“ मर्द को भी दर्द होता है… पगली..!” 🫣
ही ओळ विनोदाच्या चष्म्यातून अनेकदा ऐकू येते; पण तिच्यामागे दडलेली तुटलेली सत्यता अजूनही समाजाच्या विवेकाला भिडलेली नाही.
पुरुषप्रधान संस्कृतीच्या कठोर चौकटीत पुरुष हा लोखंडासारखा असावा, भावनाहीन असावा, कधीही न ढळणारा असावा.. अशी अपेक्षा शतकानुशतके भिंतीवर लिहिलेल्या नियमांसारखी उभी आहे.
या व्यवस्थेत जेव्हा एखादा पुरुष तुटतो, थरथरतो, डोळ्यांतून अश्रू गाळतो… तेव्हा त्याला “बाईसारखा रडतोस” म्हणून हिणवलं जातं.
भावना व्यक्त करणं जणू त्याचं पुरुषत्त्व हरवल्यासारखं ठरवलं जातं.. हे किती क्रूर आणि विडंबनात्मक आहे.!
मुंबईच्या बोरिवली स्थानकात कॅमेरासमोर कोसळलेल्या एका तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला..
सोशल मीडियावर त्यावर उपहासात्मक प्रतिक्रिया, टोमणे आणि ‘मिम्स ’चा पाऊस पडला..
पण ज्यांनी हसत हसत तो व्हिडिओ फॉरवर्ड केला… त्यांनी कधी स्वतःला विचारलं का..या अश्रूंमागील न बोललेलं दुःख कोण जाणतं..?
आजची व्यवस्था अशी झाली आहे की, दुःखही बाजारातलं उत्पादन बनलंय.
कोणाचं दुःख विकायचं आणि कोणाचं दुर्लक्षित करायचं हेही आता ट्रेंड ठरवतो...
या गल्लीबोळात पुरुषांचं दुःख तर कुणालाच ऐकू येत नाही… कारण त्यांना रडण्याची परवानगीच दिलेली नाहीए..
पण सत्य असं आहे की, पुरुषही माणूस आहे,त्यालाही संवेदना आहेत..
त्याच्याही छातीत थरथरणाऱ्या असुरक्षा आहेत. त्याच्याही मनात न सांगता येणाऱ्या भीती आहेत. त्यालाही भावनिक आधाराची गरज आहे..कारण संवेदना लिंगावरून ठरत नाहीत; त्या माणूसपणावरून ठरतात.
ज्या समाजात मुलालाही “रडू नका, पुरुष बना!”
असं सांगितलं जातं, तिथे उद्या हाच पुरुष कुणासमोर मन मोकळं करणार?
कुठे ठेवणार आपल्या वेदना? कसा मागणार मानसिक आधार?
आपल्यापैकी प्रत्येकाला अंतरमुख करणारा प्रश्न आज समाजासमोर उभा आहे..
पुरुषांना रडण्याचा, तुटण्याचा, मदत मागण्याचा अधिकार आपण कधी देणार..?
भिंती मोडल्या पाहिजेत..मनांच्या कुलूपांना चावी दिली पाहिजे.
आणि प्रत्येक अश्रू तो स्त्रीचा असो वा पुरुषाचा..माणुसकीच्या दृष्टीने समान महत्त्वाचा आहे, ही जाणीव प्रबोधनाच्या प्रकाशासोबत आपल्या मनात कायमची पेटती ठेवली पाहिजे.
मित्रांनो,
आपण प्रत्येकाने एक पाऊल उचललं….तर आज रडणारा एक पुरुष फक्त व्हिडिओतील चेहरा न राहता...एक. भावनाशील माणूस म्हणून दिसू लागेल...
-एक संवेदनशील माणूस..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,परभणी..
Post a Comment