🎓 वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने… ✍️
वाचनातून विचारांची समृद्धी, संघर्षातून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि अनुभवातून जीवनाची खरी ओळख!
“ ऐरण होशील तेव्हा घाव सोस, आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल…”
— राष्ट्ररत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगावा, प्रत्येक स्वप्नाला वास्तवात उतरवावं आणि प्रत्येक दिवस आनंदाने फुलवावा, असं मनापासून वाटत असतं. परंतु आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही. कधी परिस्थिती आपल्या बाजूने उभी राहते, तर कधी तीच परिस्थिती आपली कसोटी पाहते. कधी यशाची फुलं आपल्या वाटेवर उमलतात, तर कधी अपयशाचे काटे पायांत रुततात.
पण आयुष्याचं खरं सौंदर्य केवळ सुखात नसतं; ते संकटांना सामोरं जाताना आपण दाखवलेल्या धैर्यात, संयमात आणि जिद्दीत दडलेलं असतं..!
आयुष्य अनेक आव्हानांनी, संघर्षांनी आणि अनपेक्षित वळणांनी भरलेलं असतं. अशा वेळी आपल्याला सावरणारं, आपल्या मनात आशेचा दीप प्रज्वलित करणारं आणि पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची प्रेरणा देणारं कुणीतरी सोबत असावं, असं वाटतं. कधी ही साथ एखाद्या जिवलग माणसाची असते, कधी एखाद्या समजूतदार व्यक्तीच्या शब्दांची, तर कधी एखाद्या पुस्तकाच्या पानांमधून आपल्याशी संवाद साधणाऱ्या विचारांची!
माझ्या संघर्षमय जीवनप्रवासात चांगली पुस्तकं आणि अनुभवांच्या शिदोरीने मला नेहमीच नवी ऊर्जा दिली आहे. आयुष्यात आलेल्या कटू-गोड अनुभवांनी मला माणसं ओळखायला शिकवलं, परिस्थिती समजून घ्यायला शिकवलं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं.
जीवनातील प्रत्येक अनुभव हा एक नवा धडा असतो. काही अनुभव आनंद देतात, काही अंतर्मुख करतात, तर काही आपल्याला आतून हादरवून सोडतात. मात्र, त्या प्रत्येक अनुभवातून शिकण्याची वृत्ती जिवंत ठेवली, तर संघर्षसुद्धा आपला शिक्षक बनतो आणि अपयशसुद्धा यशाच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरतं.
जीवनात दिवसेंदिवस अनेक आव्हानांशी भिडताना मी एक गोष्ट शिकलो आहे.कधीही सहजासहजी हार मानायची नाही..!
प्रत्येक प्रसंगाला धैर्याने, संयमाने आणि उपलब्ध जीवनकौशल्यांचा योग्य वापर करून सामोरं जायचं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी विवेक हरवू द्यायचा नाही. संकट कितीही मोठं असलं, तरी आत्मविश्वासाची ज्योत विझू द्यायची नाही.
कारण मन खंबीर असेल, विचार सकारात्मक असतील आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर अडचणींच्या अंधारातूनही मार्ग शोधता येतो.
हळूहळू माझ्या लक्षात आलं की, संकटं ही केवळ अडथळे नसतात;तर ती आपल्या क्षमतांची ओळख करून देणाऱ्या संधीही असतात. कठीण परिस्थिती माणसाला अधिक कणखर, परिपक्व आणि वास्तववादी बनवते. अर्थात, प्रत्येक संघर्ष आपोआप माणसाला घडवत नाही; त्या संघर्षातून आपण काय शिकतो आणि स्वतःमध्ये कोणते बदल घडवतो, यावर आपली जडणघडण अवलंबून असते.
माझ्या मते, स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांच्या मान्यतेची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण लोकांची मतं बदलत राहतात; परंतु आपलं कर्तृत्व, आपली मूल्यं आणि आपल्या कार्यातून निर्माण झालेला विश्वास दीर्घकाळ टिकतो.
शालेय शिक्षणापासून आजपर्यंतच्या माझ्या जडणघडणीकडे मागे वळून पाहताना माझ्या मनात झालेल्या वैचारिक क्रांतीची आणि बौद्धिक विकासाची जाणीव होते. वाचनाने माझ्या विचारांना दिशा दिली, अनुभवांनी त्यांना खोली दिली आणि संघर्षाने त्यांना भक्कम आधार दिला..याच जाणिवेतून स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अधिक मेहनत घेण्याची, स्वतःतील सुप्त कलागुणांना वाव देण्याची आणि नव्या गोष्टी शिकत राहण्याची प्रेरणा मिळते.
कारण माणसाची खरी प्रगती केवळ त्याने किती मिळवलं यावर ठरत नाही, तर त्याने स्वतःमध्ये किती सकारात्मक परिवर्तन घडवलं, यावरही ठरते!
#वाचन : व्यक्तिमत्त्व परिवर्तनाची गुरुकिल्ली..!
आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचं स्मरण करताना वाचनाचं महत्त्व नव्याने अधोरेखित करावंसं वाटतं.
पुस्तकं ही केवळ कागदावर छापलेली अक्षरं नसतात; ती अनुभवांची विद्यापीठं असतात. ती आपल्याला जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात, प्रश्न विचारण्याचं धाडस शिकवतात, विवेक जागृत करतात आणि आपल्या विचारविश्वाचा विस्तार करतात.
वाचन माणसाला केवळ माहिती देत नाही, तर विचार करण्याची क्षमता विकसित करतं. ते आपल्या पूर्वग्रहांना प्रश्न विचारायला शिकवतं, इतरांच्या वेदना समजून घेण्याची संवेदनशीलता वाढवतं आणि सत्य-असत्याची चिकित्सा करण्याची दृष्टी देतं.
आजच्या डिजिटल युगात माहितीचा महासागर आपल्या हातात आहे; परंतु माहितीचा प्रचंड साठा असणं आणि त्या माहितीचं सुज्ञपणे आकलन करणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच सोशल मीडियावरील प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवण्यापेक्षा वाचन, चिंतन, मनन आणि चिकित्सक विचारांची सवय विकसित करणं अधिक गरजेचं आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी. अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबरच चरित्रं, आत्मचरित्रं, विज्ञान, साहित्य, इतिहास आणि समाजपरिवर्तनाच्या चळवळींवरील पुस्तकं वाचावीत. कारण परीक्षेतील गुण भविष्याच्या प्रवासात उपयोगी पडू शकतात; पण ज्ञान, विवेक, संवेदनशीलता आणि जीवनकौशल्यं व्यक्तिमत्त्वाला व्यापक अर्थ देतात.
वाचनाने विचार समृद्ध होतात, विचारांनी व्यक्तिमत्त्व घडतं आणि व्यक्तिमत्त्वातून समाजपरिवर्तनाची बीजं रुजतात!
#आयुष्यातील चढ-उतार : जगण्याची खरी शाळा!
आयुष्यात येणारे चढ-उतार आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. ते आपल्याला प्रयत्नशील राहायला, बदल स्वीकारायला आणि परिस्थितीनुसार स्वतःला घडवायला शिकवतात. प्रत्येक दिवस सारखा नसतो आणि प्रत्येक क्षण आनंद देणारा असतोच असंही नाही.
कधी थांबावं लागतं, कधी नव्याने सुरुवात करावी लागते, तर कधी आपण आखलेली दिशा बदलावी लागते. यात कमीपणा नसतो. उलट, परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेणं हेच परिपक्वतेचं लक्षण असतं.
आपलं कार्य प्रामाणिकपणे, समर्पित वृत्तीने आणि अथक परिश्रमांनी करत राहणं महत्त्वाचं आहे. मात्र, या प्रवासात स्वतःच्या आनंदाची, मानसिक शांततेची आणि माणसांशी असलेल्या नात्यांचीही जपणूक करायला हवी. कारण जीवनाचं सार केवळ ध्येय गाठण्यात नाही, तर त्या ध्येयापर्यंतचा प्रवास अर्थपूर्ण करण्यात आहे.
#डॉ. कलाम यांचा विचार : संघर्षातून सामर्थ्याकडे..!
राष्ट्ररत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या आत्मकथनातून मला भावणारा एक महत्त्वाचा जीवनसंदेश म्हणजे परिस्थिती कशीही असली, तरी तिला धैर्याने सामोरं जाणं आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं.
“ऐरण होशील तेव्हा घाव सोस, आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल…” या विचाराचा व्यापक अर्थ समजून घेतला, तर जीवनातील संघर्षाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते.
ऐरणीप्रमाणे काही वेळा आपल्याला प्रतिकूल परिस्थितीचे आघात सहन करावे लागतात. त्या वेळी संयम, सहनशीलता आणि मानसिक खंबीरपणा आवश्यक असतो. तर हातोड्याप्रमाणे काही वेळा पुढाकार घेऊन परिस्थिती बदलण्यासाठी ठामपणे कृती करावी लागते.
म्हणजेच, कधी सहनशीलतेने टिकून राहायचं, तर कधी धैर्याने पुढे येऊन परिवर्तन घडवायचं..!
मात्र, सहनशीलता म्हणजे अन्यायापुढे मान झुकवणं नव्हे आणि संघर्ष म्हणजे विवेक सोडून आक्रमक होणंही नव्हे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना सत्य, विवेक, संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांची साथ सोडायची नाही. हाच या विचाराचा सकारात्मक आणि रचनात्मक अर्थ आहे.
जिंदगी प्रत्येकाला काही ना काही संधी देत असते; परंतु त्या संधी ओळखण्याची दृष्टी, त्यांचं सोनं करण्याचं कौशल्य आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची तयारी आपल्यात विकसित करावी लागते.
केवळ हार-जीत, यश-अपयश किंवा मिळवलेली पदं म्हणजे आयुष्य नव्हे. स्वतःतील सुप्त गुणांचा शोध घेणं, त्यांना मेहनतीने विकसित करणं, सतत शिकत राहणं, इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं आणि स्वतःच्या कर्तृत्वातून समाधान मिळवणं, हेच अर्थपूर्ण जगण्याचे खरे पैलू आहेत.
जिंकणं आनंद देतं, तर हरणं शिकवतं. यश आत्मविश्वास वाढवतं, तर अपयश आपल्या उणिवा ओळखण्याची संधी देतं. मात्र, या दोन्ही अवस्थांमध्ये स्वतःवरील विश्वास आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे.
कारण परिस्थिती कितीही कठीण असली, तरी आपल्या विचारांची दिशा, प्रयत्नांची प्रामाणिकता आणि मूल्यांशी असलेली बांधिलकी आपण जपू शकतो.
म्हणून वाचा, विचार करा, प्रश्न विचारा, स्वतःला घडवा आणि इतरांनाही घडण्यासाठी प्रेरित करा. स्वतःच्या यशापुरतं मर्यादित न राहता आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करा.
कारण खऱ्या अर्थाने मोठं होणं म्हणजे केवळ स्वतः उंच भरारी घेणं नव्हे, तर आपल्या सोबत इतरांनाही उंच भरारी घेण्यासाठी बळ देणं होय!
आयुष्य किती जगलो, यापेक्षा ते कसं जगलो; किती मिळवलं, यापेक्षा किती घडलो; आणि किती पुढे गेलो, यापेक्षा आपल्या प्रवासातून किती जणांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली..यातच जीवनाचं खरं सार्थक दडलं आहे!
📚 वाचनातून विवेक, संघर्षातून सामर्थ्य, अनुभवातून परिपक्वता आणि कर्तृत्वातून आत्मसमाधान मिळवू या..!
#वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
-एक पुस्तकप्रेमी आणि समीक्षक.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment