दररोजचा उगवता सूर्य आपल्यासमोर नव्या आव्हानांची सुवर्णताटवे सजवून ठेवतो. ही आव्हाने पेलायची असतील, तर आपली इच्छाशक्ती लोखंडासारखी कणखर आणि मन काचेसारखे पारदर्शक असावे लागते. कारण स्वतःला घडविणे हीच खरी यशाची पहिली पायरी आहे.
पण प्रश्न असा उभा राहतो की...
आपण स्वतःला घडवायचं तरी का?
उत्तर सोपं आहे : जीवनाला परिपूर्णतेचा अर्थ द्यायचा म्हणून, अस्तित्वाला चमकती ओळख द्यायची म्हणून..?
अनेकदा आपण यशाचा अर्थ पैशात शोधतो. अफाट संपत्ती जमवली की आपण विजेता झालो असं वाटतं. पण खरे यश हे पैशाच्या पोकळ खणखणाटात नसून, त्या पैशाचा उपयोग कोणत्या विधायक कार्यासाठी केला जातो यात दडलेले असते.
प्रसिद्धीही यशाची मोजपट्टी नाही. टाळ्यांचा गडगडाट हा यशाचा आवाज नसेलच; तो कधी कधी केवळ क्षणभंगुर प्रतिध्वनी असतो.
यश म्हणजे काय तर...आपण ठरवलेल्या उद्दिष्टाचा शिखर गाठणे. आपल्या अंगी दडलेल्या कौशल्याला सर्वोच्च तेजाने उजळवणे. जणू काही आपण आपल्याच सीमांचे कवच फोडून अनंत आकाशाला स्पर्श करतो, तेच खरे यश.
परंतु, एकदा मिळवलेले यश टिकवणे हेच अधिक कठीण. कारण यश हे स्थिर नसते; ते पाण्यासारखे वाहते, सतत हालते. ते टिकवण्यासाठी नित्य नवे दररोज काहीतरी शिकावे लागते.
स्वतःला नव्याने घडवावे लागते. चुकांपासून शिकणे हाच प्रगतीचा दीपस्तंभ आहे; पण तीच चूक पुन्हा पुन्हा करणे म्हणजे वाटेवर स्वतःचाच अडथळा उभारणे.
खरी स्पर्धा ही कधीच इतरांशी नसते. ती स्वतःशीच असते. कालचा मी आणि आजचा मी... हेचं खरं रणांगण आहे.. तुलना करायचीच असेल तर दुसऱ्याशी नव्हे, तर स्वतःच्या कालच्या रूपाशी करा. दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला उंचावण्यासाठी करा.
यशाची व्याख्या बाहेर कुठे नाही, ती आपल्या विचारांत दडलेली आहे. जसा तुमचा विचार तसा तुमचा दृष्टिकोन आणि जसा दृष्टिकोन, तशी तुमची शिखरावरची यशस्वी वाटचाल आहे मित्रांनो.
म्हणूनच...
🌿 यश म्हणजे फक्त गाठलेले शिखर नव्हे, तर त्या शिखरापर्यंत पोहोचताना सोसलेली कडाक्याची थंडी, चढलेल्या खडकाळ पायवाटा आणि त्यातून उराशी बाळगलेले धैर्य.
🌿 यश म्हणजे फक्त टाळ्यांचा आवाज नव्हे, तर न बोलता मिळालेली आईवडिलांची मूक आशीर्वादाची थाप, गुरुंच्या डोळ्यात दिसलेला अभिमानाचा चमकता कण.
🌿 यश म्हणजे बाह्य कौतुक नव्हे, तर मनाच्या अंतरंगात उमटणारी स्थिर समाधी, जिथे स्वतःचं मन आपल्यालाच म्हणतं.. “तू तुझ्या मार्गावर प्रामाणिकपणे चाललास.”
🌿 यश म्हणजे शेकडो लोकांच्या ओळखी नव्हे, तर संकटकाळी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा एकच खरा सोबती.
🌿 यश म्हणजे स्वप्न पूर्ण झालं म्हणून हुरळून जाणं नव्हे, तर ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नवं स्वप्न उभारण्याची असलेली भूक.
यश हे आपण घडवलेल्या दृष्टिकोनात दडलेले आहे. विचार जर विस्तीर्ण असतील, तर यश देखील महासागराइतके अथांग भासते.
यशाची खरी ओळख ही केवळ शिखरावर पोहोचण्यात नसून, त्या शिखरावर उभे राहून नव्या शिखरांचा शोध घेण्यात आहे.
यश म्हणजे अंतिम थांबा नव्हे..ते तर पुढच्या प्रवासाला हाक देणारे एक पाऊल आहे. यश म्हणजे क्षणिक आनंद नव्हे ते तर आयुष्यभर जपता येईल असे आत्मबल आहे.
यश म्हणजे इतरांना मागे टाकणे नव्हे...ते तर स्वतःलाच सतत पुढे नेत राहणे आहे. ज्याच्या मनात विचार उंच आहेत, त्याच्या वाटा कधीच अरुंद राहत नाहीत.ज्याच्या दृष्टिकोनात उजेड आहे, त्याला अंधार कधीच अडवत नाही आणि ज्याच्या अंतःकरणात आत्मविश्वास आहे, त्याच्यासाठी यश हे फक्त ध्येय नसून जीवनाचा अविभाज्य श्वास ठरतो.
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक साहित्यप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#यश #प्रेरणा #विचार #दृष्टिकोन #आयुष्य #विद्यार्थीमित्र #प्रेरणादायीविचार #SelfGrowth #Motivation #Success #LifeLessons #PositiveVibes #Inspiration #Thoughts #Mindset #DreamBig #NeverGiveUp #Leadership #HardWork #Wisdom #Vision #JourneyToSuccess #SelfImprovement #Learning #GoalSetting #InnerPeace #Confidence #BelieveInYourself #सकारात्मकता #संघर्ष #आत्मविश्वास #VisionToReality #thespiritofzindagi
Post a Comment