देशात ‘पुणेरी पाट्या’ ही केवळ विनोदाची परंपरा नाही; ती मराठी समाजमनातील तीक्ष्ण बुद्धी, निरीक्षणशक्ती आणि कमी शब्दांत खोल अर्थ मांडण्याची अद्भुत कला आहे. त्या पाट्या हसवतात, पण हसवताना आपल्या दैनंदिन आयुष्यातील विसंगतींना आरसाही दाखवतात हाच त्यांचा प्रखर सामाजिक संदेश असतो.
शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करताना गेली दोन दशके पुणे वारी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे. दर भेटीत नवं काहीतरी शिकायला मिळतं, नवे कार्यकर्ते भेटतात, आणि विविध विचारसरणींच्या अभिसरणातून मन अधिक समृद्ध होतं. पण या प्रवासात नेहमीच सोबत असते ती ‘पुणेरी पाट्यांची’ अनोखी संगत जी कधी टोकते, कधी विचार करायला भाग पाडते आणि कधी तणावातही खळखळून हसवून जाते.
महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत वाढती वाहतूक आणि नियंत्रणाचा अभाव डोळ्यांना खटकतो, पण जिथे सिग्नल आणि ट्रॅफिक पोलीस तैनात असतात, तिथे एक वेगळाच अनुभव येतो.
ट्रॅफिकमध्ये अडकताना अनेकदा एखाद्या ऑटोच्या किंवा ट्रकच्या मागे लिहिलेलं एखादं वाक्य दिसतं… आणि त्या एका वाक्याने क्षणात मन शांत होतं, विचारांना दिशा मिळते, आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक होते.
आज असंच झालं..! सोमवारची कामांची धावपळ, रस्त्यांवरील उसळी मारणारी गर्दी, 20-25 मिनिटांचा जीव घुटमळवणारा ट्रॅफिक जाम… पुढं जाता येत नाही, मागे वळता येत नाही..
जणू आयुष्याचीच स्थिती झाली होती. आसपास पाहिलं तर लोकांच्या चेहऱ्यावरचा त्रास, असहायता, आणि व्यवस्थेबद्दलचा संताप स्पष्ट जाणवत होता.
अशातच नजरेत एक छोटसं वाक्य पडलं..एखाद्या साध्या ऑटोच्या मागे. पण त्या वाक्याने मनातली अस्वस्थता विरघळली, आणि क्षणभर का होईना, आशेचा दीप पुन्हा पेटला.
खरं म्हणजे, आपल्या आजूबाजूला प्रेरणा ही मोठ्या गोष्टींमध्ये नसतेच... तर ती असते छोट्या अनुभूतीत, साध्या शब्दांत, अनोळखी व्यक्तीच्या पाठीवरच्या संदेशात, अथवा एखाद्या विचार पाटीवरच्या ओळींत.
जीवनातील नकारात्मकता पूर्णपणे दूर करता येत नाही, पण तिच्यातूनही नवी ऊर्जा, नवा अर्थ, नवी दिशा शोधण्याची क्षमता मात्र आपण विकसित करू शकतो..फक्त दृष्टी सकारात्मक असली कीं.
जगण्याच्या गर्दीत आणि गोंधळात एखादा क्षण थांबून पाहा, कदाचित तुम्हालाही एखाद्या ऑटोच्या मागे तुमचं आयुष्य बदलणारं वाक्य दिसेल.
– एक जीवन प्रवासी ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
Post a Comment