जगाची लोकसंख्या आज 900 कोटींहून अधिक आहे. त्यातले 31.5% ख्रिश्चन, 23.2% मुसलमान, 15.1% हिंदू, 7.1% बौद्ध, 0.2% ज्यू, 5.9% आदिम जमाती, 0.8% इतर आणि तब्बल 16.3% लोक "अनाम" आहेत.
पण आश्चर्यकारक बाब म्हणजे, जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी संख्या ही "धर्मनिरपेक्ष" वा "सेक्युलर" म्हणविणाऱ्यांची आहे.
त्यांची संख्या आता 114 कोटींवर पोहोचली आहे. ख्रिश्चन आणि मुसलमानांनंतर त्यांचा क्रमांक येतो. म्हणजेच, हिंदूंपेक्षा धर्मनिरपेक्षांची संख्या जास्त आहे आणि त्यांची वाढ पाहता, लवकरच ते जगात पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील, असे संशोधक सांगतात.
धर्म हा हजारो वर्षांपूर्वी जन्मलेला, तर सेक्युलॅरिझमचा विचार केवळ काही शतकांपूर्वीचा... तरीसुद्धा धर्म झपाट्याने मागे पडत आहेत आणि धर्मनिरपेक्षता आणि विवेकीपणा वेगाने पुढे सरकत आहे.
धर्मांचे मूलभूत ध्येय...
खरे पाहता सर्व धर्मांची शिकवण सारखीच आहे. सारे मानव एकाच सृष्टीकर्त्याची लेकरं आहेत. सर्वांचा कल्याणमार्ग म्हणजे बंधुभाव, शुद्धता, तप, त्याग, दान आणि मोहाचा त्याग.
अंतिम साध्य म्हणजे ईश्वरप्राप्ती किंवा सत्यप्राप्ती.
परंतु अडचण एवढीच की प्रत्येक धर्माचा ईश्वर वेगळा आहे.
हिंदूंचं ब्रह्म, बौद्धांचं निर्वाण, ख्रिश्चनांचा गॉड, इस्लामचा अल्ला, तर इतरांचा आपापल्या धर्मगुरुंनी सांगितलेला परमेश्वर. मार्ग वेगळे, नावं वेगळी..पण मुळात उद्देश सारखाच.
धर्मनिरपेक्ष लोकांसाठी "ईश्वर" ही संकल्पना गौण असली तरी, सत्य, नैतिकता आणि मानवी कल्याण हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे.
धर्म व संघर्ष ...
धर्मांचे हे मार्ग जगभर पसरले, पण त्यांच्या "सीमा" ठरल्या. या सीमांनी संघर्ष निर्माण केले. ज्यूंना छळ छावण्यांत बंदिस्त केले गेले. शिख, हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान..साऱ्यांच्या सीमा युद्धातून ठरल्या...बौद्ध व जैनांचा विस्तार स्थानिकच राहिला.
इतिहास सांगतो, धर्मांनी जेथे-जेथे एकमेकांना भिडवलं, तेथे नरसंहार घडले. आजवर झालेल्या 14,500 युद्धांपैकी 12,000 हून अधिक युद्धे धर्माच्या नावाखाली झाली आहेत..
भारतामध्ये 14 व्या शतकात एकट्याने 40 लाख माणसे धर्मयुद्धांत ठार झाली. धर्म युद्धाच्या नावाखाली केलेले हत्याकांड केवळ "इतर धर्मीयांना संपवण्यासाठी" नव्हते, तर "आपला पंथ श्रेष्ठ ठरवण्यासाठी"ही होती.
शैव-वैष्णव, शिया-सुन्नी, कॅथलिक-प्रॉटेस्टंट, श्वेताम्बर -दिगंबर, हिनयान-महायान, साऱ्यांनी आपापल्या बंधूंच्याच छाताडावर तलवारी रोवलेल्या आहेत.
एका विचारवंताने म्हटले आहे,
“ धर्म आणि सत्ता जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सैतान जन्माला येतो.”
भय आणि गुलामगिरी :
धर्मांनी माणसाला मोक्ष, निर्वाण, स्वर्ग, जन्नत दाखवली..
पण त्याचबरोबर नरक, जहन्नुम, शाश्वत शिक्षा यांची भीतीही दिली.
म्हणजे भक्तीपेक्षा भीतीने धर्म टिकले..
"नरकात जाशील",
"जहन्नुममध्ये रहावं लागेल."
👉 धर्माचा पाया भीतीवर रचला गेला, भक्तीवर नव्हे..
👉 "पुण्य मिळेल", "मोक्ष मिळेल" यापेक्षा "नरकात टाकलं जाईल", "जहन्नुममध्ये जळावं लागेल" हे भयच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलं...
