जे बहुसंख्यांना आनंददायी वाटतं, त्याचं ते विवेकाच्या कसोटीवर परीक्षण करतात. म्हणूनच त्यांचा प्रवास काटेरी असतो.
भोंगे, कर्णकर्कश गाणी, धार्मिक उन्माद, टगेगिरी, भडक रंगांची दिखाऊ निष्ठा...हे सगळं विवेकवादी डोळ्यांना खुपतं. कारण त्यांना ठाऊक असतं की ही सारी दृश्यं मानवाच्या अंतर्मनावर काळी सावली टाकतात.
देवळं, मशिदी, विहार, चर्च यांच्या वास्तुशिल्पाला ते दाद देतात, पण श्रद्धेच्या आड लपलेल्या अंधाराला कधीही शरण जात नाहीत. कारण त्यांच्यासाठी खरी उपासना म्हणजे बुद्धीचा प्रकाश, आणि खरी प्रार्थना म्हणजे मानवी हक्कांचा सन्मान..
स्वातंत्र्य, स्वेच्छा आणि समानतेशिवाय मानवी जीवनाचं कोणतंही मूल्य नाही हा त्यांचा ठाम विश्वास. कुणी कुणावर प्रेम करावं, कुणी कुणासोबत आयुष्य उभं करावं, हे समाजाने ठरवणं म्हणजे स्वातंत्र्याचा अपमानच.
त्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे करुणा, मैत्री आणि मानवतेचा उत्सव. धर्माच्या नावाखाली जर अन्याय, दडपशाही आणि असमानता पसरवली जात असेल तर तो धर्म नाही...ती फक्त सत्तेची आणि स्वार्थाची मुखवट्या मागील बाजारपेठ आहे.
त्यांच्या दृष्टीने खरी पूजा म्हणजे माणसाला माणूस म्हणून मान देणं. कुणी गरीब असेल, कुणी श्रीमंत; कुणी बहुसंख्येतला असेल, कुणी अल्पसंख्येतला..यात त्यांना कधी फरक दिसत नाही. त्यांच्यासाठी खरी आरती म्हणजे समानतेचा दीप लावणं आणि खरी नमाज म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं.
विवेकवाद्यांना माहीत असतं की लिंगभेद, जातिभेद, धर्मभेद हे सगळं कृत्रिम आहे..मनुष्यजातीच्या नैसर्गिक उत्क्रांतीला अडथळा ठरणारं आहे.
म्हणून ते म्हणतात, “माणूस म्हणजे माणूस...बाकी सारे लेबल्स ही फक्त समाजाची भीती आहे.”
मृत्यूनंतर काही उरणार नाही ही साधी वैज्ञानिक जाणीव विवेकवाद्यांना माहीत आहे. म्हणूनच ते सांगतात की मेल्यानंतर शरीरावरून, मालमत्तेवरून रक्तपात करणे म्हणजे मानवी विवेकाचा पराभव आहे.
पण समाजाचा बहुसंख्य भाग अजूनही अंधश्रद्धेच्या दलदलीत अडकलेला आहे. विवेकवादी लोक त्यांना शिकवतात, प्रश्न विचारतात, पण बहुतेक वेळा हिणवले जातात, वेडे ठरवले जातात. तरीही ते मागे हटत नाहीत.
कारण इतिहासाचा प्रत्येक मोठा बदल..भले तो गुलामगिरीचा अंत असो, स्त्रियांच्या हक्कांची लढाई असो, धर्मस्वातंत्र्य असो सुरुवातीला थोड्या विवेकवादी, पुरोगामी लोकांच्या धैर्यानेच घडलेला आहे.
ते एकेकटे दिसले तरी त्यांच्या मागे येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा पाया घालणारे असतात..
समाजाच्या बुद्धीची उत्क्रांती हळूहळू जरी मुंगी चालल्यासारखी घडते. पण म्हणून ती निरर्थक नाही. कारण एकदा सत्य रुजलं, की ते चिरंतन होतं. विवेकवाद्यांचा प्रवास जरी असह्य वाटला तरी त्यातच मानवतेचं खरं बीज आहे.
आणि म्हणूनच...“सत्याला भीडणारा माणूस एकाकी पडतो, पण सत्यासाठी झगडणारा माणूस कधीच हरवत नाही. कारण त्याच्यामागे भविष्य उभं राहत असतं.”
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment