मानवजातीच्या बौद्धिक इतिहासात काही विचार असे असतात की जे केवळ एखाद्या काळापुरते मर्यादित राहत नाहीत, तर पिढ्यान्-पिढ्यांच्या चेतनेला दिशा देतात. इंग्लंडचे महान तत्त्वज्ञ जॉन लॉक हे असेच एक तेजस्वी नाव. अंधश्रद्धा, दैवी अधिकार आणि जन्मजात श्रेष्ठत्वाच्या अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला त्यांनी अनुभवाचा प्रकाश आणि विवेकाचे शस्त्र दिले.
जॉन लॉक कोण होता..?
जॉन लॉक (John Locke) हा इंग्लंडमधील थोर तत्त्वज्ञ, राजकीय विचारवंत आणि आधुनिक लोकशाहीचा वैचारिक पाया घडवणारा विचारवंत होता. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1632 रोजी झाला आणि निधन 28 ऑक्टोबर 1704 रोजी झाले. 17व्या शतकातील हा महत्त्वाचा विचारवंत अनुभववादाचा (Empiricism) प्रमुख प्रवर्तक मानला जातो. मानवी ज्ञान जन्मजात नसून अनुभवातून घडते (Tabula Rasa), तसेच शासन हे लोकांच्या संमतीवर आधारित असावे, जीवन–स्वातंत्र्य–मालमत्ता हे नैसर्गिक हक्क आहेत आणि अन्यायी शासनाविरुद्ध बंड करण्याचा अधिकार लोकांना आहे..हे मूलगामी विचार त्यांनी मांडले. त्यांच्या विचारांनी आधुनिक लोकशाही, संविधानवाद आणि मानवाधिकार चळवळींना जागतिक स्तरावर वैचारिक दिशा दिली.
जॉन लॉक यांचा मूलमंत्र साधा पण क्रांतिकारी होता..माणूस जन्मतः कोरी पाटी असतो.ज्ञान हे देवदत्त नसते, रक्तातून वाहत येत नाही, तर ते अनुभवातून घडते. हा विचार केवळ तत्त्वज्ञानापुरता मर्यादित नव्हता; तो शिक्षणव्यवस्था, समाजरचना आणि राजकारण यांचा पाया हादरवणारा होता. कारण एकदा जर माणूस जन्मतः समान आहे हे मान्य केले, तर जन्म, जात, वर्ग किंवा सत्तेच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला नैतिक अधिष्ठान उरत नाही.
अनुभववादाचा हा विचार समाजाला एक स्पष्ट संदेश देतो,
" शिकणे हे आज्ञेने नव्हे, तर अनुभवाने घडते; आणि विवेक हा अंधानुकरणातून नव्हे, तर चिंतनातून विकसित होतो."
आजही शिक्षण केवळ परीक्षांच्या चौकटीत अडकवले जात असताना, लॉक यांचा विचार विद्यार्थ्यांना मुक्त विचारांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाट दाखवतो.
पण जॉन लॉक केवळ ज्ञानाचा विचार करणारा तत्त्वज्ञ नव्हता; तो लोकशाहीचा वैचारिक शिल्पकार होता. त्याने निर्भीडपणे सांगितले की राज्य हे देवाने दिलेले नसून लोकांनी निर्माण केलेले यंत्र आहे. शासनाचा उद्देश लोकांवर राज्य करणे नव्हे, तर लोकांचे नैसर्गिक हक्क जपणे हा आहे. जीवन, स्वातंत्र्य आणि मालमत्ता हे हक्क कोणत्याही राजाच्या कृपेने नाही, तर मानवी अस्तित्वाच्या मुळाशी असलेले आहेत.
आज जेव्हा सत्तेला सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान समजले जाते, तेव्हा लॉक यांचा आवाज पुन्हा ऐकू येतो, " शासन हे लोकांच्या संमतीवरच उभे असते.कायद्याच्या वर कोणीही नाही, आणि विवेकाशिवाय सत्ता ही अन्यायाची जननी ठरते. " त्यामुळेच जॉन लॉक यांनी मर्यादित शासन, कायद्याचे राज्य आणि जबाबदार सत्ता या संकल्पनांना वैचारिक अधिष्ठान दिले.
अधिक महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी लोकांना भयमुक्त केले. जर शासन अन्यायी झाले, हक्क हिरावून घेतले, विवेक बाजूला सारून दडपशाही करू लागले तर ते शासन बदलण्याचा अधिकार लोकांचा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा विचार केवळ राजकीय नव्हता; तो मानवी आत्मसन्मानाचा घोष होता.