👉 जिथे प्रेम, करुणा, समता, आत्मज्ञान यांचा प्रचार व्हायला हवा होता, तिथे नरक, पाप, शाप यांच्या गोष्टींनी माणसाला झुकवलं..
👉 धर्माचं खऱ्या अर्थाने जतन भक्तीने नव्हे तर भीतीने केलं गेलं भीती गमावली, तर धर्माच्या चौकटीही हलायला लागतात.
या धाकामुळे लोकांनी धर्माचे पालन केले..
जन्माला येणारे मूल कोणत्याही धर्माचे नसते. ते हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वा बौद्ध होते..कौटुंबिक संस्कारामुळे, जन्माच्या अपघातामुळे...म्हणजे धर्म हा "स्वतःचा शोध" नसून "जन्माने मिळालेली ओळख" ठरतो.
प्रश्न अभिमानाचा :
येथे मूलभूत प्रश्न आहे ...
"ज्याच्यासाठी आपण परिश्रम केले नाही, जी गोष्ट आपल्याला केवळ जन्माने मिळाली, तिचा अभिमान कशासाठी?"
धर्म, जात, राष्ट्र..सर्व अभिमान हे जन्मापोटी आलेले.
अभिमान वाटायचा तो मिळवलेल्या उपलब्धीचा, ज्ञानाचा, परिश्रमांचा. पण धर्माच्या नावाने हा अभिमान माणसाला अंध करतो, शत्रुत्व निर्माण करतो, रक्तपात घडवतो.
इतिहासाचा शिकवणूकदार आरसा...
धर्मयुद्धांच्या काळात अण्वस्त्र नव्हते, तरी नरसंहार झाले.
कलिंग युद्धात अशोकाने 3 लाख सैनिक मारले.
विसाव्या शतकात हुकूमशहांनी स्वतःच्या देशातील 16 कोटी 90 लाख लोकांचा वध केला.
इतके रक्तपात झाले तरी आजही धार्मिक विजय उत्सवांनी गौरविले जातात.
हिंदूंचा दसरा, रावण दहन.
मुसलमानांमध्ये करबला.
ख्रिश्चन विजयांचे सण.
विजय साजरे होतात, पण पराजितांची वेदना दाबली जाते.
धर्म की सत्य?
धर्मांनी "पापे" केली आणि "पांघरूणं" घातली.
यज्ञयाग, पूजा, भक्ती, श्रद्धा—या सर्वांखाली नरसंहार झाकले गेले.
धर्माने माणसाला सत्यापेक्षा सत्ता शिकवली.
त्यामुळे प्रश्न निर्माण होतो—
👉 आपल्याला खरंच "सत्तेकडून सत्याकडे" वळायचं आहे का?
👉 की अजूनही आपण धर्माच्या नावाने माणुसकीचा बळी द्यायचा आहे?
👉 आपण स्वातंत्र्याच्या नावाने अंधश्रद्धेच्या बेड्या घालायच्या आहेत का, की विवेकाच्या उजेडात नवा मार्ग शोधायचा आहे?
👉 आपण परंपरेच्या नावाने प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करायचं आहे का, की प्रश्नांना उत्तरं देऊन समाज घडवायचा आहे?
👉 आपण अजूनही भीतीवर उभ्या धर्माच्या सावल्या मागे धावणार आहोत का, की प्रेम, करुणा आणि समतेच्या सूर्याला सामोरं जाणार आहोत?
मानवजातीचं खरं भविष्य हे धर्मांच्या भिंती तोडून सत्याच्या दिशेने जाण्यात आहे. सत्तेच्या मोहाने जन्मलेला धर्म जर भीती, रक्तपात, युद्ध यांच्यात अडकला, तर धर्मापेक्षा धर्मनिरपेक्षतेचा मार्गच अधिक मानवी आणि विवेकनिष्ठ ठरतो.
अभिमान जन्माचा नसून कृतीचा असावा. भक्ती भीतीवर नव्हे तर सत्यावर आधारित असावी. आणि सार्वजनिक मानवी जीवनात सत्य, तर्क आणि विवेकी जीवन-मूल्यांना प्रथम स्थान असावं. कारण जन्माचा अभिमान समाजाला विभागतो, पण कृतीचा अभिमान समाजाला उभं करतो. भीतीवर उभी केलेली भक्ती माणसाला गुलाम बनवते, पण सत्यावर उभी केलेली भक्ती माणसाला मुक्त करते. म्हणूनच खरी श्रद्धा ही तर्कशुद्ध, विवेकनिष्ठ आणि माणुसकीची असावी; जी मनुष्याला वर नेईल, खाली ओढणार नाही.
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment