युद्ध, तंत्रज्ञान आणि माणुसकीच्या विवेकाला अस्वस्थ करणारा माहितीपट ( Documentary Film)
कधी कधी एखादा चित्रपट केवळ पडद्यावरच्या प्रतिमा दाखवत नाही, तर तो सत्तेच्या भिंतींवर आरसा धरतो. काही चित्रपट मनोरंजन करतात, काही इतिहास सांगतात..पण काही चित्रपट समाजाच्या अंतरात्म्याला प्रश्न विचारतात. ‘NAZA’ हा त्यापैकीच एक माहितीपट ठरला आहे.
इस्रायली दिग्दर्शक युवाल अब्राहम आणि रेचल सोर यांनी तयार केलेल्या या माहितीपटाला 2026 च्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात Special Jury Prize मिळाले. त्याच्या प्रदर्शनानंतर तब्बल 25 मिनिटांची उभे राहून दाद मिळाली..व्हेनिसमधील विक्रमी प्रतिसाद म्हणून त्याची नोंद झाली..पण या टाळ्यांइतकीच या चित्रपटाभोवती निर्माण झालेली राजकीय आणि सामाजिक खळबळही महत्त्वाची आहे.
इस्रायलमध्ये या चित्रपटावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दिग्दर्शकांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करण्यापासून ते त्यांच्यावर “देशद्रोहाचे” आरोप करण्यापर्यंतची भाषा वापरली गेली. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायली सैनिकांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंबंधी कायदे आणण्याची भूमिका जाहीर केली.
इथेच एक मूलभूत प्रश्न उभा राहतो..सत्तेला प्रश्न विचारणे हा गुन्हा असू शकतो का?
नेमकं ‘NAZA’मध्ये आहे तरी काय?
‘NAZA’ हा इस्रायली लष्करी/गुप्तचर वापरातील असा संक्षिप्त शब्द असल्याचे चित्रपटाच्या अधिकृत माहितीत सांगितले जाते, ज्याचा संबंध एखाद्या हवाई हल्ल्यात अपेक्षित असलेल्या नागरी मृत्यूंच्या संख्येशी जोडला जातो.
माहितीपटात 24 इस्रायली लष्करी किंवा गुप्तचर यंत्रणेशी संबंधित व्यक्तींच्या अनामिक मुलाखती आहेत. त्यांचे चेहरे आणि आवाज लपवण्यात आले आहेत. या मुलाखती तेल अवीवच्या गच्च्यांवर रात्रीच्या वेळी चित्रित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा केवळ स्टुडिओतील चर्चेचा कार्यक्रम न राहता, अंधारलेल्या शहराच्या पार्श्वभूमीवर उलगडणारा एक अस्वस्थ करणारा साक्षीपट बनतो.
दिग्दर्शकांनी नंतर सांगितले की त्यांनी 100 हून अधिक जाणकार स्रोतांशी संवाद साधला आणि माहितीपटातील दावे वर्गीकृत कागदपत्रे व पत्रकारितेतील इतर स्रोतांद्वारे तपासले. मात्र इस्रायली संरक्षण दलाने चित्रपटातील काही दावे आणि अनामिक साक्षीदारांच्या विश्वसनीयतेवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे माहितीपटातील प्रत्येक दावा स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.
आणि हाच तर प्रबोधनाचा खरा मार्ग आहे, " ना आंधळा विश्वास, ना आंधळा विरोध, तर प्रश्न, पुरावे आणि विवेक!"
#युद्धातील सर्वांत भयानक शब्द—‘Collateral Damage’
युद्धाच्या भाषेत ‘Collateral Damage’ हा शब्द अनेकदा वापरला जातो.पण एका आईसाठी तो ‘Collateral Damage’ नसतो..तो तिचा मुलगा असतो..एका वडिलांसाठी तो ‘Collateral Damage’ नसतो..तो त्यांचा संसार असतो..एका मुलासाठी तो ‘Collateral Damage’ नसतो..तो त्याचा बाबा, आई, भाऊ किंवा बहीण असतो.
सत्तेच्या कागदावर एक आकडा असलेला मृत्यू, एखाद्या कुटुंबासाठी संपूर्ण विश्वाचा अंत असतो..युद्धाची भाषा जितकी तांत्रिक होत जाते, तितका माणूस त्यातील मानवी चेहरा विसरण्याचा धोका वाढतो.
#AI जेव्हा लक्ष्य ठरवते…
आजच्या युद्धाचे सर्वांत भयावह रूप केवळ बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रात नाही..ते डेटा, अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातही आहे.
Washington Post ने केलेल्या तपासणीनुसार, गाझामधील लक्ष्यनिर्धारण प्रक्रियेत ‘Gospel’ आणि ‘Lavender’ यांसारख्या AI-संबंधित प्रणालींच्या वापराबाबत माहिती समोर आली आहे. अहवालानुसार ‘Gospel’ ने मोठ्या प्रमाणावर संभाव्य लक्ष्ये ओळखण्यास मदत केली; ‘Lavender’ संदर्भातही लक्ष्यनिर्धारण प्रक्रियेतील त्याच्या वापराबाबत माजी/सध्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
इथे प्रश्न फक्त इस्रायलचा नाही..हा प्रश्न संपूर्ण मानवजातीचा आहे.उद्या एखाद्या संगणकाने ठरवले— “हा लक्ष्य आहे.”आणि माणसाने फक्त बटन दाबले तर? त्या बटणामागे निर्णय कोणाचा? अल्गोरिदमचा?अधिकाऱ्याचा? राज्याचा? की संपूर्ण मानवतेच्या विवेकाचा?
कारण तंत्रज्ञानाला भावना नसतात..पण निर्णय घेणाऱ्या माणसाला असायलाच हव्यात..AI वेग वाढवू शकते;AI माहितीचे विश्लेषण करू शकते; AI लक्ष्य ओळखू शकते
पण— “गोळी झाडावी की नाही?”
“बॉम्ब टाकावा की नाही?”
“समोरचा माणूस आहे की केवळ डेटा-पॉइंट?”
हा अंतिम प्रश्न माणसाच्या नैतिक विवेकानेच विचारला पाहिजे.
#आधुनिक युद्धाची सर्वांत मोठी शोकांतिका..
एकेकाळी युद्धभूमीवर सैनिकाला समोरचा सैनिक दिसत होता..आज हजारो किलोमीटर दूर बसून स्क्रीनवर एक ठिपका दिसतो..तो ठिपका एखादा संशयित दहशतवादी असू शकतो..पण त्या ठिपक्याच्या शेजारी त्याची मुलं असू शकतात..त्याची आई असू शकते..एखादा डॉक्टर असू शकतो..एखादे रुग्णालय असू शकते..एखादा विद्यार्थी असू शकतो.आणि म्हणूनच आधुनिक युद्धातील सर्वांत मोठा धोका म्हणजे, माणसाला ‘मानवी अस्तित्व’ म्हणून न पाहता ‘डेटा’ म्हणून पाहण्याची सुरुवात.
" जेव्हा माणूस आकडा बनतो, तेव्हा मृत्यूही आकडा बनतो.आणि जेव्हा मृत्यू आकडा बनतो, तेव्हा विवेकाची हत्या सुरू होते."
मात्र एक गोष्ट विसरता कामा नये…
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर केलेला हल्ला आणि त्यात झालेली नागरिकांची हत्या व ओलीस घेण्याची घटना देखील अमानुष आणि गंभीर आहे..एका गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी दुसऱ्या गुन्ह्याकडे डोळेझाक करता येत नाही.
हमासचा दहशतवाद चुकीचा आहे म्हणून गाझातील प्रत्येक नागरिक दोषी ठरत नाही..त्याचप्रमाणे गाझातील नागरिकांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केला म्हणून हमासच्या अत्याचारांचे समर्थन केले असेही होत नाही..हीच नैतिक स्पष्टता आज जगाला सर्वाधिक आवश्यक आहे.
दहशतवादाचा निषेध करा..नागरिकांच्या हत्येचाही निषेध करा.
बंधकांची सुटका मागा..युद्धगुन्ह्यांची चौकशी मागा..आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर मागा..कारण माणुसकीला धर्म, राष्ट्र, वंश किंवा सीमा नसतात.
#आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेचे प्रश्न..
गाझा युद्धाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) इस्रायलविरुद्धच्या दक्षिण आफ्रिकेच्या प्रकरणात अनेक अंतरिम आदेश दिले आहेत आणि Genocide Convention अंतर्गत नागरिकांचे संरक्षण करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. मात्र ICJ ने नेतान्याहूंना वैयक्तिकरित्या “युद्धगुन्हेगार” ठरवलेले नाही.
दुसरीकडे International Criminal Court (ICC) ने 21 नोव्हेंबर 2024 रोजी बेंजामिन नेतान्याहू आणि योआव गॅलंट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. ICC च्या माहितीनुसार त्यांच्यावर कथित युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित आरोप आहेत. अटक वॉरंट म्हणजे दोषसिद्धी नव्हे..तो न्यायालयीन प्रक्रियेतील गंभीर कायदेशीर टप्पा आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2025 मध्ये ICC विरुद्ध निर्बंध लावण्याचा आदेशही जारी केला; त्यात काही ICC अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर निर्बंध आणि प्रवेशबंदीची तरतूद करण्यात आली.
या सगळ्या घटनांमधून एक मोठा प्रश्न समोर येतो.." आंतरराष्ट्रीय कायदा सर्वांसाठी समान आहे का, की तो शक्तिशाली राष्ट्रांच्या राजकारणापुढेही अनेकदा असहाय होतो?"
