“इतिहासाच्या विस्तीर्ण नभात प्रज्वलित झालेला ध्रुवतारा—पंडित जवाहरलाल नेहरू.”
आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने.. ✍️
इतिहासाच्या विराट नभांगणात काही तारे असे असतात की, त्यांचा प्रकाश एका पिढीपुरता नसतो तर तो युगानुयुगांना मार्ग दाखवतो.
पंडित जवाहरलाल नेहरू हे असेच एक तेजस्वी तारे..दूरदृष्टीचे ध्रुवदर्शक, विवेकाचे प्रवक्ते आणि आधुनिक भारताचे खरे शिल्पकार.
आज त्यांच्या 136 व्या जयंतीदिनी, स्मृतींच्या मंद वाऱ्यातही त्यांच्या विचारांचा सुगंध दरवळतो,आणि आपण त्या अद्वितीय युगप्रवर्तकाला स्मरण करतो..
🇮🇳 स्वातंत्र्याची लढाई : जिद्दीची शिखरे...
नेहरू नाव उच्चारलं की त्यागाची शपथ, जिद्दीची परंपरा आणि धैर्याची जाज्वल्य ज्वाला आठवते..
स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षांहून अधिक काळ त्यांनी तुरुंगात काढला.
पण लोखंडी दारांनी त्यांच्या विचारांना थांबवलं नाही, उलट त्या शांत अंधारातच जन्म झाला..
“Discovery of India” आणि “Glimpses of World History” सारख्या युग परिवर्तन करणाऱ्या ग्रंथांचा.
गुलामीच्या छायेत त्यांची लेखणी ही आशेची ज्योत होती,
भविष्याला उजेड देणारी, आणि राष्ट्राला दिशादर्शक ठरणारी.
📘 विचारांची समृद्धी आणि आधुनिकतेची वाट..
नेहरूंचा भारत म्हणजे..लोकशाहीची अढळ पायाभरणी,
समाजवादाचा संतुलित स्पर्श, विज्ञाननिष्ठ प्रगतीची वाटचाल,
आणि धर्मनिरपेक्षतेचे स्वच्छ, शांत झरे.
त्यांच्या मते, राष्ट्र म्हणजे केवळ एक भूभाग नव्हे;.ते असते मूल्यांच्या मातीवर उभे असलेले स्वप्नांचे विशाल मंदिर.
या मंदिराला भक्कम पाया देण्यासाठी त्यांनी देशात उद्योग, संशोधन संस्था, शैक्षणिक केंद्रे आणि वैज्ञानिक पायाभूत संरचना उभारल्या.
जग युद्धांच्या राखेत लोळत असताना..नेहरूंचा आवाज हा शांततेचा श्वास, मानवतेचा दीप आणि प्रगतिशील विचारांचा रणशिंग होता.
त्यांनी शिकवलं,
“जीवंत राष्ट्रं ही विचार करणाऱ्या नागरिकांमुळे फुलतात.”
🔺 दूरदृष्टी : पिढ्यांना उभारी देणारी..
आज आपण ज्या तंत्रज्ञानाचा अभिमान बाळगतो, ज्या उद्योगांच्या आधारावर अर्थव्यवस्था उभी आहे, ज्या लोकशाहीवर जग थक्क होऊन पाहतं...त्या सर्वांच्या बियांची पेरणी नेहरूंनीच केली.
त्यांच्या विचारात एक अद्भुत संतुलन दिसतं..
भावना आणि बुद्धी, परंपरा आणि आधुनिकता, संस्कृती आणि विज्ञान यांच्या सुंदर संगमाचं.
🌸 चाचा नेहरू : मुलांच्या निरागसतेत भविष्याचा ध्यास
मुलांसोबतचं त्यांचं नातं हे फक्त प्रेमाचं नव्हतं; तर ते होतं उद्याच्या भारतावरील अतूट विश्वासाचं द्योतक.
फुलांसारख्या कोवळ्या मनांना ते म्हणत..“तुम्हीच भविष्यातल्या भारताची सुंदर शिल्पं आहात.”
म्हणूनच मुलांच्या हसण्यात ते राष्ट्राचा सूर ऐकत होते, आणि त्यांच्या निरागसतेत देशाची पहाट पाहत होते.
पंडित जवाहरलाल नेहरू हे केवळ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते तर ते होते..
‘आधुनिक भारताचे वास्तुकार’, ‘विज्ञानाधिष्ठित राष्ट्रनिर्माणाचे मार्गदर्शक’,आणि ‘विचारशक्तीचे प्रखर दीपस्तंभ’.
त्यांच्या स्मृतीदिनी आपण त्यांना स्मरतो तो केवळ एका महान व्यक्तीला नाही, तर त्या विचारांना..जे आजही राष्ट्राच्या श्वासात वहात आहेत.
पंडित नेहरूंच्या तेजस्वी स्मृतींना विनम्र अभिवादन…!🙏
त्यांचा एक वैचारिक चाहता.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,परभणी.
#PanditNehru #JawaharlalNehru #NehruJayanti #ChildrensDay #ChachaNehru #ModernIndiaArchitect
#NationalLeader #IndianHistory #DiscoveryOfIndia #GlimpsesOfWorldHistory #VisionaryLeader
#IndianDemocracy #SecularIndia #ScientificTemper #NationBuilding #FreedomStruggle
#IndianIndependence #HistoricLegacy #ThoughtLeader #IntellectualLegacy #NehruThoughts
#ProgressiveIndia #ValuesOfIndia #EducationalReforms #SocialAwakening #InspirationalWriting
#MarathiWriter #RafiqueShaikh #vidyarathimitra
Post a Comment