माणसामध्ये नवनवीन रचना घडविण्याची अद्भुत क्षमता आहे. तो केवळ रक्त–मांसाचा पुतळा नाही, तर सर्जनशीलतेची ज्योत आहे. माणसाच्या अंतरंगात एक अशी दैवी शक्ती आहे जी त्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते, निराशेतून आशेकडे नेते आणि पराभवातून विजयाकडे नेते..ती शक्ती म्हणजेच आत्मविश्वास..!
जीवन हा अखंड प्रवास आहे. प्रवासात थांबणं म्हणजे मागे जाणं. आपल्यामध्ये कितीही मर्यादा असल्या, तरी “मी कमी आहे” ही भावना मनातून उपटून टाकली पाहिजे. कारण प्रत्येक मनुष्याला निसर्गानं एक अद्वितीय ठेवा दिलेला आहे. तो ठेवा ओळखणं, जपणं आणि उजागर करणं हेच जीवनाचं खरं ध्येय आहे.
आत्मविश्वास नसलेला माणूस हे नौकानायकाविना तरंगणाऱ्या होड्यासारखा असतो. दिशाहीन, बेभरवशाचा. पण आत्मविश्वासाने सज्ज झालेला माणूस हीच नौका वादळाला छेद देत दूरवर गाठू शकते.
आत्मविश्वास हा कर्तृत्ववृक्षाचं मूळ आहे. जसा वृक्ष आपल्या मुळांना भूमीत खोलवर रुजवतो तसाच आत्मविश्वास मनामध्ये जितका खोलवर रुजतो तितकं संकटांना झेलण्याचं सामर्थ्य वाढतं...
वादळं झेलणारा वृक्षच हिरवागार राहतो, तसाच संकटांचा सामना करणारा माणूसचं खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो.
इतिहास याचं साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी मर्यादित साधनं असूनही आत्मविश्वासाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं. भगतसिंगानं फाशीच्या दोरीला हसत हसत आलिंगन दिलं, कारण त्याचा आत्मविश्वास देशाच्या स्वातंत्र्यावरील निष्ठेवर आधारलेला होता. महात्मा गांधीसारखा कृश, दुर्बल देहाचा मनुष्यही सत्याग्रहाच्या आत्मविश्वासाने साम्राज्य हादरवू शकतो हे जगानं पाहिलं.
आत्मविश्वास ही केवळ यशाची किल्ली नाही, तर तो आनंदाचा, सौख्याचा आणि समाधानाचा मूळ झरा आहे. जो स्वतःला हीन, दीन, दुर्दैवी, पतित, पापी समजतो तो आपल्याच क्षमतांना गाडून टाकतो.
माणसाच्या मनातील विचार ही बीजं आहेत. सकारात्मक विचारांची बीजं रुजली तर त्यातून फुलं उमलतात, पण न्यूनगंडाचं बीज रुजलं तर काटेच काटे वाढतात. म्हणूनच आत्मविश्वास हा मनाच्या बागेतील सुवर्णबीज आहे.
आयुष्यात संघर्ष अपरिहार्य आहे. पण संघर्ष हे संकट नाहीत, ते तर आयुष्याच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका आहेत. जसा हिरे घासूनच चमकतो तसाच माणूस संघर्षातून घडतो..
फुलांचा सुगंध वाऱ्यावर पसरतो, पण आत्मविश्वासाचा सुगंध मात्र व्यक्तीच्या वर्तनातून, त्याच्या कर्तृत्वातून आणि त्याच्या तेजस्वी नजरेतून उमटतो.
आत्मविश्वासाशिवाय जीवन म्हणजे अंधारातल्या दिव्याची वात; कधीही विझणारी, मार्ग न दाखवणारी. पण आत्मविश्वासासह जीवन म्हणजे वादळातही पेटलेली ज्योत; जी स्वतः उजळतेच आणि इतरांनाही मार्ग दाखवते..
नदी जशी खडकांना भेदत पुढे जाते तशीच आत्मविश्वासाने सज्ज झालेली माणसाची वाटचाल कोणत्याही अडथळ्याला घाबरत नाही.
आजची तरुणाई अनेकदा तुलना, स्पर्धा आणि अपयशाच्या दडपणाखाली गळून पडते. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची वाट वेगळी आहे. कोणी पर्वत चढणार, कोणी समुद्र पार करणार, कोणी आकाशात झेपावणार. स्वतःला कमी समजणं म्हणजे निसर्गाच्या देणगीचा अपमान आहे..
"जगात कोणीही अपूर्ण नाही; प्रत्येकाच्या अंतरंगात एक विलक्षण देणगी दडलेली असते. फक्त त्या देणगीची ओळख कधी लवकर, कधी उशिरा पटते. पण एकदा ती ओळख पटली की आयुष्याचा प्रवास नवा अर्थ, नवा प्रकाश घेऊन पुढे सरकतो."
म्हणूनच मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाला कवटाळा. जीवनाच्या रणांगणात हा आत्मविश्वासच तुमची तलवार, तुमचं ढाल आणि तुमचा दीपस्तंभ ठरेल..
जग जिंकणं अवघड नाही; पण स्वतःवर विश्वास ठेवणं हेच सर्वांत मोठं जग जिंकणं आहे.
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#आत्मविश्वास #Motivation #Inspiration #LifeLessons #PositiveVibes #SelfBelief #MarathiQuotes #Thoughts #MindsetMatters #BelieveInYourself #SuccessMantra #StruggleToStrength #NeverGiveUp #BePositive #Zindagi #YouthMotivation #MarathiMotivation #LifeGoals #SpiritualGrowth #Wisdom #Confidence #InnerStrength #OvercomeFear #ThinkBig #MarathiInspiration #प्रेरणा #प्रबोधन #शिक्षण #विद्यार्थीप्रेरणा #स्वत:वरविश्वासठेवा #ManacheShakti #powerofmindset #kalpana #DreamBig #सकारात्मकता #leadershipskillsdevelopment #SelfGrowth #PhilosophyOfLife #MotivationalSpeaker #marathiliterature
Post a Comment