कधी कधी आयुष्य आपल्या वाट्याला अशी वळणं आणतं, जिथे पुढची वाट धूसर दिसते, सोबत कोणी नसतं आणि परिस्थितीही आपल्या विरोधात उभी असल्यासारखी वाटते. अशा वेळी बाहेरची मदत, परिस्थितीची अनुकूलता किंवा इतरांची शाबासकी यापेक्षा एकच गोष्ट आपल्याला उभं ठेवते.. ते म्हणजे..स्वतःवरचा विश्वास..!
“स्वतःवरचा विश्वास हीच सर्वात मोठी ताकद आहे.” कारण ज्याला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो, त्याच्यासाठी अडथळे भिंती राहत नाहीत.. ते यशाकडे जाणाऱ्या पायऱ्या बनतात..आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाचा सामना करावा लागतो. एखादी परीक्षा अपयशी होते, एखादं स्वप्न अधुरं राहतं, एखादी संधी हातातून निसटते, कधी जवळची माणसंही आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण लक्षात ठेवा.. " इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून तुम्ही स्वतःवरचा विश्वास का गमवायचा?"
जग तुमच्या क्षमतेचा अंदाज तुमच्या आजच्या परिस्थितीवरून लावेल, पण तुम्ही तुमची ओळख उद्याच्या शक्यतांवरून निर्माण करा.
बीजाला जमिनीत गाडलं जातं, अंधारात ठेवलं जातं.. तरी ते मातीला दोष देत बसत नाही. त्याच्या अंतरंगात असलेल्या वृक्ष होण्याच्या विश्वासातून ते अंकुरतं. छोटासा अंकुर पुढे वटवृक्ष होतो. " तसंच माणसाच्या मनातलं स्वप्नही सुरुवातीला छोटं असतं; पण आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रम त्याला विशाल रूप देतात."
इतिहासात ज्यांनी परिवर्तन घडवलं, त्यांनी सुरुवातीला टाळ्यांचा आवाज ऐकलेला नव्हता.. त्यांनी अनेकदा उपहास, विरोध आणि अपयशाचा आवाज ऐकला होता. पण त्यांच्या अंतःकरणात एक आवाज स्पष्ट होता, “मी करू शकतो… मी पुन्हा प्रयत्न करेन… आणि एक दिवस नक्कीच यशस्वी होईन!”
म्हणूनच आत्मविश्वास म्हणजे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे नव्हे. " आपल्या कमतरता स्वीकारून त्यावर मात करण्याची तयारी म्हणजे आत्मविश्वास." अहंकार म्हणतो—“मला सगळं येतं.” आत्मविश्वास म्हणतो, “मला सगळं येत नसलं, तरी मी शिकू शकतो.”
अपयश आलं तर स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला विचारा, “या अनुभवातून मी काय शिकलो?” टीका झाली तर खचण्याऐवजी विचारा, “यातून मी स्वतःमध्ये काय सुधारू शकतो?” आणि परिस्थिती प्रतिकूल झाली तर स्वतःला सांगा, “परिस्थिती माझी परीक्षा घेत आहे; माझी क्षमता संपलेली नाही.”
कारण " परिस्थिती कधीचं माणसापेक्षा मोठी नसते; माणसाची जिद्द परिस्थितीपेक्षा मोठी असते."
विशेषतः विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेतील कमी गुण म्हणजे तुमची क्षमता कमी आहे, असा त्याचा अर्थ नाही. एका परीक्षेचा निकाल तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निकाल नसतो. " एक पराभव म्हणजे शेवट नव्हे..तो पुढच्या विजयासाठी मिळालेला धडा असतो."
स्वतःवर विश्वास ठेवा; पण त्या विश्वासाला कष्टांची जोड, ज्ञानाची दिशा आणि शिस्तीची साथ द्या. फक्त “मी करेन” म्हणण्याने स्वप्न पूर्ण होत नाही.. त्यासाठी रोज थोडं पुढे चालावं लागतं.
कारण, " स्वप्नं डोळ्यांत असणं सुंदर आहे; पण ती पूर्ण करण्याची जिद्द मनात असणं त्याहून सुंदर आहे."
कधी जग तुमच्यावर शंका घेईल. कधी परिस्थिती तुम्हाला थांबवेल. कधी अपयश तुम्हाला हादरवेल. कधी जवळची माणसंही तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करतील.पण त्या क्षणी स्वतःच्या अंतर्मनाला एवढंच सांगा, मित्रांनो “माझी आजची परिस्थिती माझं अंतिम सत्य नाही. माझ्या प्रयत्नांना अजून पूर्णविराम मिळालेला नाही. मी पडू शकतो, पण पुन्हा उभा राहू शकतो. मी हरू शकतो, पण पुन्हा लढू शकतो. आणि सर्वांत महत्त्वाचं, मी स्वतःवरचा विश्वास कधीही गमावणार नाही!”
कारण शेवटी विजय त्यांचाच होतो, जे संकटांच्या वादळातही आपल्या अंतर्मनातील आशेचा दिवा विझू देत नाहीत..
म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा… स्वतःच्या क्षमतेला ओळखा… स्वतःच्या स्वप्नांना संधी द्या… आणि प्रयत्नांची वाट कधीही सोडू नका.
कारण जग बदलण्यापूर्वी माणसाने स्वतःच्या मनातील “मी हे करू शकत नाही.” या एका वाक्यावर विजय मिळवला, की यशाची खरी सुरुवात तिथूनच होते. “जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याची वाट पाहू नका, आधी स्वतःवर विश्वास ठेवा.. कारण तुमच्या विजयाची पहिली स्वाक्षरी तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासानेच होते.”
विचार लेखन आणि संपादन.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment