🎓 ध्येयवेड्या शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास..✍️
श्री. Sandip Tengse सर
(सरस्वती अकॅडमी, पाथरी, जि. परभणी)
सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक ध्येयवेडा तरुण... शिक्षण क्षेत्रात काहीतरी वेगळं आणि अर्थपूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून, पदवीसोबत डी.एड.चं शिक्षण पूर्ण केलेलं; मात्र नोकरीच्या प्रस्थापित व्यवस्थेचा केवळ एक भाग होण्यापेक्षा खुल्या स्पर्धेच्या मैदानात स्वतःची ओळख आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचं धाडस करणारा एक लोकप्रिय शिक्षक म्हणजे संदीप टेंगसे सर..!
गेली अनेक वर्षे परभणी जिल्ह्यातील, विशेषतः पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून, त्यांच्या स्वप्नांना दिशा देत आणि शेकडो यशस्वी विद्यार्थी घडवत हा शिक्षक जणू ज्ञानरूपी मातीला आकार देणारा कुशल शिल्पकार ठरला आहे.
शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचं साधन नसून, व्यक्तिमत्त्व घडवण्याची, विचारांना दिशा देण्याची आणि समाजाचं भविष्य घडवण्याची प्रक्रिया आहे, हा विचार आपल्या कार्यातून अधोरेखित करणारे संदीप सर सामाजिक भान जपत चौकटीच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवत आहेत.
म्हणूनच संदीप सर हे केवळ एक शिक्षक नाहीत, तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे आणि त्यांच्या भविष्याला आकार देणारे एक सुंदर व्यक्तिमत्त्व आहेत,असं मला वाटतं..
कोरोनोत्तर काळात जालना येथे आयोजित एका शैक्षणिक परिसंवादाच्या निमित्ताने आपली सहर्ष भेट झाली आणि त्या पहिल्याच भेटीत आत्मविश्वासपूर्ण, अभ्यासू आणि आपल्या विचारांबाबत स्पष्ट असलेले संदीप सर अनुभवता आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून आपला संपर्क राहिला आणि प्रत्येक संवादातून, प्रत्येक भेटीतून काही ना काही शिकण्यासारखं मिळत गेलं. काही व्यक्तींची ओळख काळानुसार वाढत जाते; पण काही व्यक्तिमत्त्वं काळाच्या ओघात अधिकाधिक समृद्ध होत जातात...संदीप सर हे त्यापैकीचं एक..!
आपल्या अकॅडमीत आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात आपण मला वक्ता म्हणून निमंत्रित केलं होतं. त्या निमित्ताने आपल्या शैक्षणिक संकुलाचा जवळून परिचय झाला. आपल्या कार्यावर पालकांनी ठेवलेला दृढ विश्वास, विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला स्नेह, आपल्या अथक परिश्रमांची धग, तसेच या प्रवासामागे आपल्या कुटुंबाने सोसलेला संघर्ष हे सर्व जवळून अनुभवता आलं.
यशाच्या व्यासपीठावर उभं राहिलेल्या व्यक्तीच्या टाळ्यांपेक्षा, त्या टाळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केलेल्या संघर्षाची कहाणी अधिक मोठी असते. आपल्या प्रवासात हा संघर्ष प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच आपल्या यशाचं मोल केवळ मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नाही, तर आपण ज्या परिस्थितीतून उभं राहिलात आणि इतरांना उभं करण्यासाठी जे प्रयत्न केलेत, त्यात आहे.
आपला मित्रपरिवार, सामाजिक बांधिलकीची जपलेली नाळ आणि शिक्षणाबरोबरच समाजासाठी आपण करीत असलेलं कार्य या सर्व गोष्टींनी मला मनापासून प्रभावित केलं. स्वतःपुरतं यश संपादन करणं ही उपलब्धी असते; पण आपल्या यशाचा प्रकाश इतरांच्या वाटेलाही मिळावा, अशी भूमिका ठेवणं हीच खरी सामाजिक बांधिलकी असते.. ही जाणीव आपल्या कार्यातून सातत्याने दिसून येते.
आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक संघर्षाने आपल्याला बहाल केलेली उच्च विनम्रता, आत्मभान जपतही इतरांना निःस्वार्थपणे मार्गदर्शन करण्याची आपली वृत्ती आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा हे विशेषतः प्रभावी वाटतात. मोठं होताना माणूस नम्र राहतो, तेव्हा त्याचं मोठेपण अधिक अधोरेखित होतं..आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात ही नम्रता प्रकर्षाने जाणवते.
एका खासगी क्लासेसमधील सर्वसामान्य शिक्षकाच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन आपण उभं केलेलं कार्य निश्चितच कोचिंग क्षेत्रातील अनेक शिक्षक आणि शैक्षणिक व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य दिशा आणि मोठी स्वप्नं पाहण्याचं बळ देणं, ही केवळ शैक्षणिक सेवा नसून समाजाच्या पुढच्या पिढीची पायाभरणी करण्याचं महान कार्य आहे.
कारण इमारती उभारणारे अनेक असतात; पण माणसं घडवणारे हात फार थोडे असतात...गुण मिळवून देणारे शिक्षक अनेक असतात; पण आयुष्याला दिशा देणारे शिक्षक विरळच असतात...आणि अशाच विरळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे संदीप टेंगसे सर..!
आपल्या कार्याचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो. आपल्या ज्ञानाचा दीप अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करो, आपल्या विचारांची ऊर्जा नव्या पिढीला प्रेरणा देत राहो आणि आपल्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी उंची मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
आपल्या संघर्षाचा इतिहास प्रेरणा देत राहो,आपल्या कार्याचा वर्तमान आदर्श ठरो,आणि आपल्या स्वप्नांचा भविष्यकाळ असंख्य विद्यार्थ्यांच्या यशातून उजळून निघो..!
आपल्या पुढील देदीप्यमान, यशस्वी आणि प्रेरणादायी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व हार्दिक सदिच्छा!
आपला सार्थ अभिमान आहे, संदीप सर!
आपलाच एक स्नेही आणि मार्गदर्शक मित्र.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#संदीप_टेंगसे_सर #ध्येयवेडा_शिक्षक #आदर्श_शिक्षक #विद्यार्थीमित्र #ग्रामीण_शिक्षण #शिक्षणातून_परिवर्तन #प्रेरणादायी_प्रवास #शिक्षक_प्रेरणा #सामाजिक_बांधिलकी #परभणी #पाथरी #maharashtra
Post a Comment