🎓 दक्षिण भारत – हैद्राबाद.. शैक्षणिक अभ्यासदौरा..
गेल्या दोन दिवसांपासून परभणीपासून सुमारे 350-400 कि.मी. अंतरावर वसलेले, दक्षिण भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी असलेले हैद्राबाद शहर अनुभवण्याचा योग आला. हे शहर केवळ भौगोलिकदृष्ट्या विशाल नाही, तर विचार, संस्कृती आणि संधींच्या विस्तारानेही समृद्ध आहे. राजकीय हालचाली, शैक्षणिक केंद्रे, आर्थिक उलाढाल आणि गंगा-जमनी तहजीब यांचा सुरेख संगम असलेले हे शहर खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे प्रतीक भासते.
उच्च दर्जाची खानपान संस्कृती, हायटेक सिटी, औद्योगिक व संशोधन केंद्रे, आणि दरवर्षी झपाट्याने विस्तारत जाणारे नागरीकरण..या साऱ्यांमुळे हैद्राबाद सतत गतीमान आहे. येथे आमचे अनेक नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले आमच्या शैक्षणिक परिवारातील शेकडो यशस्वी माजी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा दौरा केवळ अभ्यासपूर्णच नव्हे, तर भावनिक नात्यांनीही समृद्ध ठरला.
आजच्या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यात उस्मानिया विद्यापीठाच्या ज्ञान-संकुलाला भेट देण्याचा योग आला. दक्षिण भारतातील JNU म्हणून ओळखले जाणारे हे विद्यापीठ विद्यार्थी चळवळींचे केंद्र, तेलगू अस्मितेचे बौद्धिक अधिष्ठान आणि शैक्षणिक-सामाजिक विकासाची एक जिवंत प्रयोगशाळा आहे. येथे डाव्या विचारसरणीचा वैचारिक प्रभाव असलेल्या विद्यार्थी संघटना सक्रिय असून, सर्व जाती-धर्मांचे विद्यार्थी गुण्यागोविंदाने, निर्भयपणे आणि चिकित्सक बुद्धीने शिक्षण घेताना दिसतात.
विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाल्यामुळे शहरी भागात आर्थिक तणाव तुलनेने कमी जाणवतो. याउलट मराठवाड्यासारख्या भागात आजही रोजगार उपलब्ध होणे अनेकांसाठी संघर्षाचेच गणित ठरते,ही तुलना अंतर्मुख करणारी ठरते.
आजच्या भेटीदरम्यान बहुचर्चित आयटी क्षेत्रातील वेगाने बदलणाऱ्या प्रवाहांवरही सखोल चर्चा झाली. नित्यनव्या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात सातत्याने नव्या रोजगारसंधी निर्माण होत असताना, हैद्राबादमधील आमेरपेठ परिसरातील काही आयटी प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांना भेट देण्याचा योग आला.. तेथे आमच्या काही स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला.
Industry-oriented अभ्यासक्रम, अल्पकालीन (Short-term) कोर्सेस आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धती यांची सविस्तर माहिती मिळाली. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,
भविष्यातील आयटी क्षेत्राची पायाभरणी आजच करायची असेल, तर आपल्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणपद्धतीत मूलगामी बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे.
तंत्रज्ञानाशी मैत्री, कौशल्यांना प्राधान्य आणि विचारांना मोकळीक ही त्रिसूत्री अंगीकारली, तरच आपण आपल्या मुलांच्या हाती सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भवितव्य देऊ शकू, असा ठाम विश्वास वाटतो.
दिवसभराच्या अभ्यासानंतर काही ठिकाणी पर्यटनाचाही आनंद घेता आला. संध्याकाळी चारमिनार परिसरातील प्रसिद्ध बिर्याणीचा आस्वाद घेतला हा अनुभव शब्दांत पकडणे कठीण आहे; तो चवीइतकाच खाद्य संस्कृतीचा उत्सव होता.
दिवसभर आमच्यासोबत आमचे माजी विद्यार्थी सय्यद समीर, मोहम्मद कैफ, जुनेद, अदनान तसेच युनूस पाशा भाई यांची मोलाची साथ लाभली. त्यांच्या आपुलकीबद्दल आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार..🙏
हा अभ्यासदौरा केवळ शहर पाहण्याचा नव्हता; तो विचारांना चालना देणारा, भविष्याची दिशा दाखवणारा आणि शिक्षणाच्या नव्या शक्यतांवर विश्वास जागवणारा अनुभव ठरला हीच त्याची खरी फलश्रुती आहे, मित्रांनो..
#एक अभ्यासक आणि समुपदेशक.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment