गेल्या 26 वर्षांचा हा शिक्षक म्हणूनचा प्रवास केवळ अध्यापनाचा नाही; तो असंख्य स्वप्नांना आकार देण्याचा, हजारो आयुष्यांना दिशा देण्याचा आणि शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविण्याचा संघर्षमय, समाधानकारक आणि अविस्मरणीय प्रवास आहे.
या काळात लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आलं, हजारो लेकरांना शिकवता आलं आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या यशाचा साक्षीदार होता आलं, यापेक्षा एका शिक्षकासाठी मोठं भाग्य ते कोणतं?
आजही हा प्रवास त्याच प्रामाणिकपणाने, निष्ठेने, समर्पणाने आणि सेवाभावनेने सुरू आहे. कारण शिक्षक होणं हा केवळ व्यवसाय नाही; तो समाजाच्या भविष्याची पायाभरणी करण्याचा ध्यास आहे.
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध माध्यमांतून मिळणाऱ्या शुभेच्छा, सदिच्छा आणि कृतज्ञतेचा अक्षरशः वर्षाव होत आहे. प्रत्येक शुभेच्छेमागची भावना मनाला स्पर्शून जाते. विशेषतः सामान्य, वंचित, उपेक्षित, गोरगरीब आणि कष्टकरी कुटुंबातील लेकरांसाठी काही करता आलं, त्यांच्या स्वप्नांना बळ देता आलं, त्यांच्या डोळ्यांतील आशेला दिशा देता आली, याचं समाधान आज शब्दांच्या पलीकडे आहे.
एका प्रामाणिक आणि समर्पित शिक्षकाला यापेक्षा अधिक काय हवं असतं?
अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनाच्या चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये, विवेक, आत्मविश्वास, कौशल्य, संवेदनशीलता आणि संघर्ष करण्याची जिद्द देता आली, याचा मनस्वी आनंद आहे.
कारण माझ्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत गुण मिळविण्याची प्रक्रिया नाही, तर शिक्षण म्हणजे माणूस घडविण्याची किमया आहे.
दरवर्षी विविध प्रवृत्तीच्या, विविध परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत काम करताना त्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक प्रश्नांना समजून घेता आलं. त्यांच्या अडचणी सोडवताना त्यांना काही शिकवता आलं; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडूनही जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी शिकता आली.
विद्यार्थी हा केवळ शिकणारा नसतो; तो शिक्षकाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारा सहप्रवासीही असतो, मित्रांनो..
म्हणूनच आज मागे वळून पाहताना जाणवतं, पद, पैसा, प्रसिद्धी आणि पुरस्कार यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास आणि “सर, तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो.” हा एक वाक्याचा अभिमान अधिक मौल्यवान आहे.
शिक्षकाची खरी कमाई बँकेच्या खात्यात नसते,तर ती त्याने घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वात असते.
माझ्या आयुष्याचा हा प्रवास अजून संपलेला नाही...जोपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात स्वप्न आहे,जोपर्यंत त्याच्या हाताला योग्य दिशेची गरज आहे,आणि जोपर्यंत समाजाला विवेकी, संवेदनशील आणि सक्षम पिढीची आवश्यकता आहे,तोपर्यंत ‘विद्यार्थी मित्र’ म्हणून हा प्रवास असाच सुरू राहील.
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्व विद्यार्थी, पालक, मित्र आणि हितचिंतकांकडून मिळालेल्या प्रेमाचा, स्नेहाचा आणि कृतज्ञतेचा अगदी मनापासून स्वीकार! ❤️
तुमचं प्रेम, विश्वास, स्नेहपूर्ण सहकार्य आणि साथ अशीच आयुष्यभर लाभो, हीच अपेक्षा.
शिक्षक म्हणून मिळालेलं हे आयुष्य...विद्यार्थ्यांसाठी जगता आलं,त्यांच्या स्वप्नांना दिशा देता आली,आणि त्यांच्या यशात स्वतःचं सार्थक शोधता आलं..
यापेक्षा मोठा पुरस्कार माझ्यासाठी दुसरा कोणताही नाही!
🌹 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
धन्यवाद मित्रांनो...!
— आपलाच स्नेहांकित,
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. कलाम फाउंडेशन, परभणी.
Post a Comment