तुफानातील दिवे आम्ही, तुफानातील दिवे।
तुफान वारा, पाऊसधारा, मुळी न आम्हा शिवे।
हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग अमुचे बालेकिल्ले।
असाच ताठर माथा अमुचा, जरा न खाली लवे।।
महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात काही शब्द केवळ ऐकू येत नाहीत, तर ते मन जागवतात, स्वाभिमान चेतवतात आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देतात. महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांची शाहिरी अशीच परिवर्तनाची मशाल होती.
दारिद्र्य, श्रम आणि सामाजिक विषमतेच्या कठीण वास्तवातून घडलेले वामनदादा औपचारिक शिक्षणाने मोठे झाले नाहीत..पण स्वाध्याय, अनुभव आणि जिद्दीने त्यांनी स्वतःला घडवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा स्पर्श त्यांच्या जीवनाला झाला आणि त्यांच्या कलेला परिवर्तनाची दिशा मिळाली.
वामनदादांची कविता ही करमणुकीची नव्हे, तर प्रबोधनाची भाषा होती. त्यांच्या गीतांत दुःख होते, पण निराशा नव्हती..आक्रोश होता, पण दिशाहीनता नव्हती, संघर्ष होता आणि त्यामागे समतेच्या पहाटेचे स्वप्न होते. गीत, पोवाडा, जलसा आणि शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, संघटन, स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार जनसामान्यांच्या ओठांवर आणला.
त्यांच्या शब्दांची खरी ताकद त्यांच्या लोकभाषेशी जोडलेल्या नाळेत होती. म्हणून त्यांची गीते पुस्तकांत बंदिस्त राहिली नाहीत, तर ती वाड्या-वस्त्यांत, तांडे-तांड्यांत, कारखान्यांत आणि चळवळीच्या मैदानांत घुमत राहिली. त्यांची शाहिरी म्हणजे उपेक्षितांच्या वेदनेला मिळालेला आवाज आणि शोषणाविरुद्ध उभारलेला सांस्कृतिक प्रतिकार होता.
वामनदादांना अभिवादन म्हणजे केवळ त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करणे नव्हे; तर त्यांच्या शब्दांतील विवेक, स्वाभिमान, समता आणि परिवर्तनाची ज्योत आपल्या विचारांत आणि कृतीत जिवंत ठेवणे होय. आजही जातीय विषमता, अंधश्रद्धा, सामाजिक अन्याय आणि आर्थिक विषमतेच्या सावल्या असताना वामनदादांची शाहिरी आपल्याला प्रश्न विचारते आणि परिवर्तनाची वाट दाखवते.
जात-पात तोडा रे, माणुसकीला मान द्या,
अंधश्रद्धेच्या अंधाराला, विवेकाची ज्योत द्या।
अन्यायाच्या भिंती तोडा, समतेचा झेंडा उभारा,
वामनदादांच्या शब्दांनी, परिवर्तनाचा दीप जाळा!
शब्दांत विद्रोह, गीतांत प्रबोधन, शाहिरीत समतेचा लढा आणि हृदयात डॉ.बाबासाहेबांचा विचार हीच महाकवी वामनदादा कर्डक यांच्या कार्याची अमर ओळख आहे, मित्रांनो..!
महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏
-एक त्यांचा वैचारिक चाहता..
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment