🎓 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌹
शिक्षक म्हणजे केवळ फळ्यावर धडे लिहिणारी व्यक्ती नव्हे; शिक्षक म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ, स्वप्नांना दिशा देणारा मार्गदर्शक आणि भविष्याला आकार देणारा शिल्पकार असतो.
विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक देणे सोपे आहे; पण त्या पुस्तकातून विचार करण्याची दृष्टी, प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि सत्य शोधण्याची विवेकबुद्धी निर्माण करणे, हे खऱ्या शिक्षकाचे कार्य आहे.
शिक्षण म्हणजे केवळ गुण, परीक्षा आणि पदवी मिळविण्याचे साधन नाही. शिक्षण म्हणजे माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे. ज्ञानाला संस्कारांची जोड, बुद्धीला विवेकाची साथ आणि यशाला माणुसकीची किनार मिळाली, तरच शिक्षणाचे खरे सार्थक होते.
शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ “काय शिकायचे?” हे सांगत नाही, तर “का शिकायचे, कसे विचार करायचे आणि आयुष्याला अर्थपूर्ण कसे घडवायचे?” याची जाणीव करून देतो.
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञान प्रधान युगात माहिती सहज उपलब्ध आहे; पण माहितीचे ज्ञानात, ज्ञानाचे विवेकात आणि विवेकाचे जीवन मूल्यांत रूपांतर करण्याची ताकद शिक्षकचं देऊ शकतो.
एका शिक्षकाचा प्रभाव एका वर्गापुरता मर्यादित राहत नाही. त्याच्या विचारांची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात रुजतात आणि काळाच्या ओघात तीच बीजे समाजाच्या परिवर्तनाची वटवृक्षे बनतात.
म्हणूनच शिक्षक हा राष्ट्रनिर्मितीचा केवळ घटक नसून राष्ट्राच्या वैचारिक भवितव्याचा शिल्पकार आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक, संशोधक, अधिकारी, उद्योजक, विचारवंत आणि समाजघटक होणार आहे; त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या पायाभरणीत शिक्षकाचा वाटा अमूल्य आहे.
ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या, त्यांच्या अपयशात आधार देणाऱ्या आणि यशात समाधान मानणाऱ्या माझ्या सर्व प्रिय शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐📚
आपल्या ज्ञानाला सलाम…आपल्या समर्पणाला सलाम…🌹
आपल्या संस्कारांना सलाम…आणि पिढ्यान्पिढ्या उजळणाऱ्या आपल्या ज्ञानदीपाला मनःपूर्वक नमन! 🙏🌸
“एक चांगला शिक्षक हजारो विद्यार्थ्यांना शिकवतो; पण एक प्रेरणादायी शिक्षक हजारो भविष्यांना घडवतो.”
🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸
- आपलाच एक विनम्र स्नेहीं.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment