वाढदिवसाचे बॅनर लावणं ही मानसिक विकृती म्हणून गणली जायला हवी..ओळीने फटाक्यांची माळ लावावी तशा विद्रूप शुभेच्छा देण्यात नक्की कसला विषारी आनंद मिळतो, कोणास ठाऊक?
हे एक राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक प्रदूषण बनलंय.
सगळीकडचा हा भंपक, बटबटीतपणा थांबवायला हवा...
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या नावाखाली शहरभर बॅनर लावण्याची जी विकृती अलीकडे वाढली आहे, तिला आता “शुभेच्छा संस्कृती” म्हणण्याची गरज नाही..ती सरळसरळ सार्वजनिक दिखाऊपणाची संस्कृती झाली आहे.
एखाद्याचा वाढदिवस आहे म्हणून संपूर्ण शहराला त्याची जाहिरात का दाखवायची?
रस्त्याच्या कडेला बॅनर, चौकात फ्लेक्स, खांबावर पोस्टर, दुकानाच्या भिंतीवर फोटो आणि त्यावर शुभेच्छांच्या नावाखाली मोठमोठी बिरुदावली..!
जणू माणसाचा वाढदिवस नसून एखाद्या साम्राज्याचा राज्याभिषेकच सुरू आहे!
शुभेच्छा मनापासून असतील तर चार शब्द पुरेसे आहेत. फोन करा, भेटा, संदेश पाठवा. पण नाही..!😎
आज शुभेच्छा देण्यासाठीही फोटोचा आकार, बॅनरची लांबी आणि नावाची अक्षरे किती मोठी आहेत, याला महत्त्व आलं आहे.
हे प्रेम नाही...हे आपलेपण नाही...हा सन्मानही नाही...!
हा अनेकदा स्वतःची किंवा आपल्या गटाची सार्वजनिक जाहिरात करण्याचा स्वस्त मार्ग असतो.
सगळ्यात गंमत म्हणजे बॅनरवर वाढदिवस ज्याचा आहे त्याचा फोटो मोठा आणि शुभेच्छा देणाऱ्यांचा फोटो त्याहून मोठा..!
म्हणजे वाढदिवस कुणाचा आणि प्रसिद्धीची भूक कुणाची?
काही बॅनर पाहिले की वाटतं..माणसाने आयुष्यात नेमकं काय केलं यापेक्षा त्याचा फोटो किती मोठा छापला गेला, हेच आता कर्तृत्वाचं प्रमाणपत्र झालं आहे.
काम शून्य, पण बॅनर भव्य..!..कर्तृत्व किरकोळ, पण बिरुदावली अफाट..!सामाजिक योगदान नगण्य, पण फोटो चौकभर..!
ही मानसिकता धोकादायक आहे..
कारण जेव्हा समाजात दिसण्याला असण्यापेक्षा जास्त महत्त्व मिळतं, तेव्हा प्रामाणिक काम करणारे मागे पडतात आणि स्वतःची जाहिरात करणारे पुढे येतात.
ही केवळ सौंदर्याची समस्या नाही...ही सामाजिक अभिरुचीची अधोगती आहे...ही सार्वजनिक अवकाशाच्या बळकावण्याची प्रवृत्ती आहे.
आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रात ती चापलुसी, व्यक्तिपूजा आणि दिखाऊ संस्कृतीला खतपाणी घालते.
आज एका व्यक्तीच्या वाढदिवसाचे पन्नास बॅनर लागतात. उद्या त्याच व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीचे पोस्टर लागतील. आणि हळूहळू समाजात असा भ्रम निर्माण होईल की ज्याचा चेहरा सर्वत्र दिसतो, तोच मोठा माणूस..!
हा भ्रम फोडण्याची गरज आहे...
लोकप्रियता बॅनरवर छापता येते; पण प्रतिष्ठा छापता येत नाही.
बिरुदावली विकत घेता येते..पण कर्तृत्व विकत घेता येत नाही.
फोटो हजार ठिकाणी लावता येतो.. पण समाजाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी कामच करावं लागतं.
आणि खरं सांगायचं तर, एखाद्याच्या वाढदिवशी हजारो रुपये बॅनरवर उधळण्यापेक्षा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तकं देणं अधिक अर्थपूर्ण आहे.
फ्लेक्सवर “हार्दिक शुभेच्छा” लिहिण्यापेक्षा एखाद्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं अधिक मोठं आहे.
चौकात फोटो लावण्यापेक्षा समाजासाठी एखादं चांगलं काम उभं करणं अधिक प्रतिष्ठेचं आहे..कारण बॅनर वाऱ्याने फाटतो..पण चांगल्या कामाची आठवण काळ फाडू शकत नाही.
म्हणून आता तरी या बटबटीतपणाला आळा घातला पाहिजे.
वाढदिवस साजरा करा पण शहराला विद्रूप करून नाही.
शुभेच्छा द्या पण अहंकाराला खतपाणी घालून नाही.
सन्मान करा पण व्यक्तिपूजेच्या बाजारात नाही.
आणि सर्वांत महत्त्वाचं,
फोटो मोठा करण्याच्या नादात माणूस स्वतःला मोठा समजू लागला, तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी नाही.
आता समाजाने ठरवायला हवं, आपल्याला बॅनरवर मोठी माणसं हवी आहेत की प्रत्यक्ष आयुष्यात मोठं काम करणारी माणसं?
कारण शेवटी, " बॅनरवरचा चेहरा काही दिवस दिसतो,पण माणसाचं खरं कर्तृत्व पिढ्यान्पिढ्या दिसत राहतं!
एक समाजमाध्यमकार.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
Post a Comment