अस्वस्थ वर्तमानातून.. ✍️
ज्यांच्यासाठी आपण लढा उभारतो, ज्यांच्या नावाने परिवर्तनाची भाषा करतो, त्यांच्याच विरोधात उभं राहणं ही वैचारिक दारिद्र्याची स्पष्ट लक्षणं आहेत. हा लढा कुणाच्या वैयक्तिक अहंकाराच्या समाधानासाठी नाही, तर सामूहिक मुक्तीसाठी आहे..हेच जर उमगत नसेल, तर आपण आंदोलनात नाही, तर स्वतःच्या प्रतिमेच्या जाहिरातीत गुंतलेलो आहोत.
" चळवळ ही आरशासमोर उभं राहून टाळ्या वाजवण्यासाठी नसते; ती स्वतःच्या भ्रमांचा भंग करण्यासाठी असते. "
नाराजी व्यक्त करायची असेल, तर ती व्यक्तीविरोधी नव्हे..विचारविरोधी असली पाहिजे. कारण व्यक्ती येतात-जातात, पण विचार टिकतात आणि इतिहास घडवतात. सार्वजनिक शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक हे परिवर्तनाचे शस्त्र नाहीत; ते चळवळीच्या छातीत घुसवलेले खंजीर आहेत. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी आधी विचारांची उंची गाठावी..अन्यथा टीका ही केवळ वैफल्यातून आलेली आरडाओरड ठरते.
वैचारिक मतभेद रस्त्यावर ओरडून नव्हे, तर बंद खोलीत घाम गाळून सोडवायचे असतात. समाज शहाणा होतो चर्चेने; तमाश्याने नाही. जाहीर अपमानातून निर्माण होणारी एकता ही ढोंग असते..ती पहिल्याच संकटात तुटून पडते. म्हणूनच वैचारिक मंथन हे शांत असावं, पण धारदार असावं; संयमी असावं, पण निर्भीड असावं.
“ मला किती माहिती आहे ? ” हा प्रश्न गौण आहे. खरा प्रश्न असा आहे की, माझ्याकडे असलेली माहिती मी माझ्या विखुरलेल्या बहुजन समाजाला जोडण्यासाठी वापरतोय की स्वतःला मोठं दाखवण्यासाठी..?
“ जे ज्ञान समाजाच्या वेदनेशी नाळ जुळवत नाही आणि परिवर्तनासाठी वापरात येत नाही, ते ज्ञान नाही..तो मेंदूत साचलेला कचरा आहे. असा कचरा समाजाला दिशा देत नाही; तो केवळ भ्रम, अहंकार आणि गोंधळ निर्माण करतो. ”
इतिहास कोणीही एकट्याने घडवलेला नाही. प्रत्येकाला दुसऱ्याची गरज असते..हे नाकारणं म्हणजे वास्तवाशी बेईमानी करणं होय. म्हणून शब्दांचा वापर करताना सावध रहा. जिभा हे अत्यंत घातक शस्त्र आहे; ती समाज उभा करू शकते आणि उद्ध्वस्तही करू शकते. आपल्या लोकांवरच ती चालवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्हाड मारणं होय.
लढा हा समोरच्याला संपवण्यासाठी नसतो; तो स्वतःची आणि समाजाची चेतना जागी करण्यासाठी असतो. जोपर्यंत आपण व्यक्तिद्वेष सोडून वैचारिक शिस्त स्वीकारत नाही, तोपर्यंत आपली आक्रमकता क्रांती ठरत नाही..ती केवळ गोंगाट बनून राहते. आणि गोंगाट इतिहास घडवत नाही; इतिहास घडवतात ते विचार, आणि विचारच शेवटी व्यवस्था हादरवतात.
आज खरा प्रश्न असा आहे की, आपण चळवळीचा भाग आहोत की चळवळीवर ओझं बनलो आहोत? आपले शब्द समाजाला दिशा देतात की दरीत लोटतात..याचा हिशेब आपण स्वतःशी प्रामाणिकपणे मांडला पाहिजे. कारण शत्रू बाहेर असण्यापेक्षा अधिक घातक शत्रू आपल्या आत असतो..तो म्हणजे अहंकार, असहिष्णुता आणि वैचारिक आळस.
म्हणूनच आता अंतर्मुख व्हायची वेळ आहे. आपण काय बोलतोय यापेक्षा का बोलतोय, हे तपासण्याची वेळ आहे. जर आपल्या शब्दांनी आपल्याच लोकांना जखमा होत असतील, तर आपण परिवर्तनाचे शिलेदार नाही..आपण केवळ विध्वंसाचे वाहक आहोत. आणि परिवर्तन हे विध्वंसातून नव्हे, तर वैचारिक शुद्धीकरणातून जन्माला येतं..हे सत्य स्वीकारल्याशिवाय कोणतीही चळवळ पुढे जाऊ शकत नाही..
-शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता...
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
" मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..! "
Inspire | Educate | Empower | Excel
🔰 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#अस्वस्थवर्तमान #वैचारिकलढा #परिवर्तन #सामूहिकमुक्ती #बहुजनचळवळ #वैचारिकशिस्त #विवेकवादी #प्रबोधन #समाजपरिवर्तन #आत्मपरीक्षण #अंतर्मुखता #विचारक्रांती #अहंकारविरहितलढा #चळवळ #सामाजिकभान #शब्दांचीजबाबदारी #विचारांचीधार #इतिहासघडवणारेविचार #मानवीमूल्ये #RadicalHumanism #SocialReform #IdeologicalFight #CollectiveLiberation #ThinkBeyondEgo #VoiceOfChange #MovementEthics #IntellectualResistance #HumanistThought #AwakeningMindset
Post a Comment