे मानतोस, ते खरेच आहे का?”
हा प्रश्न जिवंत असेपर्यंत समाज जिवंत राहतो; आणि विवेकाची ज्योत सोक्रेटीसने पेटवलेली कधीही विझत नाही, तर मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी अखंड प्रेरणा ठरते.
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#सोक्रेटीस #Socrates #प्रश्नांचा_दीपस्तंभ #विवेकाची_ज्योत #QuestioningMind #CriticalThinking #RationalThinking #Vivekवाद #विवेकवादी #Humanism #RadicalHumanist #Philosophy #GreekPhilosophy #AncientWisdom #UnexaminedLife #ThinkDifferent #PowerOfQuestions #QuestionTheSystem #ThinkBeyond #ज्ञानमार्ग #प्रबोधन #प्रबोधनात्मक #वैचारिक_लेख #ThoughtLeadership #IntellectualRevolution #DialogueOverDogma #ReasonOverBelief #FightIgnorance #AgainstSuperstition #FreeThought #ThoughtFreedom #FreedomOfThought #DemocracyAndReason #EthicalThinking #MoralPhilosophy #EducationForThought #TransformativeEducation #StudentAwareness #YouthAwakening #SocialReform #SocialAwareness #IntellectualAwakening #TruthAndReason #SeekTruth #AwakenTheMind #ThinkToLive #LiveWithReason #InspireEducateEmpower #SpiritOfZindagi #APJAbdulKalamFoundation #VidyarathiMitra #ProfRafikShaikh
Post a Comment