हा प्रश्न फक्त इस्रायल किंवा पॅलेस्टाईनचा नाही..तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या नैतिक विश्वासार्हतेचा प्रश्न आहे..आणि म्हणूनच ‘NAZA’ महत्त्वाचा ठरतो…
कारण हा माहितीपट फक्त गाझाबद्दल बोलत नाही..तो सत्तेबद्दल बोलतो..तो युद्धाच्या यांत्रिकीकरणाबद्दल बोलतो..तो AI आणि मानवी विवेकाच्या संघर्षाबद्दल बोलतो..तो पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतो.
तो सरकारला प्रश्न विचारण्याच्या नागरिकांच्या अधिकाराबद्दल बोलतो.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो विचारतो, “माणसाला मारण्याची क्षमता वाढली, पण माणुसकी वाढली का?” हा प्रश्न आज प्रत्येक देशाने स्वतःला विचारायला हवा.
‘No Other Land’ पासून ‘NAZA’पर्यंत…
युवाल अब्राहम आणि रेचल सोर हे ‘No Other Land’ या माहितीपटाशीही संबंधित आहेत. त्या चित्रपटाला 2025 मध्ये Best Documentary Feature साठी ऑस्कर मिळाले. ‘No Other Land’ ने वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी समुदायाच्या विस्थापनाचा आणि संघर्षाचा प्रश्न मांडला..‘NAZA’ने गाझातील युद्धयंत्रणेच्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही चित्रपटांचा केंद्रबिंदू एकच दिसतो," सत्तेच्या अधिकृत कथनापलीकडे जाऊन प्रत्यक्ष वास्तव पाहण्याचा प्रयत्न,आणि म्हणूनच कदाचित या दिग्दर्शकांना विरोधही होतो आणि जगभरातून पाठिंबाही मिळतो."
सरकारवर प्रश्न विचारणे म्हणजे देशद्रोह नाही!
लोकशाहीची खरी ताकद सरकारच्या स्तुतीत नसते.
ती सरकारला प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्यात असते.
देश म्हणजे सरकार नव्हे.
राष्ट्र म्हणजे सत्ताधारी पक्ष नव्हे.
सैनिक म्हणजे सरकारची टीका न करण्याचा परवाना नव्हे.
आणि देशप्रेम म्हणजे प्रश्न विचारण्याची जीभ बंद करणे नव्हे.
खरे देशप्रेम कधी कधी सत्तेला आरसा दाखवते.
खरे पत्रकारितेचे काम कधी कधी लोकप्रिय कथनाला आव्हान देते.
खरा नागरिक कधी कधी बहुसंख्यांच्या विरुद्ध उभा राहूनही विचारतो,
“हे योग्य आहे का?” आणि लोकशाही जिवंत राहते ती अशाच प्रश्नांमुळे.
शेवटी प्रश्न इस्रायलचा किंवा पॅलेस्टाईनचा नाही…
आज गाझामध्ये जे घडत आहे त्यावर जगाचे मत वेगवेगळे असू शकते.
इस्रायलच्या सुरक्षेचे प्रश्न खरे आहेत..पॅलेस्टिनी नागरिकांच्या जीविताचे प्रश्नही खरे आहेत..हमासच्या दहशतवादाचा निषेध आवश्यक आहे.
नागरिकांच्या संरक्षणाची मागणीही आवश्यक आहे..पण या सगळ्यांच्या पलीकडे एक प्रश्न उभा राहतो—" युद्ध जिंकण्यासाठी आपण माणुसकी हरवणार तर नाही ना?"
कारण इतिहास सांगतो, साम्राज्ये कोसळतात, सरकारे बदलतात, सीमा बदलतात, सत्ताधारी बदलतात…पण माणुसकीवर झालेल्या जखमा इतिहासाच्या स्मरणातून सहज पुसल्या जात नाहीत.आजची तंत्रज्ञानसंपन्न युद्धयंत्रणा जर माणसाच्या विवेकापेक्षा मोठी झाली, तर उद्याच्या जगात विनाश करण्यासाठी तलवारही लागणार नाही..एक अल्गोरिदम आणि एक बटन पुरेसे ठरू शकते.
म्हणूनच ‘NAZA’कडे केवळ इस्रायलविरोधी किंवा पॅलेस्टाईनसमर्थक चित्रपट म्हणून पाहण्यापेक्षा, मानवजातीसमोरील एका मोठ्या नैतिक प्रश्नाचा इशारा म्हणून पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
" तंत्रज्ञानाला बुद्धिमत्ता मिळाली आहे,आता त्याला विवेक देण्याची जबाबदारी माणसाची आहे." आणि कदाचित या संपूर्ण कथेतला सर्वांत मोठा धडा हाच,
“सत्तेला प्रश्न विचारणारा आवाज देशद्रोही नसतो, कधी कधी तोच आवाज इतिहासाला माणुसकीच्या बाजूने उभे करतो.”
विचार संकलन आणि लेखन.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment