2019 मध्ये आलेला “जोकर” हा चित्रपट फक्त एक चित्रपट नाही, तर समाजातील असमानतेवर, उपेक्षेवर आणि भ्रष्ट व्यवस्थेवर आरसा धरतो. हा सिनेमा पाहून प्रेक्षकांना अस्वस्थता जाणवणं साहजिकच आहे. कारण जोकर आपल्याला दाखवतो की समाजातील दडपलेला, हिणवलेला, तुडवलेला वर्ग जेव्हा उसळतो, तेव्हा त्याचा रोष अनियंत्रित बनतो. इतका की अमेरिकेत काही शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल ह्या भीतीने चित्रपटगृहाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.
टॉड फिलिप्स दिग्दर्शित हा सिनेमा सुपरव्हिलन ची कथा नाही, तर सुपरभ्रष्ट व्यवस्थेवर एक थप्पड आहे. मानसिक आरोग्याची उपेक्षा, गरिबी, बेरोजगारी, धनिकांचा माज आणि शासनयंत्रणेची निष्काळजी वृत्ती यांचा स्फोट म्हणजे जोकर.
मुख्य पात्र आर्थर फ्लेक हा फक्त व्यक्ती नाही; तो उपेक्षित समाजाचं प्रतिक आहे. सतत हिणवला जाणं, अपमान सहन करणं, व्यवस्थेकडून दुर्लक्षित होणं, आणि मग या घुसमटीचा उद्रेक हा प्रवास त्याचा आहेच, पण खरं तर हा प्रवास प्रत्येक उपेक्षित समाजाचा आणि व्यक्तीचा आहे, आणि हाच भाव नेपाळातील Gen Z क्रांतीत दिसतो.
आज नेपाळमधील तरुणाई भ्रष्टाचार, बेरोजगारी, जुन्या पिढीच्या ढोंगी राजकारणाविरुद्ध संतापली आहे. त्यांना जाणवतं की व्यवस्था ही त्यांच्या विरोधात उभी आहे, ह्या जाणिवेतून उठलेला आवाज ही क्रांती आहे.
जोकर हास्यविनोद आणि विद्रूप चेहऱ्याच्या रंगातून बंड व्यक्त करतो; नेपाळातील तरुणाई मीम्स, व्यंगचित्रं, गाणी आणि रस्त्यावरच्या आंदोलनातून विद्रोह करते..
दोन्हीकडे कला, प्रतीकं आणि संस्कृती हे शस्त्र बनलेले आहेत.
जोकरमध्ये हिंसक दंगल उसळते; नेपाळात अजून तरी ही लाट अहिंसक आहे. पण उपेक्षेची साखळी तोडली नाही, तर कधी ना कधी त्या लाटेला हिंसक वळण मिळेल,इतिहासाने वारंवार हे दाखवून दिलं आहे. फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती, भारतातील स्वातंत्र्यलढा, सर्वांची मुळे ह्याच उपेक्षेत, ह्याच दडपशाहीत आहेत.
आर्थर फ्लेक म्हणतो: “माझा आवाज कोणी ऐकत नाही.”
नेपाळातील तरुणही आज हाच सवाल करतात: “आमचं ऐकणार कोण?”
ही दोन्ही उदाहरणं दाखवतात की तरुणाईला जेव्हा दुर्लक्षित केलं जातं, तेव्हा तिचा आवाज सोशल मीडियातून, कलामधून आणि रस्त्यांवरून फुटतो. जोकरचा चेहरा जगभरातील अन्यायाविरुद्धच्या विद्रोहाचं प्रतीक बनला, आणि आज नेपाळातील तरुणाई नव्या पिढीचं प्रतिक बनते आहे.
ह्याचं तत्त्व एकच आहे...
👉 सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि दडपशाही कितीही प्रबळ असो, उपेक्षितांचा संताप जेव्हा उसळतो, तेव्हा तो पर्वत हलवतो.
👉 हा संताप जेव्हा भडकतो, तेव्हा सिंहासनं डळमळतात, साम्राज्यं कोसळतात, आणि इतिहास नवा अध्याय लिहितो.
👉 संतापाची ठिणगी जेव्हा जनतेच्या श्वासात मिसळते, तेव्हा ती ज्वाला बनते; आणि त्या ज्वालेपुढे साम्राज्यांचा लोखंडी किल्लाही वितळतो.
👉 अन्यायाची प्रत्येक चापट ही क्रांतीच्या पावलांचा आवाज ठरते. जितकी दडपशाही वाढते, तितकी क्रांतीची पाऊलं जोरात उमटतात.
👉 सत्ता जनतेवर राज्य करू शकते, पण तिच्या अंतरंगातील संतापावर कधीच नाही. तो संताप एकदा उफाळला, की पर्वतापेक्षा भयंकर आणि समुद्रापेक्षा अजेय ठरतो.
👉 इतिहासाने दाखवून दिलंय,जेव्हा जनतेची सहनशक्ती संपते, तेव्हा राजा असो वा हुकूमशहा, त्याचा शेवट रस्त्याच्या धुळीतच होतो.
👉 उपेक्षितांचा राग हा केवळ विध्वंसासाठी नसतो; तो नवा समाज, नवा न्याय, आणि नव्या युगाची बीजे घेऊन येतो.
👉 क्रांती हा गुन्हा नसतो, ती अन्यायाला मिळालेली उशिराची पण न्याय्य शिक्षा असते.
म्हणूनच सत्ताधाऱ्यांनी ऐकणं शिकायला हवं, कारण न ऐकलेल्या आवाजाची किंमत नेहमीच रक्ताने भरावी लागते.
आणि म्हणूनच, “जोकर” असो वा नेपाळातील तरुणाईची क्रांतीदोन्ही आपल्याला एक कठोर धडा देतात..
समाजात उपेक्षा, असमानता आणि भ्रष्टाचार जर सतत फोफावला, तर तो एका दिवशी फक्त कथा किंवा चित्रपटापुरता राहत नाही, तर रस्त्यावर उतरून वास्तव बदलून टाकतो.
शक्तीशाली सिंहासनं, साम्राज्यं आणि व्यवस्था कितीही अमर्याद वाटली तरी, ती जनतेच्या आवाजासमोर क्षणभंगुर ठरतात.
कारण जनतेचा रोष हा कुणाच्याही कल्पनेपेक्षा मोठा, आणि कुणाच्याही सत्ता-सिंहासनापेक्षा अधिक अजेय असतो.
👉 जोकरने पडद्यावर दाखवलं तेच वास्तव, नेपाळातील तरुणाई आज रस्त्यावर सिद्ध करत आहे..
अन्यायावरचं मौन ही सगळ्यात मोठी हिंसा आहे, आणि उपेक्षितांचा संतापच ही जग बदलणारी खरी क्रांती आहे.
Post a Comment