🎓 सुसंवाद : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांशी…
विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा पाया शालेय शिक्षणातच घातला जातो. याच टप्प्यावर त्यांच्या विचारांची दिशा, स्वप्नांची उंची आणि करिअरची वाट निश्चित होत असते. योग्य मार्गदर्शन, प्रेरणादायी संवाद आणि सकारात्मक वातावरण लाभले, तर विद्यार्थ्यांतील सुप्त क्षमता तेजाने फुलू लागते.
आज सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व अभ्यास मार्गदर्शन संवाद कार्यक्रमाचे प्रेरणादायी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणीचे विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख यांनी “आजचं शिक्षण – उद्याचं भविष्य” या विषयावर विचारप्रवर्तक संवाद साधला.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सामाजिक जडण-घडण, अभ्यासातील उत्साह व रंजकता, पालक–शिक्षक यांच्यातील स्नेहपूर्ण सहकार्य, योग्य विषयांची निवड, परीक्षेच्या ताणातून मुक्त राहून भयमुक्त वातावरणात मन एकाग्र करून अभ्यास कसा करावा, मोबाईलचा पूरक व विवेकपूर्ण वापर, आत्मविश्वास वृद्धिंगत करत स्वतःच्या क्षमता व कलानुसार करिअर कसे ठरवावे..या सर्व बाबींवर त्यांनी अत्यंत सहज, सोप्या व हसत-खेळत शैलीत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. यु. भागवत सर होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. आबासाहेब सावंत सर,प्रा. एस. डी. कुलकर्णी सर, वरिष्ठ लिपिक नखाते सर, आसाराम पवार सर, प्रा. पी. बी. निकम सर, नागरे सर,रामेश्वर कदम सर, तोंदूलावर सर, रोन्टेवाड सर, गिरी सर, आव्हाड सर, गिरी सर,अभिजित कदम, ओंकार देशपांडे, अजिंक्य बोराडे, शिंदे सी. यु. शरद मगर, डी. सी. सोळंके सर व तेलगोटे मॅडम गजमल बापू, नारायण काष्टे यांची मान्यवर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन धनंजय मोरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गाडेकर सर यांनी केले.
या संवाद सत्राला उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास, प्रश्नांमधील जिज्ञासा आणि चेहऱ्यावरील समाधान हीच या कार्यक्रमाच्या यशाची खरी साक्ष ठरली.
अशा संवादातूनच घडतो विचारशील, सक्षम आणि समाजाभिमुख विद्यार्थी आणि हाच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षणविचारांचा खरा वारसा आहे.
Post a Comment