आजच्या काळात, जेव्हा समाज अंधश्रद्धा, व्यक्तीपूजा, असहिष्णुता आणि सत्तेच्या केंद्रीकरणाच्या संकटातून जात आहे, तेव्हा जॉन लॉक यांचा विचार दीपस्तंभासारखा मार्ग दाखवतो. अनुभवाला नाकारणारा समाज स्थिरावतो, आणि विवेकाला दडपणारे शासन शेवटी कोसळते..हा इतिहासाचा धडा लॉक यांनी आधीच दिला आहे.
हा लेख केवळ एका तत्त्वज्ञाची स्तुती नाही, तर आपल्या काळासाठी एक प्रश्न आहे..
आपण अनुभवातून शिकतो आहोत का.?
आपण विवेकाला सत्तेपेक्षा मोठे मानतो आहोत का.?
आणि शासनाला सेवा समजतो आहोत की प्रभुत्व.?
जॉन लॉक सांगतात की स्वतंत्र विचार करणारा नागरिक आणि विवेकाधिष्ठित शासन यांच्याशिवाय सशक्त लोकशाही शक्य नाही. म्हणूनच लॉक हे भूतकाळातले नाहीत; ते आज आणि उद्याच्या समाजासाठीही तितकेच आवश्यक आहेत.
अनुभवाचा प्रकाश स्वीकारूया, विवेकाचे राज्य उभे करूया हाच जॉन लॉक यांना दिलेला खरा अभिवादन ठरेल.
आजच्या डिजिटल, माहिती प्रचंड पण विचारदुर्बल होत चाललेल्या काळात जॉन लॉक यांचे विचार अधिकच अर्थपूर्ण ठरतात. सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती, अंधश्रद्धेचे नवे अवतार, व्यक्तीपूजेचा अतिरेक आणि प्रश्न विचारणाऱ्या विवेकशील आवाजांचे दमन या सगळ्या पार्श्वभूमीवर अनुभव, तर्क आणि विवेक यांचा आग्रह धरणारा लॉक आपल्याला सजग नागरिक होण्याचे भान देतो.
तो आपल्याला शिकवतो की विचार स्वातंत्र्याशिवाय शिक्षण पोकळ ठरते, आणि विवेकाविना सत्ता समाजासाठी घातक बनते.
लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती सतत जागृत असणाऱ्या विवेकशील नागरिकांची जीवनपद्धती आहे, हे जॉन लॉक वारंवार अधोरेखित करतात. शासनाला प्रश्न विचारण्याचे, अन्यायाला विरोध करण्याचे आणि हक्कांसाठी उभे राहण्याचे धैर्य ज्यांच्यात आहे, तेच खरे लोकशाहीचे रक्षक ठरतात.
आज जेव्हा “सत्ता म्हणजे सर्वकाही” असा भ्रम पसरवला जातो, तेव्हा लॉक यांचा विचार ठामपणे सांगतो, सत्ता ही साधन आहे, ध्येय नाही; आणि नागरिक हे प्रजाजन नसून सार्वभौम आहेत.
म्हणूनच जॉन लॉक यांना समजून घेणे म्हणजे केवळ इतिहास वाचणे नव्हे, तर वर्तमानाला आरसा दाखवणे आणि भविष्याची दिशा ठरवणे होय. अनुभवाचा प्रकाश स्वीकारून, विवेकाला केंद्रस्थानी ठेवून, प्रश्न विचारणारी आणि अन्यायाला न झुकणारी समाजमनाची निर्मिती करणे हाच त्यांच्या विचारांचा खरा आशय आहे. अनुभवाचा प्रकाश आणि विवेकाचे राज्य उभे करण्याचा हा संकल्प आपण आज स्वीकारला, तरच जॉन लॉक यांना दिलेले ते खरे, अर्थपूर्ण आणि काळाच्या पलीकडचे अभिवादन ठरेल, मित्रांनो..
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#JohnLocke #जॉनलॉक #Empiricism #अनुभववाद #TabulaRasa #Reason #विवेक #RationalThinking #लोकशाही #Democracy #Constitutionalism #मानवीहक्क #NaturalRights #RuleOfLaw #मर्यादितशासन #ResponsibleGovernance #शिक्षण #EducationForThought #CriticalThinking #ScientificTemper #विचारस्वातंत्र्य #प्रबोधन #Enlightenment #FreeThinking #विवेकवाद #Rationalism #AntiSuperstition #सामाजिकजाणीव #Humanism #RadicalHumanist #SocialReform #आजसाठीविचार #कालातीतविचार #ModernSociety #DigitalAgeThinking #जागृतनागरिक #ActiveCitizenship #विद्यार्थीमित्र #प्रा_रफीक_शेख #TheSpiritOfZindagi #APJAbdulKalamFoundation #InspireEducateEmpower
Post a Comment