🎓 आज 28 नोव्हेंबर : फ्रेडरिक एंगेल्स यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने.. ✍️
🌹 फ्रेडरिक एंगेल्स : शब्दांचा योद्धा, विचारांचा वास्तुविशारद आणि समाजपरिवर्तनाचा शिल्पकार...
“ माणूस स्वतःचं अस्तित्व निर्माण करत नाही, तर समाजाची उत्पादनपद्धती त्याचे अस्तित्व घडवते.”
ही वाक्यं फक्त विचार नाहीत तर ती क्रांतीचा ठिणगीदार मंत्र आहेत. आजचा दिवस स्मरणाचा नाही, तर पुनर्विचाराचा आहे. कारण फ्रेडरिक एंगेल्स जन्मला नसता, तर जगाच्या बुद्धिमत्तेच्या इतिहासात एक क्रांतिकारी पानच राहिलं नसतं.
फ्रेडरिक एंगेल्स कोण होता..?
फ्रेडरिक एंगेल्स हे जर्मन तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखक होते. ते कार्ल मार्क्सचे विचार सहकारी आणि मार्क्सवादाचे सहसंस्थापक म्हणून ओळखले जातात.
त्यांनी औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या सामाजिक विषमता, भांडवलशाही व्यवस्था आणि कामगार वर्गाच्या शोषणाचा सखोल अभ्यास करून त्यावर वैज्ञानिक आणि भौतिकवादी दृष्टिकोन मांडला.
कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, दास कॅपिटलसाठी त्यांचे बौद्धिक आणि आर्थिक योगदान महत्त्वपूर्ण होते. कामगारांच्या हक्कांसाठी, समतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारे एंगेल्स आजही जगभरातील समाजवादी, संशोधक आणि सामाजिक चळवळींसाठी मार्गदर्शक ठरतात.
🔥 फ्रेडरिक एंगेल्स — एक मनुष्य नव्हे, एक भूचाल..✍️
28 नोव्हेंबर 1820. जर्मनीतील वुपर्टाल नावाचं शांत गाव. पण नशिबाच्या पृष्टभागावर आज परिवर्तनाचं बीज पेरलं जातंय.. एक बालक म्हणून जन्म घेतंय, पण भविष्यात जगाला प्रश्न विचारणारा, सामर्थ्यावर, व्यवस्थेवर, शोषणावर, सत्ता संरचनांवर लाल दिवा दाखवणारा विचारवंत आकार घेतोय.
एंगेल्सने जीवन जगलं नाही, त्याने युगांशी संघर्ष केला.
त्याने लिहिलं, पण त्याच्या शब्दांनी भेदलं. त्याने पाहिलं, पण त्याच्या नजरेने समाजाचा खरा नकाशा उलगडला.
आणि जेव्हा त्याने विचार मांडले, ते विचार फक्त कागदांवर राहिले नाहीत.. ते संघर्षात, क्रांतीत आणि मानवाच्या इतिहासात रक्त बनून वाहू लागले.
🔰 वर्गसंघर्ष — भांडवलशाहीच्या सिंहासनावरचा प्रश्न..
एंगेल्ससाठी इतिहास कथा नव्हती तर तो संघर्ष होता..
तो सांगतो:
“ इतिहास म्हणजे राजा-महाराजांची गाथा नव्हे, तर श्रम, संघर्ष, शोषण आणि प्रतिकाराची परंपरा आहे. ”
कामगार त्याचं केंद्रबिंदू, आणि अन्याय त्याची व्याख्या.
ज्यांच्याकडे उत्पादनाच्या साधनांवर सत्ता, त्यांच्याकडे समाज...ज्यांच्याकडे श्रम, त्यांच्याकडे उपहास, उपेक्षा आणि अवहेलना.
हे नातं बदलण्यासाठी एंगेल्सने फक्त बोट दाखवलं नाही तर त्याने मार्ग दाखवला.
🔥 भौतिकवादी इतिहास दृष्टिकोन — विचारांची लोहभिंत..
जगाला सांगण्यात आलं की इतिहास देवाने लिहिला..
एंगेल्सने सांगितलं "नाही. इतिहास मनुष्याने लिहिला. आणि ज्याने काम केलं त्याने नव्हे, तर ज्याने सत्ता आणि उत्पादनं हाताळली त्याने."
विचार, धर्म, संस्कृती, राजकारण हे काही वेगळे घटक नसतात. ते आर्थिक संरचनेचे प्रतिबिंब असतात..आणि जोपर्यंत आर्थिक विषमता आहे, तोपर्यंत समाजात समता येऊ शकत नाही.
🧭 बदल — सौम्यतेने नाही, संघर्षाने..
बदल हवा असेल तर केवळ विचारांची देवाणघेवाण पुरेशी नसते तर क्रांती हवी. समाजशास्त्राच्या ग्रंथातल्या सिद्धांतांमध्ये नव्हे, तर रस्त्यावरच्या आंदोलनात, प्रश्न विचारणाऱ्या आवाजात आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या सामूहिक शक्तीत परिवर्तन घडतं.
धारणा नव्हे — धैर्य. शब्द नव्हे — कृती. लेखन नव्हे — प्रतिबद्धता. आणि स्वप्न नव्हे — संघर्ष...
कारण इतिहास शांत लोकांनी लिहिला नाही; इतिहास लिहिला त्याने जो अन्यायाला स्वीकारण्याऐवजी त्याला आव्हान देऊन उभा राहिला.
समाज बदलतो तेव्हा नाही जेव्हा लोक हळूहळू जागे होतात, तर तेव्हा जेव्हा विचार कृतीमध्ये उतरतात, जेव्हा अन्यायाला प्रतिसाद केवळ दु:खाच्या स्वरूपात नसतो, तर प्रतिकाराच्या स्वरूपात असतो. आणि म्हणूनच समाजात बदल घडवायचा असेल, तर निश्चयाची मशाल पेटवावी लागते, आणि त्या मशालीला कृतीचे इंधन द्यावे लागते.
कार्ल मार्क्ससोबत लिहिलेलं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो फक्त पुस्तक नव्हतं तर ते एक आवाहन होतं...
ते म्हणतं..
“जगातील सर्व श्रमिकांनो — एक व्हा.”
हा संदेश आजही धडधडतो, कारण अन्याय अजून जिवंत आहे.
📚 एंगेल्सचं कार्य — विचारांचं शस्त्रागार..
समाजवादाच्या क्षेत्रात त्यांनी सिद्धांत आणि व्यवहार यांचा सेतू बांधला. अर्थशास्त्रात त्यांनी भांडवलशाही व्यवस्थेची खरी रचना आणि तिच्यामागील शोषण स्पष्ट केलं. इतिहासाच्या अभ्यासात त्यांनी वर्गसंघर्षाला इतिहासाची मध्यवर्ती शक्ती मानलं, तर समाजशास्त्रात उत्पादनपद्धती आणि समाजरचना यांच्यातील संबंध उलगडून दाखवला.
त्यांचे विचार कठीण नव्हते, ते वास्तवातून जन्मलेले होते तर फॅक्टरीतील कामगार, त्यांच्या यातना, असमानता आणि अन्याय या गोष्टींनी त्यांच्या लेखनाला दिशा दिली. एंगेल्सने दाखवलेली ही विचारधारा आजही सांगते की समाज बदलायचा असेल तर असमानतेची कारणं समजून घेत, न्याय्य आर्थिक व्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
The Condition of the Working Class in England हे पुस्तक जणू औद्योगिक क्रांतीच्या काळातील दु:खाचं सनदपत्र आहे.अंधारकांड आणि अन्यायाची साक्ष..
🌍 आजचा काळ, आणि फ्रेडरिक एंगेल्सची गरज..
आजही जग भांडवलशाहीच्या मोहजालात अडकलेलं आहे.
पैसा देव, माणूस उत्पादन, आणि जग बाजार...
शिक्षण विकलं जातं,आरोग्य विकलं जातं, विज्ञान, संस्कृती, भावनाही विकल्या जातात.अश्यावेळी एंगेल्सचा आवाज पुन्हा विचारायला लावतो..
“मानवाचा विकास नफा-तोट्याच्या समीकरणावर मोजला जाऊ शकत नाही.”
आज त्यांच्या जन्मदिनी, फक्त औपचारिक स्मरण करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या विचारांची जाणीव आपल्या कृतीत उतरवण्यासाठी आपण नव्याने प्रतिज्ञा करूया.
कारण एंगेल्सचे विचार हे भूतकाळापुरते सीमित नाहीत; ते आजही समाजातील असमानता, अन्याय आणि भांडवलशाहीच्या विषम रचनेवर प्रश्न उपस्थित करतात.
🔥 अज्ञानाविरुद्ध विचार,
🔥 शोषणाविरुद्ध स्वातंत्र्य,
🔥 अन्यायाविरुद्ध क्रांती.
कारण विचार हा संघर्षाचा जन्मबिंदू आहे आणि कृती हा त्याचा परिणाम. मानवी समाजाची खरी प्रगती तंत्रज्ञान, संपत्ती किंवा सत्तेच्या विस्तारात नसते तर ती माणसाच्या प्रतिष्ठेत, समान संधींमध्ये आणि शोषणमुक्त जीवनात असते.
म्हणूनच एंगेल्सचा संदेश आजही आपल्याला सांगतो की समाज बदलला पाहिजे तर विचारांना आवाज द्यावा लागतो, आवाजाला दिशा आणि दिशेला सामूहिक कृती.
“कामगार वर्गाच्या मुक्तीशिवाय मानवी समाज खऱ्या प्रगतीकडे जाऊ शकत नाही.”
ही वाक्यं म्हणजे इशारा नाही तर ती संकेत आहे की समाजातली खरी प्रगती तेव्हाच घडते, जेव्हा दुर्बलाचा आवाज शक्तीमानाच्या सिंहासनाला हादरवतो, आणि जेव्हा न्याय हा हक्क बनतो.. दया नव्हे. ✊
क्रांतिकारी सलाम, फ्रेडरिक एंगेल्स...
तुमचे विचार फक्त इतिहास नाहीत — ते भविष्याचा नकाशा आहेत. 🌹🕯️
-एक वैचारिक चाहता आणि अभ्यासक.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#FrederickEngels #FrederickEngelsJayanti #Engels #KarlMarx #Marxism #Communism #Socialism #DialecticalMaterialism #HistoricalMaterialism #ClassStruggle #WorkersRights #Revolution #WorkinClass #Equality #Justice #AntiCapitalism #CommunistManifesto #DasKapital #Proletariat #WorkersUnite #Ideology #HumanRights #KnowledgeRevolution #SocialJustice #Society #History #Philosophy #PoliticalScience #Economics #SocialChange #Awareness #Education #Inspiration #Thinkers #RevolutionaryThoughts #Motivation #PowerOfWords #Truth #VoiceOfPeople #WakeUp #YouthPower #ChangeMakers #ReadMore #BooksAndRevolution #StudyMarxism #EngelsLivesOn #RevolutionContinues
Post a Comment